काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी 5 नोव्हेंबरला दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन हरियाणातील मतदार यादीत मोठ्या प्रमाणात घोळ झाल्याचा आणि २५ लाख मतदार बनावट असल्याचा गंभीर आरोप केला आहे. 'तुमची सरकार चोरीची आहे, ही एक फेक सरकार आहे', अशा थेट शब्दांत राहुल गांधी यांनी भाजपवर हल्लाबोल केला. या घोटाळ्यामुळे हरियाणात काँग्रेसचा विजय हिरावून घेतला गेला, असा दावा त्यांनी केला. गांधी यांनी पुरावे सादर करत म्हटले की, एकाच फोटोचा वापर करून २२३ बनावट मतदार तयार केले गेले आणि उत्तर प्रदेशातील भाजपचे सरपंच हरियाणामध्येही मतदान करत आहेत. निवडणूक आयोग भाजपच्या संगनमताने हे सर्व करत असून, लोकशाही नष्ट करण्याचा हा प्रयत्न असल्याचा खळबळजनक आरोप कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला. त्यातही ब्राझीलची एक मॉडेल 22 वेळा मतदान करून गेली, असेही ते म्हणाले. कांग्रेस नेते राहुल गांधींनी 'H फाइल्स' नावाच्या बॉम्बसारख्या पुराव्यांसह हा खळबळजनक आरोप केला.
पत्रकार परिषदेत राहुल गांधींनी स्क्रीनवर एका सुंदर महिलेचा फोटो दाखवला. म्हणाले, “ही कोण? ब्राझीलची मॉडेल! हरियाणातल्या राय मतदारसंघात 10 बूथवर 22 वेळा मतदान केलं. नाव कधी सीमा, कधी स्वीटी, कधी सरस्वती, कधी विमला! एकूण 2 कोटी मतदारांत 25 लाख फेक – म्हणजे प्रत्येक 8 पैकी 1 वोट चोरीचा!” राहुलांनी QR कोड स्कॅन करून स्टॉक इमेज असल्याचे दाखवले. ही स्टॉक इमेजमधील महिला मॉडेलचे नाव लारीसा असून ब्राझीलमध्ये राहते. तिने कधीच भारतात पाऊल ठेवले नाही. आता ती मॉडेल नव्हे, डिजिटल इन्फ्ल्यूएन्सर आणि 2 मुलांची आई आहे.राहुल गांधीच्या आरोपानंतर तिला शेकडो भारतीय पत्रकारांचे मेसेज आले. तिने इंस्टाग्रामवर दोन व्हिडिओ टाकले. “हॅलो इंडिया! माझं भारताच्या राजकारणाशी काही देणंघेणं नाही. मी ब्राझीलची आहे, तुमच्या देशाच्या लोकांना प्रेम करते. नमस्ते!” दुसऱ्या व्हिडिओत ती हसत म्हणते, “आता मला हिंदी शब्द शिकावे लागेल. मी भारतात फेमस झाले, विश्वास ठेवता येत नाही का?” लारीसाने स्पष्ट केले – हा फोटो स्टॉक इमेज आहे, कोणीही विकत घेऊन वापरू शकतो.
ब्राझीलची लारीसा रॅमोस कधीही भारतात आली नाही. हा फोटो Unsplash सारख्या फ्री स्टॉक साइटवरून घेण्यात आलेला आहे. कॅनन कॅमेऱ्याने काढलेला, वर्षानुवर्षे ब्लॉग, जाहिराती, लिंक्डइन प्रोफाइल्सवर 'सांकेतिक महिला' म्हणून वापरला जातो. हरियाणातल्या मतदार यादीत हा फोटो 22 वेगळ्या नावांसोबत चिटकवला गेला. पण प्रत्यक्ष मतदार वेगळ्या! “ही तुमची लोकशाही आहे, सत्य आणि अहिंसेच्या बळावर वाचवा!” कांग्रेस बिहार निवडणुकीतही हा मुद्दा उचलेल, असे राहुल गांधी म्हणाले. लारीसा आता भारतीय माध्यमांना इंटरव्ह्यू देईल. पण मतदार यादीत स्टॉक फोटो कसा? ही चूक की मुद्दाम? सत्य काय, ते समोर येणे आवश्यक आहे.

0 टिप्पण्या