घोडबंदर रोडवरील आनंद नगर येथील मठावर कारवाई होणार असल्याच्या दाव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी ठाणे पालिका मुख्यालयात ठिय्या मांडला. राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान आणि मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या नेतृत्वात झालेल्या या आंदोलनानंतर पालिका प्रशासनाने मठावर कोणतीही कारवाई होणार नसल्याचे आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.
आनंद नगरमध्ये म्हाडाच्या जागेवर सुमारे १९ वर्षांपासून स्वामी समर्थांचा मठ आहे. येथे स्वामी भक्तांकडून नियमित पूजाअर्चा केली जाते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून हा मठ पाडून त्या जागी उद्यान उभारण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप मनसेचे अविनाश जाधव यांनी केला. मागील आठवड्यात पालिका कर्मचारी मठ पाडण्यासाठी आले होते. त्यावेळी मनोज प्रधान यांनी मठात जाऊन अधिकाऱ्यांना परत पाठवले होते. अविनाश जाधव यांनीही मठाला भेट देऊन कारवाईला विरोध करण्याची भूमिका जाहीर केली होती. सोमवारी परिवहनमंत्री तथा स्थानिक आमदार प्रताप सरनाईक पालिका आयुक्तांना भेटणार असल्याची माहिती मिळताच, मनोज प्रधान आणि अविनाश जाधव यांनी पालिका मुख्यालयात धडक दिली. आयुक्तांनी भेट द्यावी, यासाठी त्यांनी दालनाबाहेरच आंदोलन सुरू केले. अखेरीस, आयुक्तांसोबत झालेल्या चर्चेनंतर मठावरील कारवाईला स्थगिती देण्याचे आश्वासन देण्यात आले, अशी माहिती मनोज प्रधान यांनी दिली. यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
सोमवारी कॅडबरी नाका ते ठाणे महापालिकेवर मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. हा मोर्चा कोणत्याही पक्षाचा नसेल असेही स्पष्ट करण्यात आले. आम्ही महापालिकेवर धडक मोर्चा काढणार आहोत. हे कोणाच्या सांगण्यावरून सुरु आहे आम्हाला माहीत आहे. शहरातील उद्याने आधी सुधारा आणि मग येथे या असे प्रधान यांनी सांगितले. आम्ही सोमवारी कॅडबरी जंक्शन येथे जमणार असून कॅडबरी ते ठाणे महापालिका असा मोर्चा निघेल असा इशारा त्यांनी दिला. या मोर्चानंतर आयुक्तांसोबत चांगली चर्चा घडेल असा विश्वास आहे असेही त्यांनी सांगितले. ठाकरे गटाचे प्रदीप पुर्णेकर यांनी सांगितले की, ठाण्यातील उद्यानात गर्दुल्ले फिरतात. उद्यान - बनले आहेत तिथे लक्ष दिले जात नाही. ठाण्यात अमली पदार्थ सर्रास मिळतात. या मठात चांगले उपदेश मिळत असताना येथे कारवाई केली जात आहे. येथे मुस्लिम समाजाचे लोक देखील येतात. येथे कोणतीही जात धर्म पाहिले जात नाही असे त्यांनी सांगितले.
मठाची जागा ही म्हाडाची आहे. मात्र, या जागेच्या बाजूला एका स्थानिक आमदाराकडून लग्नाचा हॉल आणि जीम उभारण्याचे काम सुरु आहे. या आमदाराला आता मठाच्या जागेवर गार्डन बनवायचे आहे. स्थानिक आमदार या परिसरात सरकारी पैशांनी हॉल उभारतात आणि त्याला आपल्या आई-वडिलांचे नाव देतात. या हॉलची चावी स्वत:च्या कार्यकर्त्यांकडे दिली जाते आणि त्या जागेवर कब्जा ठेवला जातो. स्थानिक आमदारांकडून हे हॉल त्यांच्या मालकीचे असल्यासारखे वापरले जातात. या आमदाराने आयुष्यभर लग्नाचे हॉल बनवण्याच्या नादात आदिवासी, बिल्डर्स आणि गरिबांच्या जागा लाटल्या. असा आरोप मनसे नेते अविनाश जाधव यांनी केला आहे.
ही जागा म्हाडाची आहे. येथे एक उद्यानासाठी रितसर काम देण्यात आले आहे. ही महापालिकेची कारवाई नव्हती. येथील मठ इतर ठिकाणी स्थलांतरित केले जाणार आहे - उपायुक्त मनीष जोशी
0 टिप्पण्या