Top Post Ad

समविचारी पक्षांशी स्वतंत्रपणे आघाडी करुन काँग्रेस मुंबई महानगरपालिका निवडणुक लढणार

मुंबईच्या भविष्यासाठी तडजोडीपेक्षा विकास, द्वेषापेक्षा सहकार्य, विभागणीपेक्षा सर्वसमावेशकता आवश्यक आहे. मुंबईच्या भविष्यासाठी कोणताही विवाद नव्हे विकास महत्त्वाचा आहे आणि तो सर्वांगीण, सर्व समावेशक, तसेच सर्वांना बरोबर घेऊन जाणारा मानवीय चेहऱ्याचा असला पाहिजे. या निवडणुकीत महापालिकेशी संबंधित मुद्देच केवळ चर्चिले गेले पाहिजेत, यासाठी विवाद नव्हे तर विकासाच्या मुद्यावर काँग्रेस पक्ष समविचारी पक्षांशी स्वतंत्रपणे आघाडी करुन लढेल असे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व तेलंगणाचे सहप्रभारी सचिन सावंत यांनी म्हटले आहे.मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्ष स्वतंत्रपणे का लढत आहे, यासंदर्भात सचिन सावंत यांनी राजीव गांधी भवन येथे पत्रकार परिषदेत पक्षाची भूमिका मांडली. या पत्रकार परिषदेला प्रवक्ते आणि माध्यम समन्वयक सुरेशचंद्र राजहंस, नगरसेविका शितल म्हात्रे व  निजामुद्दीन राईन उपस्थित होते.


सचिन सावंत पुढे म्हणाले की, काँग्रेसची संविधानवादी, लोकशाही व सर्वधर्मसमभावाची विचारधारा असून त्याच्याशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. काँग्रेस पक्षाची विचारधारा ही संविधान, लोकशाही, न्याय, समता, बंधुता आणि सर्वधर्मसमभाव या मूल्यांवर आधारित आहे. आज देशात दोन विचारधारांचा संघर्ष स्पष्टपणे दिसतो आहे, देशाची एकता-अखंडता अबाधित ठेवू इच्छिणारी विचारधारा काँग्रेसची असून त्याचे नेतृत्व राहुल गांधी करत आहेत तर दुसरी विचारधारा ही भाजप- आरएसएसची आहे, जी सत्ता मिळवण्यासाठी धर्म, जात, भाषा आणि पंथांमध्ये फूट पाडते, अविश्वास आणि द्वेष पसरवते. या विचारसरणीचे नेतृत्व नरेंद्र मोदी करत आहेत. देश मजबूत व्हायचा असेल तर काँग्रेसचा विचार घराघरात पोहोचणे आवश्यक आहे. बीएमसी निवडणुकीत प्रत्येक बूथवर हा विचार पोहोचवण्यासाठी काँग्रेसची स्वतंत्र भूमिका आवश्यक आहे.  

भाजपच्या धार्मिक ध्रुवीकरणाच्या राजकारणाला काँग्रेसचा ठाम विरोध आहे. भाजप मुंबईत हिंदू–मुस्लिम ध्रुवीकरण करून राजकीय फायदा उठवण्याचा प्रयत्न करत आहे. वास्तविक पाहता रस्ते, पाणी, आरोग्य, शिक्षण, निवास, प्रदूषण, हे महत्वाचे प्रश्न बाजूला ठेवून निवडणूक फक्त धर्मावर नेली जाते. भाजप नेत्यांची वक्तव्येही चिथावणीखोर आहेत,“मुंबईत मुसलमान महापौर होईल.” “मुंबईत घुसखोरी वाढली आहे.” “मशिंदीमध्ये घुसू….” अशा विधानांनी शहराचे वातावरण विषारी बनवले जाते. प्रदूषित सामाजिक वातावरणात प्रगती होत नाही. हीच कारणे दाखवून उद्योग मुंबईतून गुजरात व इतर राज्यात नेले आहेत. सर्वांचा समान विकास झाला तरच मुंबई खऱ्या अर्थाने आदर्श आंतरराष्ट्रीय शहर बनेल आणि ते काम काँग्रेसच करू शकते असे सचिन सावंत म्हणाले..

मनसेने अनेक वर्षांपासून मराठी भाषेच्या अभिमानाच्या नावाखाली द्वेष व भीती निर्माण केली आहे, हे मुंबईच्या सामाजिक सलोख्याला तडे देणारे आहे. मराठीचा अभिमान काँग्रेसलाही आहे पण इतर भाषिकांवर द्वेष, हल्ले किंवा भेदभाव हे मराठी अभिमानाचे लक्षण नाही. मनसेचा हिंसाचाराचा इतिहास काँग्रेसला कधीच मान्य नाही. टॅक्सीवाल्यांवर हल्ले, रेल्वे भरती परीक्षेला आलेल्या युवकांवर हल्ले, परराज्यातील फेरीवाल्यांना मारहाण, दुकाने, गाड्या फोडणे, हिंसा, दहशत आणि द्वेषाचे राजकारण काँग्रेसला कधीही मान्य नाही. “मशिदीवरचे लाऊडस्पीकर उतरवा, नाहीतर आम्ही हनुमान चालिसा लावू.” “दगडाला दगड, तलवारीला तलवार.” ही राज ठाकरे यांची भाषा, मुंबईच्या बहुसांस्कृतिक, सहिष्णु वातावरणाला घातक आहे,काँग्रेस या द्वेषपूर्ण विचारधारेला स्पष्ट नकार देते.

मुंबईतील प्रत्येक नागरिकाला आज अनेक प्रश्न भेडसावत आहेत. खड्डेमुक्त रस्ते, स्वच्छ पाणी, कचरा व्यवस्थापन, पुराचा कायमस्वरूपी तोडगा, फेरीवाल्यांसाठी धोरण, महिलांसाठी पुरेशी शौचालये, उत्तम आरोग्यसेवा, गुणवत्तापूर्ण BMC शाळा, परवडणारी घरे, भ्रष्टाचारमुक्त प्रशासन, कंत्राटदार, बिल्डरांच्या प्रशासनाच्या भ्रष्ट युतीतून मुंबईकरांची सुटका, प्रदूषणमुक्त, सुरक्षित, हिरवी मुंबई. धर्म–भाषा–जात यांच्या नावाने राजकारण करणाऱ्या पक्षांना या प्रश्नांशी काही देणेघेणे नाही. काँग्रेस मुंबईच्या या वास्तव प्रश्नांना केंद्रस्थानी ठेवून निवडणूक लढणार आहे, असेही सावंत म्हणाले

मुंबई भाषा, धर्म, जात, परप्रांतीय–स्थानीक यांच्या भिंती ओलांडून उभी राहिलेली आहे. गुंतवणूक आणि रोजगारासाठी शांतता, स्थैर्य आणि सामाजिक सौहार्द अत्यावश्यक आहे. परप्रांतीयांवर टीका करणारे हे विसरतात की मुंबईत येणाऱ्यांमध्ये मोठा हिस्सा महाराष्ट्रातील लोकांचाच आहे. मुंबईत स्थलांतर केवळ युपी बिहार मधून नाही, तर ठाणे, रायगड, रत्नागिरी, कोकण, विदर्भ, मराठवाडा या महाराष्ट्रातील जिल्ह्यांतून मोठ्या प्रमाणावर होते. म्हणजेच “बाहेरचे” म्हणताना ते अनेकदा आपल्याच भावांना-बहिणींना लक्ष्य करतात. महाराष्ट्राबाहेर गेलेल्या मराठी लोकांनासुद्धा अशाच भाषिक द्वेषाचा सामना करावा लागतो. म्हणून मुंबईत अशा द्वेषाचे राजकारण वाढवणे म्हणजे आपल्या स्वतःच्या लोकांनाच इजा देणे आहे. काँग्रेस स्वतंत्रपणे लढते कारण आम्हाला मुंबईसाठी स्वच्छ, पारदर्शक, समतावादी प्रशासन द्यायचे आहे. आज मुंबईची जमीन, हक्क, संसाधने ही काही विशेष लोकांना  विकली जात आहेत, हे थांबवण्यासाठी आणि विकासाला मानवी चेहरा देण्यासाठी काँग्रेस कटिबद्ध आहे, असे सचिन सावंत म्हणाले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com