Top Post Ad

सुलक्षणा पंडित आणि संजीव कुमार : प्रेम जे शब्दांत कधी आलंच नाही…

   बॉलीवूडच्या झगमगाटात असंख्य प्रेमकथा उमलल्या, काही फुलल्या, काही कोमेजल्या… पण काही अशा होत्या ज्या कधी सुरुवात झाली की शेवट हेच कळलं नाही. अशीच एक कथा गाण्यांइतकी मधुर पण शेवटपर्यंत न उच्चारलेली म्हणजे सुलक्षणा पंडित आणि संजीव कुमार यांचं प्रेम. सुलक्षणा पंडित या अतिशय सुंदर आणि मधुर आवाज असलेल्या अभिनेत्री आणि गायिकेचं संजीव कुमारवर प्रेम होतं, तिने त्यांना प्रपोज देखील केलं होतं पण संजीव कुमारचा जीव हेमा मालिनीवर जडला असल्याने त्यांनी सुलक्षणा पंडित यांना नकार दिला. आयुष्यात कधी, केव्हा, कोण कोणाला का आवडेल किंवा का आवडणार नाही, हे सांगणं अतिशय कठीण आहे! प्रेमाची व्याख्या तशी कुणाला करता आलीच नाही!

        सत्तरच्या दशकात सुलक्षणा पंडित हे नाव गायकीत झळकत होतं. घराणं संगीतमय पंडित परिवारात जन्मलेली सुलक्षणा ही स्वर आणि अभिनयाचा संगम आणि सुरांच्या दुनियेत वाढलेली. त्याच काळात संजीव कुमार म्हणजे अभिनयातील एक विद्यापीठच! “कोशिश”, “आंधी”, “शोले”, आणि “अनामिका” सारख्या चित्रपटांनी त्यांना अभिजात उंची गाठून दिली होती. दोघांची भेट झाली एका चित्रपटाच्या निमित्ताने व्यावसायिक ओळखीतून हळूहळू एक भावनिक नातं आकार घेत गेलं. सुलक्षणाच्या मनात संजीवसाठी एक आदर, एक आकर्षण आणि एक प्रेम निर्माण झालं, जे तिनं कधीही लपवलं नाही. सुलक्षणा पंडित यांनी अनेक मुलाखतींमध्ये स्पष्ट सांगितलं “मी संजीव कुमार यांना मनापासून प्रेम केलं.”

त्यांचं प्रेम एकतर्फं होतं, पण शुद्ध आणि निखळ होतं. संजीव कुमार मात्र त्यांच्या आयुष्यात हेमा मालिनीसाठीचं आपलं प्रेम घेऊन फिरत होते आणि ते प्रेमही अधुरं राहिलं. एकाच्या हृदयात दुसऱ्याचं नाव, आणि तिसऱ्याच्या मनात वेदनेचा प्रवाह. या त्रिकोणात सुलक्षणाचं आयुष्य हळूहळू विरघळत गेलं. सुलक्षणाच्या आवाजात अनेक गाणी होती, पण काही गाणी जणू तिच्या स्वतःच्या भावना गात होती, सुरांत जपलेलं प्रेम जसे “तू इस तरह से मेरी जिंदगी में शामिल है…” हे गाणं जरी चित्रपटासाठी रेकॉर्ड झालं, तरी प्रत्येक ओळीमध्ये तिच्या अधुऱ्या प्रेमाची जाणीव होती. 

        संजीव कुमार मात्र त्यांच्या शांत, अंतर्मुख स्वभावामुळे कधीच काही बोलले नाहीत. पण त्यांच्या डोळ्यांत ती गहन वेदना आणि न बोलेले शब्द दिसायचे, जे फक्त सुलक्षणासारख्या संवेदनशील मनालाच जाणवले असतील. संजीव कुमार शेवटपर्यंत अविवाहित राहिले. त्यांच्या निधनानंतर सुलक्षणा पंडित कोलमडून गेल्या. त्यांनीही पुन्हा लग्न केलं नाही आणि अनेक वर्षं एकाकीपणात जगल्या. त्यांच्या मनात एकच सत्य कायम होतं. “जे प्रेम कधी मिळालं नाही, तेच खरं होतं.” त्यांची अधूरी कहाणी, पण अमर नातं. ही कथा ना पत्रांत लिहिली गेली, ना गाण्यांत पूर्ण झाली पण ती भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वांत हृदयस्पर्शी प्रेमकथा ठरली. सुलक्षणा आणि संजीव कुमार यांनी जगाला शिकवलं. प्रेम म्हणजे मिळवणं नाही, तर शांतपणे आठवणीत जगणं होय. त्यांचं नातं काळाच्या पलीकडे गेलं, एकानं गाण्यांतून बोललं आणि दुसऱ्यानं नजरेतून. दोघांनीही जीवनभर मौन पाळलं, पण त्या मौनातही शब्दांपेक्षा गहिरं प्रेम होतं…कदाचित सुलक्षणा कालपर्यंत त्या स्वरांत हरवत होती  आणि संजीव कुमारच्या स्मितात ती अजूनही उत्तर शोधत होती. प्रेम कधी-कधी संपत नाही, ते फक्त एक सुरात रूपांतरित होतं… 

         सुलक्षणा पंडित यांचं पारिवारिक जीवन कटकटींनी भरलेलं होतं. त्यांचे वडील, दोन्ही काका, (एक काका पंडित जसराज), बंधू प्रसिद्ध संगीतकार जतीन-ललित, मंधीर हा अजून एक भाऊ देखील संगीतकार, एक बहीण सुप्रसिद्ध अभिनेत्री विजयता, तिचा नवरा सुप्रसिद्ध संगीतकार आदेश श्रीवास्तव, चुलत बहीण सुप्रसिद्ध गायिका हेमलता... सारेच संगीत क्षेत्राशी संबंधित असले तरी त्यांचं प्रत्यक्ष जीवन मात्र संगीतमय होऊ शकलं नाही. वडिलांनी दुसरा विवाह केला आणि या परिवाराला गरिबीचे दिवस आले. त्यांनी गायन सुरु केलं. हळूहळू अभिनय क्षेत्रातही उतरल्या. दोन्ही क्षेत्रात त्यांनी नाव कमावलं. पण आईचं, मोठ्या भावाचं निधन, सिनेसृष्टीत अपेक्षित यश न मिळणं, अपघात (बाथरूममध्ये पाय घसरून पडणं) अशा अनेक घटनांनी त्यांच्यावर मानसिक आणि शारीरिक आघात केले. संजीव कुमारसाठी त्या कायम अविवाहित राहिल्या! त्यांच्या अपुऱ्या प्रेम कहाणीसाठी 'सरस्वती चंद्र' चित्रपटातील गीतकार इंदीवर यांनी लिहिलेल्या आणि लता मंगेशकर यांनी गायलेल्या या ओळी आठवतात. 

तन से तन का मिलन हो न पाया तो क्या
मन से मन का मिलन कोई कम तो नहीं
खुशबू आती रहे दूर से ही सही
सामने हो चमन कोई कम तो नहीं
चाँद मिलता नहीं सबको सँसार में
है दिया ही बहुत रोशनी के लिए
त्यांच्या जीवनातील संजीव कुमार नावाचा दिया गेला हा दिया गेला आणि त्या डीप डिप्रेशनमध्ये गेल्या!

दिल में ऐसा दर्द छुपा है, मुझसे सहा न जाए
कहना तो चहू अपनों से मई, फिर भी कहा न जाये
आँसू भी आँखों में आये, चुपके से पी जाऊ
जीवन के पिंजरे में, मनन का ये पंछी
कैसे कैद से छूटे
जीना होगा इस दुनिआ में, जब तक साँस न टूटे
दम घुट ता है अब सांसो का, कैसे बोझ उठाऊ
अपने जीवन के इस उलझन को कैसे मैं सुलझाऊ..

         उलझन चित्रपटातील हे सुंदर गाणं त्यांचं जीवन झालं! आयुष्यातील उलझन त्या कधीही सोडवू शकल्या नाहीत! ज्या अभिनेत्यावर जीवापाड प्रेम केलं, त्याच्याच मृत्यूच्या दिवशी तिचं निधन व्हावं! किती विलक्षण योगायोग आहे! ६ नोव्हेंबर रोजी संजीव कुमार यांच्या मृत्यूनंतर जवळपास ४० वर्षांनी त्याच तारखेला त्यांचा मृत्यू झाला! प्रतिभासंपन्न अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांना भावपूर्ण श्रद्धांजली!

  • प्रवीण बागडे 
  • नागपूर 
  • मो.क्र. ९९२३६२०९१९

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com