_*'लोकसत्ते'चे बनावट व प्रक्षोभक संपादकीय, कामगारांनी प्रतिकात्मकरित्या ठाण्यात गोखले रस्त्यावरील लोकसत्ता' कार्यालयासमोरच जाळले'...*_
*कामगारविश्वावर '४ काळ्या कामगार-संहितां'चा बुलडोझर फिरवणाऱ्या भाजप-संघीय NDA सरकारचा आणि गिरीश कुबेरांसारख्या, प्रसारमाध्यमातील त्यांच्या मेंदूविक्या 'बोलक्या बाहुल्यां'चा...'धर्मराज्य पक्षा'तर्फे व कामगारवर्गाकडून ठाण्यात तीव्र निषेध!*
सोमवार, दि. २४ नोव्हेंबर-२०२५च्या लोकसत्ता-'संपादकीय लेखाला जाणिवपूर्वक *"तळपत्या तलवारीचे म्यान",* असं शीर्षक देत, पद्मश्री कामगार-कवी कै. नारायण सुर्वे यांचा, आपल्या बुद्धीकौशल्याने 'अवमान' करणाऱ्या आणि त्या लेखातून *"कामगार नेते, हे नेते कमी आणि खंडणीखोर अधिक असेच आहेत",* असं समस्त *'कामगार-चळवळी'बाबत अपप्रचार करणारं, अत्यंत बेजबाबदार व संतापजनक वक्तव्य करणाऱ्या 'भांडवली-दलाल' गिरीश कुबेर यांचा कामगारांकडून लोकसत्तेचे अंक जाळून तीव्र निषेध करण्यात आला!*
..तत्पूर्वी, लोकसत्तेसारख्या वृत्तपत्रीय 'गोदी-मिडीया'ने, 'अस्पृश्य' मानलेले...धर्मराज्य पक्षाचे अध्यक्ष व महाराष्ट्रभरातील संपूर्ण कामगारविश्वात ज्यांचं नाव दीर्घकाळ दुमदुमतंय, असे झुंजार कामगार नेते 'राजन राजे' यांनी, 'लोकसत्ते'च्या हिणकस संपादकियावर संतप्त प्रतिक्रिया नोंदवणारा, एक खरमरीत लेख समाजमाध्यमातून प्रसारीत करत, पत्रकार-जगतातील या दलाली-ढोंगी प्रवृत्तीचा जाहीर निषेध केला होता,* ज्याला सगळ्या कामगार जगतातून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला! त्यातच, कामगारविश्वातील संतप्त भावनेला सनदशीर मोकळी वाट करुन देणारा, लोकसत्ता-संपादकीय-दहनाचा जाहीर कार्यक्रम ठाण्यात काल, दि. २५ नोव्हेंबर-२०२५ रोजी सायंकाळी पार पडला.
राजन राजे यांच्या खांद्याला खांदा लावून सदर निषेधाच्या कार्यक्रमात...काँग्रेसच्या अर्थविभागाचे प्रमुख व नेते विश्वास उटगी, समतेच्या चळवळीतील एक अग्रणी ॲड. नाना अहिरे, आंबेडकरी चळवळीतील जाज्वल्य विचारवंत-कार्यकर्ते आनंदा ओव्हाळ व धर्मराज्य पक्षाचे उपाध्यक्ष नितीन देशपांडे, धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघाचे सचिव समीर चव्हाण व पदाधिकारी सचिन शेट्टी; तसेच, विविध कंपन्यांतील कामगारांनी हिरिरीने सहभाग घेतला.
"तळागाळातील जनतेला कायम लुबाडणाऱ्या व श्रमिकांच्या रक्तघामाचं 'वरकड-मूल्य' ओरपणार्या भांडवलशाहीचे निर्लज्ज समर्थन करत भांडवलदारांच्या चरणांवर आपला मेंदू अर्पण करणाऱ्या व त्या व्यवस्थेचे मोठे 'लाभार्थी' असणाऱ्या *गिरीश कुबेरांना...खुशाल, राष्ट्रीय संपत्तीच्या निर्मात्याची तळपती तलवार 'म्यान' होण्याची स्वप्न पडू द्यात; पण, टोकाच्या अन्याय-अत्याचार-शोषणाने कामगारविश्वातला ज्वालामुखी आतून धगधगतो आहे आणि तो कुठल्याही क्षणी प्रस्फुटीत होण्याचा देशाला मोठा धोका आहे",* असा इशारा देत...राजन राजे यांनी तासाभराच्या आपल्या तडफदार भाषणातून, गिरीश कुबेर बनावट अग्रलेख लिहिल्याबद्दल यांच्यावर अतिशय जळजळीत शब्दात टीका केली. शिवाय, भाषणातून आपल्या भांडवली-हितसंबंधांची जपणूक करणाऱ्या व 'संपादकीय-हक्का'चा सर्रास गैरवापर करत जनतेची फसवणूक, दिशाभूल करणाऱ्या 'कुबेरी-प्रवृत्ती'चा मुखवटाही टराटरा फाडला.
ते पुढे म्हणाले की, "४ काळ्या कामगार-संहितांद्वारे कायम नोकऱ्या संपवण्यातून, कामगार-चळवळ साफ कमकुवत करण्यातून...सगळ्या कामगार-कर्मचारीवर्गावर 'गुलामगिरी' लादण्याच्या भाजप-संघीय सरकारी-धोरणाचं, 'आता नव्या कायद्यांतून कामगारांचं चांगभलं होणार', असं बनावट-विसंवादी 'कुबेरी' समर्थन म्हणजे, *'दहशत-जबरदस्तीने बलात्काराला सामोरं जावं लागणाऱ्या स्त्री संदर्भात, बलात्कार 'एन्जॉय' करण्याची संधीच तिला उपलब्ध होतेय',* असं म्हणण्यासारखं, ते एक भयंकर गुन्हेगारी-प्रतिपादन आहे. गिरीश कुबेर, *जर कामगार नेत्यांना खंडणीखोर' म्हणत असतील; तर, त्यांना आव्हान आहे की, अशांना त्यांनी कायद्यासमोर आणून त्यांना कडक शासन करावच; त्यात एखादा जरी डाव्या चळवळीतला पुढारी आढळतो, का ते बघावंच!"*
राजन राजे यांनी आपल्या शब्दांच्या अंगारातून लोकभावनेला प्रकट करताना ज्या लोकसत्तेतून नारायण सुर्वेंचा अवमान करण्यात आला, त्याच्या संपादक कुबेरांसह, अवघ्या भांडवल-व्यवस्थेला...पुन्हा एकवार नारायण सुर्वेंचा जाणिवपूर्वक ज्वलंत परिचय व जागर करुन देताना म्हटलं, "कुसुमाग्रज प्रतिष्ठानातर्फे २००४ साली नारायण सुर्वेंना 'जनस्थान-पुरस्कार' देताना त्यांच्या गौरवार्थ निवेदकाने जी प्रदीर्घ कविता म्हटली होती, त्यातील चार ओळी आठवतात...आणि, आठवतात ते नारायण सुर्वेंचे पाण्यात बुडून गेलेले डोळे!
*'आठवतं का रे तुला नारायणा, याच हमरस्त्यावर वाळत घातली होतीस तू स्वतःची आतडी कितीकदा...आणि, हिशोब केला होतास, एवढी आतडी पुरतील का, हे जग करकचून बांधायला आणि एकदा बांधल्यावर ते बदलायला'...* असा हा, *'Poet of the Proletariat'* कुठे आणि गिरीश कुबेर नावाचा भांडवली-व्यवस्थेच्या हातातला मिठू मिठू बोलणारा 'पोपट' कुठे? *अनैतिकरित्या गलेलठ्ठ पगार घेत, भांडवली-व्यवस्थेचे लाभ 'स्वांतसुखाय' ओरपणारे, गिरीश कुबेर हे एक भांडवली-दलाल; तर, नारायण सुर्वे म्हणजे, कार्ल मार्क्सच्याच पावलावर पाऊल ठेऊन उन्हापावसात तडफडत, वणवण करत शोषितांचं जग बदलायला निघालेला अवलिया!* कविवर्य नारायण सुर्वे यांचे महाराष्ट्राच्या कामगार-चळवळीवर थोर उपकार आहेत...आम्ही ४०-४५ वर्षांपूर्वी त्यांच्याच 'भाकरीचा चंद्र', 'कामगार, एक तळपती तलवार' वगैरे कविता, बॅनरवर छापून कामगार-चळवळीची मुहूर्तमेढ रोवली होती."
भाषणाच्या ओघात राजन राजे पुढे गरजले, "आपला पंतप्रधान आईबापाशी असलेला आपला जैविक-संबंध नाकारतो आणि स्वतःला 'नाॅन-बायाॅलाॅजिकल' म्हणतो; तर, *तिथे मुंबईच्या गिरणगावात जैविक-आईबापच पोटच्या पोराला नाकारतात आणि एका गिरणीसमोरच्या कचराकुंडीत फेकून देतात...* असं ते अनाथ पोरं, गंगाराम व काशीबाई नावाचं सुर्वे-दांपत्य
'सनाथ' बनवून वाढवतात; पुढे हाच 'नारायण', कामगार म्हणून 'आत्मभान' जागृत झाल्यावर, *एखादा मातीचा घडा फुटावा आणि आतला अंधार मोकळा व्हावा, 'अवघा प्रकाशू व्हावा'...* तसा त्या प्रकाशात भूतकाळाविषयी कुठलाही आकस न बाळगता, कुठलीही तक्रार न करता; आपला भवताल *'लाल बावटे की जय' म्हणत, चळवळ आणि साहित्याच्या माध्यमातून बदलायला बाहेर पडतो...* जसं अमेरिकेतल्या नवनिर्वाचित डेमोक्रॅटिक-सोशॅलिस्ट महापौर जोहरान ममदानींसाठी एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभापासून युजिन डेब्ज आणि वर्ष-२०१५ पासून बर्नी सँडर्स, 'डेमाॅक्रसी ॲट वर्क'चे रिचर्ड वोल्फ, अलेक्झांड्रा ओकॅसिओ काॅर्टेझ (AOC) आणि त्यांचा पुरोगामी विचारसरणीचा U.S. House of Representatives मधला सोशालिस्ट-डेमोक्रॅटिक विचारसरणीचा "The Squad" हा गट वगैरेंनी, पार्श्वभूमी तयार करुन ठेवली होती; तशीच, *वामनराव दादा कर्डक, शाही अमर शेख, अण्णाभाऊ साठे यांच्याकरवी नारायण सुर्वेंसाठी तयार करुन ठेवली होती;* असं म्हटलं तर वावगं ठरु नये...पण, *सुर्व्यांचा नारायण, त्यापलिकडे निघून गेला...* त्यांच्या काव्यलेखन-शैलीची तुलना जगविख्यात आंग्ल कवी 'राॅबर्ट फ्राॅस्ट'शी केली जाते. तशीचं संभाषणात्मक, अगदी बोलीभाषेसारखी शैली; पण, थेट भस्सकन आत जाऊन हृदयाचा ठाव घेणारी, कुणाच्या कुठल्या पूर्वपरवानगीविनाच अंतःकरणाला सरळ भिडणारी...म्हणून, मला वाटतं, तेव्हा जर आजच्या सारखं एकनाथ शिंदे, अजित पवार मिळून 'फडणविशी ट्रिपल-इंजिन' सरकार महाराष्ट्रात आणि मोदी-शाहांचं रासवट सरकार दिल्लीत असतं; तर, ते *'पद्मश्री' वगैरे नागरी-सन्मान मिळणं सोडाच; उलट सरकार-दप्तरी नारायण सुर्वेंचं नाव, 'शहरी नक्षलवादी' किंवा 'अर्बन नक्सलाईट' म्हणून समाविष्ट झालं असतं.* तुकारामांच्या गाथेसारखी ग्रामीण रांगडी काव्यभाषा...तळागाळातील जगण्यातल्या व्यथा-वेदनांचा वेध घेणारी; म्हणून, *त्यांचं काव्य तुकारामांच्या गाथेसारखंच अक्षय/अक्षर काव्य ठरलं...* म्हणूनच असेल कदाचित, एके प्रसंगी बोलताना, लक्ष लक्ष मराठमोळ्या मनांमध्ये 'सांस्कृतिक-पूल' बांधणारे, महाराष्ट्राचे लाडके साहित्यिक पु. ल. देशपांडे म्हणाले होते, *'अरे, केशवसुत कशाला इकडेतिकडे शोधताय? तुमचा केशवसुत, तिकडे परळमध्ये राहतोय!'*
इस्लामिक काळात वर्णव्यवस्थेला छेद देऊन कबीर, सेना न्हावी, सावता माळी, गोरा कुंभार, नामदेव शिंपी आणि तुकाराम वाणी यासारखे *बहुजनसमाजातले कवी जोरकसपणे पुढे आले खरे...* पण, जसं अमेरिकेतही जागतिक-महामंदीच्या पार्श्वभुमीवर आर्थिक-विषमता, बेरोजगारी दूर करणारं व कल्याणकारी-राज्य अथवा welfare state संकल्पना राबवणारं फ्रँकलिन रुझवेल्ट यांचं 'न्यू-डील' आलं...मात्र, पुढील काही दशकातच *'भांडवली-व्यवस्थे'नं पुन्हा उचल खात 'न्यू डील' मोडून काढलं. आणि, त्यानंतर, आजतागायत Neoliberalism किंवा नववसाहतवादाच्या नावाखाली खाजगीकरण, आपल्याकडच्या '४ काळ्या कामगार-संहितां'सारखे 'कामगारविरोधी कायदे' करुन कामगारवर्गाचं खच्चीकरण व आर्थिक-विषमते'चा नंगानाच,* अमेरिका-भारतासह जगभर चालूच ठेवलाय...तशीच, *मुस्लिम-राजवटीतील बहुजन-साहित्याच्या सुवर्ण-काळानंतर आपल्याकडच्या वर्चस्ववादी वर्णव्यवस्थेनं पुन्हा उचल खाल्ली आणि ती सगळी साहित्यिक काव्य-व्यवस्था सवर्णांच्या बेड्यात अडकून पडली; ती थेट नारायण सुर्वे यांनी २०व्या शतकाच्या उत्तरार्धात मोकळी करेपर्यंत.* त्यांनी फक्त, *कृत्रिम रंगांसोबत गिरणीतल्या वस्त्राला आपल्या घामाचाही रंग देणार्या गिरणी-कामगारांचीच व्यथा मांडली नाही; तर, पोटाची खळगी भरण्यासाठी वस्त्रहीन अवस्थेत गिऱ्हाईकाच्या घामाचा रंग आणि गंध, आपल्या देहावर चढवणार्या वेश्यांचाही 'श्रमिक' म्हणून वेगळा विचार केला...* 'कामगार' या नात्याने, वेश्यांचेही प्रश्न सोडवण्याचा व त्यांचा यातनामय प्रवास सुकर करण्याचा प्रयत्न केला होता... *कुबेरांच्या गिरीशासारखे सांपत्तिक 'कुबेरी' व पत्रकारितेतली 'सुभेदारी' उभारण्याच्या स्वार्थकार्यात ते मग्न नव्हते!"*
राजन राजेंच्या या घणाघाती भाषणानंतर, लोकसत्ते'चं दि. २४ नोव्हेंबरचं बनावट व प्रक्षोभक संपादकीय, कामगारांनी मिळून ठाण्यातील 'लोकसत्ता' कार्यालयासमोरच जाळले...विशेष म्हणजे, या 'लोकसत्ते'च्या प्रतिकात्मक दहनानंतर गोखले रस्त्यावर पडलेली राख, सुसंस्कृत-नागरिक, या नात्याने सगळ्या कामगारांनी गोळा करुन रस्ता पूर्वीसारखाच स्वच्छ करुन ठेवला!



0 टिप्पण्या