‘कामगार-कवी’ अशी सर्वमान्य ओळख असलेले पद्मश्री नारायण सुर्वे यांच्या ‘जन्मशताब्दी’निमित्त, दि. २२ नोव्हेंबर-२०२५ रोजी, सायंकाळी ५ वाजता, ठाण्यातील मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या सभागृहात “साहित्य विचार जागर” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, या कार्यक्रमात प्रज्ञा पवार, नीरजा, छाया कोरेगांवकर, कविता मोरवणकर, सुरेखा पैठणे, अनिता भारती, बबन सरवदे, शिवा इंगोले, शिवराम सुखी आदी मान्यवर कवी, आपली एक आणि नारायण सुर्वे यांची एक, अशा प्रत्येकी दोन कविता सादर करणार असल्याची माहिती, ‘कामगार-कवी नारायण सुर्वे जन्मशताब्दी महोत्सव समिती’चे अध्यक्ष व ज्येष्ठ कामगार-नेते राजन राजे यांनी पत्रकार परिषदेत दिली. ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’च्या कार्यालयात, मंगळवारी (दि. १८ नोव्हेंबर-२०२५) पार पडलेल्या या पत्रकार परिषदेत, समितीचे निमंत्रक कॉ. उदय चौधरी, अॅड. नाना अहिरे, कॉ. अविनाश कदम, आंबेडकरी विचारवंत आनंदा होवाळ, आदी मान्यवर मंडळी उपस्थित होती. , दि. २२ नोव्हेंबर-२०२५ रोजी, होणाऱ्या कविवर्य नारायण सुर्वे यांच्या, “साहित्य विचार जागर” या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवी अरुण म्हात्रे करणार असून, ‘महाराष्ट्र राज्य लाल बावटा शेतमजूर युनियन’चे कार्याध्यक्ष कॉ. राम बाहेती यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. तर, ‘नारायण सुर्वे यांच्या कविता आणि विचार’ या विषयावर, ज्येष्ठ आंबेडकरवादी विचारवंत अर्जुन डांगळे हे, आपले मनोगत व्यक्त करणार आहेत. यावेळी एका लघुपटाच्या माध्यमातून, कविवर्य नारायण सुर्वे यांचा जीवनपट उलगडून दाखविण्यात येणार असल्याची माहिती, समितीचे अध्यक्ष व ज्येष्ठ कामगार-नेते, राजन राजे यांनी पत्रकार परिषदेत शेवटी दिली.


0 टिप्पण्या