मुंबईमध्ये गेलच्या मुख्य पाईपलाईनमध्ये बिघाड झाल्यामुळे सीएनजीचा तुटवडा निर्माण झाला आहे, . वडाळा येथील मुख्य पाईपलाईनला झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील सीएनजीचा पुरवठा खंडित झाला आहे. ज्यामुळे रिक्षा, टॅक्सी, बस आणि खासगी वाहनाचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या बिघाडामुळे मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यातील अनेक सीएनजी पंपांवर पुरवठा थांबला आहे. दुरुस्तीला २४ ते ३० तास लागू शकतात, त्यामुळे नागरिकांना पर्यायी वाहतूक व्यवस्था वापरण्याची किंवा प्रवासाचे वेळापत्रक बदलण्याची शिफारस केली जात आहे. मात्र महानगर गॅस लिमिटेडने (MGL) आश्वासन दिले आहे की घरगुती पीएनजी (PNG) ग्राहकांना कोणताही व्यत्यय येणार नाही.
गेलच्या मुख्य गॅस पाइपलाइनला झालेल्या नुकसानीमुळे मुंबई आणि ठाण्यात अचानक सीएनजीचा पुरवठा विस्कळीत झाला असल्याची माहिती महानगर गॅस लिमिटेडने (एमजीएल) दिली आहे. परिणामी मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील अनेक सीएनजी पंपांवर पुरवठा थांबला. मुंबईतील अनेक सार्वजनिक वाहनं बसेस, ऑटो-रिक्षा आणि टॅक्सी या प्रामुख्याने एमजीएलद्वारे पुरवल्या जाणाऱ्या सीएनजीवर अवलंबून असल्यामुळे या वाहनांच्या सेवांवर गंभीर परिणाम झाला. त्यामुळे प्रवाशांसोबतच वाहनचालकांचीही प्रचंड गैरसोय झाली. . खराब झालेल्या पाइपलाइनमुळे वडाळा इथल्या एमजीएलच्या सिटी गेट स्टेशन (सीजीएस) इथं बराच काळ गॅस पुरवठा विस्कळीत झाला. ज्यामध्ये सार्वजनिक वाहतुकीच्या वाहनांना सीएनजी पुरवठा करणारे स्टेशनाचा देखील समावेश होता. सार्वजनिक वाहतुकीच्या वाहनांना इंधन पुरवठा करणारे पंप बंद पडल्याने चालकांची गैरसोय झाली. अनेक वाहनचालकांनी सीएनजीसाठी तासनतास रांगेत उभं राहावं लागत असल्याची तक्रार केली आहे. तर शहरातील अनेक भागात सीएनजी स्टेशन पूर्णपणे बंद असल्याचं दिसून आलं.दरम्यान, घरगुती वापरकर्त्यांना पाइपद्वारे पीएनजीचा पुरवठा सुरू राहील, असं एमजीएलने स्पष्ट केलं. या अडचणीच्या काळात, निवासी भागातील रहिवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून पीएनजी पुरवण्याला प्राधान्य देण्यात आलं आहे. त्यामुळे स्वयंपाकासाठी लागणाऱ्या गॅसचा पुरवठा खंडीत होणार नाही. एमजीएलने परिस्थिती सामान्य होईपर्यंत तात्पुरतं पर्यायी इंधन वापरण्याचा सल्ला व्यावसायिक ग्राहकांना दिला आहे. तर खराब झालेल्या पाइपलाइनची दुरुस्ती करण्यासाठी गेल आणि एमजीएलच्या तांत्रिक पथकांना तात्काळ तैनात करण्यात आलं आहे. आरसीएफ परिसरात पाइपलाइन खराब झाली होती, असं मत तज्ज्ञांनी नोंदवलंय. वडाळा सीजीएस इथं पूर्ण क्षमतेनं गॅस पुरवठा पूर्ववत होताच नेटवर्कमधील दाब सामान्य होईल आणि सर्व सीएनजी पंपांवर नियमित पुरवठा पुन्हा सुरू होईल, अशी माहिती एमजीएलने दिली. यावेळी कंपनीने ग्राहकांना संयम राखण्याचं आवाहन केलं आहे.

0 टिप्पण्या