Top Post Ad

अखेर सहा पोलीस कर्मचार्‍यांसह आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश

  छत्रपती संभाजीनगरमधून पुण्यात आलेल्या एका तरुणीला ताब्यात घेण्यासाठी आलेल्या पोलिसांच्या पथकाने विना वॉरंट घरात शिरुन तरुणींना जातीवाचक शिवीगाळ केल्याच्या आरोप प्रकरणी न्यायालयाच्या आदेशानंतर आता ६ पोलिसांसह ८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आयुक्तालयासह कोथरुड पोलीस ठाण्यात केलेल्या आंदोलनाला यश आले आहे. पुण्यातील कोथरुड पोलिसांनी तपासाचा भाग म्हणून मुलींसोबत  गैरव्यवहार केला होता, त्यांना मारहाण केली आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप मुलींनी केला होता. त्यानंतर मोठी आंदोलनं उभी राहिली. पोलिस आयुक्तालयात मुली आणि त्यांच्यासोबत अनेक जणांनी पोलीस आयुक्तालयात जाऊन रात्रभर ठिय्या मांडला होता. मात्र त्यानंतर पुणे पोलिसांनीच  या मुलींवर सरकारी कार्यात अडथळा निर्माण केला म्हणून गुन्हा दाखल केला. त्यानंतर या मुली पेटून उठल्या आणि त्यांनी थेट पुणे सत्र न्यायालयात याचिका दाखल केली होती, 

याप्रकरणी अखेर कोथरुडच्या 'त्या' मुलींच्या लढ्याला यश मिळालं आहे. कोर्टाकडून पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आता संबंधित पोलीसांवर गुन्हा दाखल करुन या प्रकरणाचा तपास एक सीपी दर्जाच्या अधिकाऱ्याकडून करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. आठ पोलीस कर्मचाऱ्यांवर दरोडा आणि इतर गंभीर गुन्हे दाखल करण्याची मागणी या याचिकेत करण्यात आली होती. या याचिकेवर निर्णय देताना न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिलेत. पोलिसांनी आपली ओळख सांगितली नाही. त्यांनी मुलींची तपासणी करून त्यांचा आणि त्यांच्या मैत्रिणींचा जातीय आधारावर अपमान केला, असं कोर्टानं म्हटलं आहे. या आदेशानंतर पोलिसांवर गुन्हा दाखल करण्यासाठी या मुली आणि त्यांना या लढ्यात साथ देणारे कोथरुड पोलीस ठाण्यात जाणार आहेत आणि तक्रार करणार आहे. २ ऑगस्टला एबीपी माझाने ही बातमी दाखवली होती. आता तीन महिन्यानंतर पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचा आदेश आल्याने मुलींच्या लढ्याला यश आलं आहे.

कोथरुडमधील तीन मुलींसोबत तपासादरम्यान पोलीसांकडून गैरवर्तन करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर संबंधित मुली आणि विविध संघटनांकडून पुणे पोलीस आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले होते. मात्र पोलीसांनी त्या तीन मुली आणि आंदोलन करणाऱ्यांवरच गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर संबंधित मुली आणि ज्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे, अशा आंदोलनकर्त्यांनी पुणे सत्र न्यायालयात याचिका दाखल करुन पोलीसांवर कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर न्यायालयाने सहा पोलीसांवर गुन्हे दाखल करण्याचा आणि या प्रकरणाचा तपास एक सीपी दर्जाच्या अधिकाऱ्यांकडून करण्याचे आदेश दिले होते. या निर्णयाच्या विरोधात पुणे पोलीसांनी आपली बाजू ऐकून घेण्याची विनंती केली होती. मात्र पुणे पोलीसांची बाजू ऐकून घेतल्यानंतर देखील न्यायालयाने सहा पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिलेत. हे आदेश देताना पोलीसांनी अधिकारांचा गैरवापर केल्याचं न्यायालयाने म्हटलंय.

याबाबत एका तरुणीने शनिवारी कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर पोलीस दलातील सहायक पोलीस निरीक्षक अमोल कामठे   पोलीस कर्मचारी संजीवनी शिंदे  सायबर विभागाचे पोलीस अधिकारी धनंजय सानप  विनोद परदेशी, कोथरूड पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक प्रेमा पाटील, पोलीस अंमलदार श्रृती कढणे, छत्रपती संभाजीनगरमधील निवृत्त पोलीस कर्मचारी सखाराम सानप, तसेच सहायक निरीक्षक प्रेमा पाटील यांच्या मैत्रीण यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा सहायक पोलीस आयुक्तांकडे तपास सोपविण्यात आला आहे.

छत्रपती संभाजीनगरमधून एक विवाहित महिला बेपत्ता झाली होती. ती बेपत्ता झाल्याची तक्रार सासरकडील नातेवाईकांनी तेथील पोलिसांकडे दिली होती. तांत्रिक तपासात तरुणी कोथरूड परिसरात वास्तव्यास असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर पोलिसांचे पथक पुण्यात आले. कोथरुड पोलिसांच्या मदतीने तरुणीला ताब्यात घेण्यात आले. त्यावेळी पोलिसांच्या कामकाजात अडथळा आणल्याच्या आरोपावरुन त्या तरुणींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तर  तरुणींनी पोलिसांनी जातीवाचक शिवीगाळ आणि माराहण केल्याचा आरोप केला होता. याप्रकरणात पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे करण्यात आली होती. त्यानंतर पोलीस आयुक्तालयाच्या समोर आंदोलन करण्यात आले होते. आमदार रोहित पवार हे या आंदोलनात सहभागी झाले होते. मध्यरात्रीपर्यंत करण्यात आलेल्या या आंदोलनामुळे पोलिसांनी त्यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर या तरुणींनी थेट पुणे सत्र न्यायालयात धाव घेऊन पोलिसांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी करुन याचिका दाखल केली होती.  तरुणींनी दाखल केलेल्या याचिकेनंतर याप्रकरणात सहा पोलीस कर्मचार्‍यांसह आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने नुकतेच दिले होते. त्यानंतर आज कोथरुड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com