भारताचे पहिले पंतप्रधान, भारतरत्न पं. जवाहरलाल नेहरु यांच्या, १३७व्या जयंतीनिमित्त 'धर्मराज्य पक्षा'च्या वतीने शुक्रवार, दि. १४ नोव्हेंबर-२०२५ रोजी, ठाणे शहरातील मुख्य रस्त्यांवरुन एका सांजफेरीचे आयोजन करण्यात आले होते. 'धर्मराज्य पक्षा'चे अध्यक्ष तथा ज्येष्ठ कामगार-नेते राजन राजे यांच्या नेतृत्वाखाली, पक्षाच्या ठाणे-नौपाडा येथील मुख्यालयापासून, सायंकाळी ५ वाजता सुरु झालेली ही सांजफेरी, मीनाताई ठाकरे चौक (कॅसल मिल नाका) येथील, पं. जवाहरलाल नेहरु यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ समाप्त करण्यात आली. सुमारे दीड ते दोन किलोमीटर अंतराच्या या सांजफेरीत राजन राजे यांच्या समवेत, पक्षाचे उपाध्यक्ष नितीन देशपांडे, 'धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा'चे उपाध्यक्ष रमाकांत नेवरेकर, महासचिव महेशसिंग ठाकूर, पक्षाचे प्रवक्ते समीर चव्हाण, सचिव नरेंद्र पंडित, प्रसिद्धीप्रमुख संजय दळवी, सोपान चौधरी, निलेश सावंत, सुमित कदम, मनीषा सांडभोर, भावना ओरपे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह, काँग्रेसच्या अर्थशास्त्र विभागाचे अध्यक्ष व ज्येष्ठ विचारवंत विश्वास उटगी, ठाणे काँग्रेसचे प्रवक्ते राहुल पिंगळे, सरचिटणीस महेंद्र म्हात्रे, पर्यावरण विभागाचे जिल्हाध्यक्ष मनोज डाकवे, सांस्कृतिक जिल्हाध्यक्ष स्वप्नील कोळी, प्रभाग क्र. ८चे राबोडी ब्लॉक अध्यक्ष जावेद शेख, डाव्या चळवळीतील नेते कॉ. उदय चौधरी आणि डॉ. विवेक कोर्डे इत्यादी मान्यवर मंडळी उपस्थित होती. तसेच, या सांजफेरीत 'धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा'चे कामगार सभासद व कमिटी सदस्य मोठ्यासंख्येने उपस्थित होते.
दरम्यान, जोहरान ममदानी या भारतीय वंशाच्या 'मुस्लिम-समाजवादी' विचारसरणीचे, अमेरिकेतल्या न्यूयॉर्क शहराच्या नवनिर्वाचित महापौरांच्या निवडीबाबत, त्यांच्या अभिनंदनाच्या घोषणा सांजफेरीत देण्यात आल्या. यावेळी मुंबईतील वरळीजवळील, मेट्रो स्टेशनला (जिथे जगविख्यात 'नेहरु सेंटर' असतानाही) पं. नेहरुंबद्दल आकस बाळगून, जाणूनबुजून 'सायन्स सेंटर' असे नाव देत, नेहरुंचे नाव पुसण्याऱ्या प्रस्थापित राजकीय नेतृत्वाचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करण्यात आला. याप्रसंगी, "गांधी-नेहरु का नाम लेगा, वो ही देश पे राज करेगा", "वोट चोर... गद्दी छोड" यांसारख्या गगनभेदी घोषणा देण्यात आल्या. त्याचप्रमाणे 'बालदिना'निमित्त, "भारतीय-बालकांचा आवडता नेहरु चाचा" असा गौरवपूर्ण उल्लेख करीत, मतांची चोरी करुन सत्ताधीश झालेल्या, नरेंद्र मोदींचा 'डिजिटल-चाचा' असा उल्लेख करुन, भाजपच्या धर्मविद्वेशी व बेबंदशाही राजकारणाविरोधात, सांजफेरीत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. पं. जवाहरलाल नेहरु यांच्या १३७व्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या, 'धर्मराज्य पक्षा'च्या या सांजफेरीला ठाणेकर नागरिकांकडून उदंड प्रतिसाद मिळाला. सांजफेरीच्या समाप्तीवेळी राजन राजे यांनी, पं. जवाहरलाल नेहरु यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करताना, एका लहानग्या बालकाच्या सोबतीने, देशाच्या पहिल्या पंतप्रधानांना विनम्र अभिवादन केल्याने, त्यांची ही कृती समस्त ठाणेकर नागरिकांसाठी कौतुकाचा विषय ठरली.

0 टिप्पण्या