Top Post Ad

*ज्येष्ठ बौध्दजन महासंघाची नवी मुंबईत स्थापना*

 बौध्द समाजातील ज्येष्ठ नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांची सोडवणूक करतानाच विविध क्षेत्रातील त्यांचे ज्ञान आणि अनुभवाचा लाभ नव्या तरुण पिढीला मिळवून देण्यासाठी ' ज्येष्ठ बौध्दजन महासंघ ' या नव्या संघटनेची स्थापना सोमवारी नवी मुंबईत करण्यात आली आहे. त्याची घोषणा खारघर येथील सत्याग्रह कॉलेजमध्ये झालेल्या एका बैठकीनंतर करण्यात आली. शिक्षणतज्ज्ञ प्रा. डॉ. जी. के. डोंगरगावकर यांनी निमंत्रित केलेल्या त्या बैठकीला निरनिराळ्या क्षेत्रांतील अनुभव संपन्न ज्येष्ठ बौध्द कार्यकर्ते उपस्थित होते. ही बैठक ज्येष्ठ पत्रकार दिवाकर शेजवळ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीला डॉ. आनंद नरंगलकर, माजी विक्रीकर उपायुक्त रमेश चक्रे, डॉ. नीळकंठ शेरे,  ॲड. किशोर कांबळे, उत्तमराव गायकवाड, बँक कर्मचारी नेते सतीश डोंगरे, डी. जे. सोनकांबळे, एच.बी. जाधव, अरविंद खरात, ॲड. रत्नमाला डोंगरगावकर, एन. एम. वाघमारे, माधव मून, जगदीश कांबळे, सुनिल कासारे, जयश्री शेरे, तुकाराम कांबळे, बळीराम शिंदे आदी उपस्थित होते.

एएमआरडी म्हणजे मुंबई महानगर प्रदेशाची लोकसंख्या तीन कोटींपेक्षा आहे. त्यात २० टक्के म्हणजेच सुमारे ६० लाख ज्येष्ठ नागरिक असून त्यांच्यातील ६ टक्के म्हणजे साडे तीन लाखांहून अधिक जेष्ठ बौद्ध समाजातील आहेत.विशेष म्हणजे, त्यातील सुमारे ७० टक्के ज्येष्ठ बौद्ध नागरिक हे पेन्शन धारक नसल्यामुळे स्वावलंबी नाहीत, अशी धक्कादायक माहिती प्रा. डोंगरगावकर यांनी बैठकीत दिली. त्या ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक असुरक्षितता, एकाकीपण, वैद्यकीय उपचार, आपत्कालीन मदत - सेवेचा अभाव, आदी समस्यांनी घेरले आहे, असे त्यांनी सांगितले. 

राज्यातील सर्व महापालिका आणि नगर पालिकांच्या क्षेत्रांत ज्येष्ठ बौध्दजन महासंघाच्या शाखा स्थापन करून ज्येष्ठ बौध्द नागरिकांची निःशुल्क सभासद नोंदणी सुरू करण्याचा निर्णयही या नव्या संघटनेने घेतला आहे. एकट्या एमएमआरडीए क्षेत्रातच मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, उल्हासनगर, भिवंडी-निजामपूर, वसई-विरार, मीरा-भाईंदर, पनवेल या महानगर पालिका आहेत. तसेच अंबरनाथ, बदलापूर, माथेरान, कर्जत, खोपोली, पेण, उरण, अलिबाग, पालघर या नगर पालिकांचाही त्यात समावेश आहे. त्यामुळे सभासद नोंदणीचा पहिला टप्पा एमएमआरडीए क्षेत्रातच पार पाडला जाईल, अशी घोषणा ज्येष्ठ बौध्दजन महासंघाने केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com