Top Post Ad

8,000 हून अधिक झाडं लावलेल्या, जपलेल्या, वाढवलेल्या वृक्षमाता 'पद्मश्री' सालुमारदा थिम्मक्का...

       पर्यावरणतज्ञ, वृक्षमाता म्हणून ओळखल्या जाण्राया 'पद्मश्री' पुरस्कार विजेत्या 'सालुमारदा थिम्मक्का' यांचं आज निधन झालं. त्या 114 वर्षांच्या होत्या. आजवर त्यांनी 8,000 हून अधिक झाडं लावली आहेत. या झाडांच्या आईला भावपूर्ण श्रद्धांजली   114 वर्षांच्या पर्यावरणप्रेमी थिम्मक्का, आपल्या सर्वांच्या लाडक्या वृक्षमाता आज अखेरचा निरोप देत शांतपणे निघून गेल्या. पण मागे मात्र एक अमूल्य वारसा सोडून गेल्या: त्यांच्या हातांनी लावलेल्या, जपलेल्या, वाढवलेल्या हजारो झाडांची हिरवी पालवी जी पुढील पिढ्यांना त्यांची आठवण देत राहील, त्यांच्या समर्पणाची प्रेरणा जागवत राहील.  

कर्नाटकातील तुमकुरू जिह्यात जन्मलेल्या थिम्मक्का यांचे लग्न अवघ्या 12 वर्षांच्या वयात झाले. आर्थिक अडचणींमुळे शिक्षणाची संधी मिळाली नाही; खाणकामात मजुरी करतच सुरुवातीचे आयुष्य गेलं. त्यांना मुलं नव्हती, पण मातृत्वाची ओल आणि जिव्हाळा त्यांनी झाडांत शोधला. रोपांमध्येच त्यांना समाधान मिळे, आणि हळूहळू तेच त्यांचे जीवनकार्य बनले.  याच प्रेमातून तब्बल 80 वर्षांच्या अथक श्रमांत त्यांनी 8000 हून अधिक झाडं लावली, प्रत्येकाची आईसारखी काळजी घेत. पती चिक्कय्या यांच्यासह त्यांनी वडाची रोपं लावण्याची सुरुवात केली. सुरुवातीला फक्त 10 रोपं; नंतर दरवर्षी ही संख्या वाढतच गेली. हळूहळू त्यांची वृक्षारोपण मोहीम इतर गावांपर्यंत पसरली.  

कोरड्या प्रदेशात राहूनही हे दाम्पत्य पहाटेपासून संध्याकाळपर्यंत मेहनत करत राहिले. चिक्कय्या खड्डे खणत आणि थिम्मक्का प्रेमाने रोपांना पाणी घालत. या अखंड समर्पणातूनच त्या वृक्षमाता म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या. दोघांनी मिळून सुमारे 400 वडाची झाडं लेकरांसारखी वाढवली.  1991 मध्ये पतींच्या निधनानंतरही थिम्मक्का यांचा पर्यावरण संवर्धनाचा प्रवास अबाधित राहिला. त्यांच्या कार्याला प्रथम मोठी मान्यता 1995 मध्ये राष्ट्रीय नागरिक पुरस्काराच्या रूपात मिळाली. 2019 मध्ये त्यांना पद्मश्री प्रदान झाला आणि 2020 मध्ये केंद्रीय विद्यापीठ, कर्नाटकने मानद डॉक्टरेट पदवी बहाल केली.  

थिम्मक्का यांच्या उपलब्धी असंख्य आहेत; पण त्यांची सर्वात मोठी देणगी म्हणजे त्यांनी संपूर्ण देशाला विशेषत तरुणांना शिकवले की आपल्या भविष्याची दिशा पर्यावरणाच्या रक्षणात दडलेली आहे.  आज थिम्मक्का आपल्यात नसल्या, तरी त्यांनी लावलेली प्रत्येक रोप, त्यांचा वारसा, त्यांचं प्रेम आणि पृथ्वीप्रीतीचं त्यांचं कर्तव्य हे सर्व कायम हिरवाईसारखे उमलत, बहरत राहणार आहे.  तुम्ही किती वर्षे जगलात, किती पैसा गोळा केला व कुठल्या गाड्या बाळगल्या - फक्त मी आणि मी करीत स्वतचा अहंकार व पद पैसा कीर्ती प्रसिद्धी यांचा दिखावा करीत... हे महत्वाचे नाही !  विचार करा, एक झाड किती ऑक्सिजन देतेय, निसर्ग जपला जातोय, ग्लोबल वॉर्मिग तापमानावर मात केली जातेय..याची पैसे डिग्री कशानेच मोजमाप केले जाऊ शकत नाही.  


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com