या वर्षीचा 20वा आंतरराष्ट्रीय त्रिपिटक चैटिंग समारोह प्रथमच भारत आयोजित करत आहे. हा भव्य कार्यक्रम ऐतिहासिक महाबोधी महाविहार परिसरात, बोधगया येथे 2 डिसेंबर ते 13 डिसेंबर दरम्यान पार पडणार आहे. यामध्ये जगभरातून बौद्ध उपासक-उपासिका आणि भिक्षु सहभागी होतील. या अगोदरचे 19 समारोह कंबोडिया, श्रीलंका, म्यानमार, लाओस, थायलंड, व्हिएतनाम आणि अमेरिका यासारख्या देशांच्या वतीने आयोजित करण्यात आले होते. भारताला प्रथमच याचे यजमानपद मिळाले असून, हा आपल्या देशासाठी अभिमानास्पद क्षण आहे. या 10 दिवसीय समारोहा मधे बोधिवृक्षाच्या सान्निध्यात दररोज बुद्ध वचनांचे वेगवेगळ्या पदांचे पठण केले जाईल,
भिक्खूसंघाचे प्रवचन, प्रश्नोत्तर सत्र, आर्ट गॅलरी, देश-विदेशातील कलाकारांची सांस्कृतिक सादरीकरणे आणि विचार-प्रसार व सांस्कृतिक देवाण-घेवाण यांचा समावेश असेल. या कार्यक्रमात भारतातून सुमारे 20,000 उपासक-उपासिका आणि परदेशातून 5,000 हून अधिक बौद्ध उपासक, भिक्षु व भिक्षुणी सहभागी होणार आहेत. विशेष म्हणजे महाराष्ट्रातून सुमारे 10,000 श्रद्धावान उपासक-उपासिका आणि 500 वालंटियर्स या समारोहा मधे सहभागी होतील. अशी माहिती मुंबई प्रेस क्लबमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत भन्ते संघसेनाजी (प्रेसिडेंट ITCC India लेह-लद्दाख) भन्ते विनयरक्खिता (सेक्रेटरी जनरल ITCC, बंगलौर) भन्ते अग्रधम्मा (उपाध्यक्ष ITCC, अरुणाचल प्रदेश) आणि भिक्षुणी अय्या साक्य धम्मदिना (ट्रेजरर ITCC Nagpur) यांनी दिली.
मागील वर्षी 27 देशांतून 12,000 पेक्षा अधिक उपासक-उपासिकांनी नोंदणी केली होती. यामध्ये नेपाळ, लाओस, स्वीडन, बांगलादेश, म्यानमार, लाटविया, नाउरू, श्रीलंका, इंडोनेशिया, कोलंबिया, कोरिया, चीन, कॅनडा, फ्रान्स, तैवान, जर्मनी, मलेशिया आदी देशांचा समावेश होता. या वर्षी ही संख्या वाढण्याची अपेक्षा आहे. थेरवादी बौद्ध परंपरा मानणारे भारत, म्यानमार, थायलंड, नेपाळ, व्हिएतनाम, श्रीलंका, लाओस, कंबोडिया आणि बांगलादेश यांचा समावेश असेल. याशिवाय इंडोनेशिया, मलेशिया, अमेरिका, जर्मनी, जपान, कोरिया, भूतान यांसारख्या देशांचे बौद्ध उपासक-उपासिका सहभागी होतील. हे सर्वजण स्वतःच्या मातृभाषेत त्रिपिटकाचे पठण करतील भाषेतील भिन्नता असली तरीही भगवान बुद्धांचे वचन आणि जागतिक शांततेचा संदेश हा एकच आशय यामागे असेल.
या आयोजनात इंटरनॅशनल त्रिपिटक चॅटिंग कौन्सिल, लाइट ऑफ बुद्धधर्म फाउंडेशन इंटरनॅशनल आणि भारतातील 17 पेक्षा अधिक बौद्ध संघटना सहभागी आहेत. कालचक्र मैदानात 30,000 चौरस फुट क्षेत्रफळात भव्य मंच व शामियानाची उभारणी केली जात आहे, अंदाजे 25,000 लोक या कार्यक्रमात सहभागी होतील. तसेच 2 डिसेंबर रोजी होणाऱ्या उद्घाटन समारंभात बिहारचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान, कर्नाटकमचे गृहमंत्री जी. परमेश्वर, अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू आणि मंत्री चाउना सहभागी होणार आहेत. तसेच 3 ते 12 डिसेंबरदरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, किरण रिजिजू, पर्यटन मंत्री गजेंद्रसिंह शेखावत आणि रामदास आठवलेही सहभागी होतील. हे आयोजन लाइट ऑफ बुद्धधर्म फाउंडेशन इंटरनॅशनल (LBDFI) द्वारा आंतरराष्ट्रीय त्रिपिटक सुत्तपाठ परिषद (ITCC) यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात येत आहे. या दोन्ही संस्थांचा उद्देश तथागत भगवान बुद्धांच्या शिकवणींचा प्रसार संपूर्ण जगभर करणे हा आहे, जो जागतिक बौद्ध एकतेचे प्रतीक ठरेल.
लाइट ऑफ बुद्धधर्म फाउंडेशन इंटरनॅशनलच्या प्रमुख वांग्मो डिक्सी यांच्या मते, या आयोजनात ओडिशामध्ये तयार केलेल्या 220 हस्तनिर्मित सोन्याच्या बुद्ध मूर्ती दान करण्यात येणार आहेत. भारतामधील विविध बुद्ध विहार आणि संस्थांना ही भेट देण्यात येईल. विशेष म्हणजे तसेच थायलंड व व्हिएतनाम येथील उपासक-उपासिका बोधगया येथील मुख्य टेम्पल आणि सभामंच परिसराची फुलांनी सजावट करतील. 2006 साली या कार्यक्रमाची स्थापना झाल्यापासून आंतरराष्ट्रीय त्रिपिटक चैटिंग महोत्सव हा दक्षिण-पूर्व आशिया आणि भारतातील सर्वात मोठा वार्षिक बौद्ध आंतरराष्ट्रीय कार्यक्रम ठरला आहे. हे आयोजन जगभरातील भिक्षु, उपासक यांना एकत्र आणते, प्रत्येक दोन वर्षांनी हा सन्मान एका नवीन देशाला दिला जातो. पाली भाषेत त्रिपिटक पठण करून ही परंपरा सुरू ठेवली जाते. यंदा भारत- बुद्ध धम्माची मातृभूमी या आयोजनाचे नेतृत्व करत आहे आणि जगाला शांती, ऐक्य आणि ज्ञानाचा संदेश देणार आहे.
2 डिसेंबर रोजी सकाळी 8:00 वाजता जगभरातील बौद्ध देशांच्या झांकी सह एक भव्य आंतरराष्ट्रीय बौद्ध परिक्रमा होणार आहे. बोधगया शहरात श्रद्धा आणि संस्कृतीचे रंग उधळले जातील. परिक्रमेनंतर त्रिपिटक चॅटिंगला प्रारंभ होईल. या वर्षी चुल्लवग्ग पाली आणि परिवार पाली या विनय पिटकाच्या खंडांचे पठण होईल. 'विनय' म्हणजेच अनुशासन जे भगवान बुद्धांनी आपल्या अनुयायांसाठी (भिक्षु-भिक्षुणींसाठी) सांगितले होते. समारोपाच्या दिवशी, 13 डिसेंबर रोजी, जेठियन खोऱ्यातून राजगीरच्या प्राचीन आम्रवनापर्यंत एक ऐतिहासिक हेरिटेज वॉक होणार आहे. यामध्ये 27 देशांतून 1000 हून अधिक लोक सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमामुळे बोधगया आणि आसपासच्या भागात सुमारे 25 कोटी रुपयांच्या व्यवसायाची शक्यता आहे. या महोत्सवामुळे बुद्ध धम्माचा प्रचार तर होईलच, पण स्थानिक पर्यटन व हॉस्पिटॅलिटी क्षेत्रालाही मोठा फायदा होणार आहे. देश-विदेशातून येणारे उपासक-उपासिका चार्टर्ड व शेड्युल्ड फ्लाइट्सने येथे पोहोचतील, यामुळे बौद्ध सर्किट पर्यटनालाही नवी उंची मिळेल.
लाइट ऑफ बुद्धधर्म फाउंडेशन इंटरनॅशनलच्या संस्थापक आणि कार्यकारी संचालक वांग्मो डिक्सी यांनी सांगितले की "बुद्ध धम्माच्या मातृभूमीत धम्मध्वनी परत आणणे हा मोठा सन्मान आहे. बोधिवृक्षाखाली उच्चारित होणारे प्रत्येक पठण म्हणजे शांततेची प्रार्थना आहे - केवळ आपल्यासाठी नव्हे, तर सर्व सजीवांसाठी. आजच्या काळात जेव्हा जग उपाय शोधत आहे, तेव्हा बोधगया येथील आपली प्रार्थना करुणा, ऐक्य आणि समन्वयाचा जागतिक संदेश ठरेल - हाच आमचा हेतू आहे."


0 टिप्पण्या