Top Post Ad

RSSची धास्ती

१९४० च्या आसपास माझे पुन्हा संघाच्या शाखेवरचेच रुटिन सुरू झाले. कोणत्याही रुटिनमध्ये मी कधी रमलो नाही (शाळेच्या आणि नोकरीच्याही) तसे इथे झाले. मी दांड्या मारू लागलो. यातही समस्या होतीच. मी दांडी मारली की शाखेवरून अनंतराव दुचाकीवरून थेट माझ्या घराच्या खाली येऊन हाक मारत... 'ए बाळ!'
प्रथम प्रथम अपराध्यासारखा मी जाऊन खालमानेने हजर होई. कधी कसले तरी लटके कारण सांगत असे, कधी नुसताच ढिम्म उभा राही. अनंतरावांमध्ये फरक नाही. ते त्याच प्रेमळ सुरात, फूटपाथशी एका पायाच्या आधाराने टेकवलेल्या दुचाकीवर बसल्या बसल्या मला म्हणत, 'उद्यापासून नियमित ये.' तरी माझ्या दांड्या वरचेवर सुरू. अनंतरावांना 'फेस' करण्यातली माझी सुरुवातीची भीडही आता संपली, पण त्यांचा शांत, गंभीर, प्रेमळ (आता जरी कमी प्रेमळ) सूर संपला नाही. फक्त एकच बदल झाला.
शाखेच्यावेळी एक रोज नवा स्वयंसेवक माझ्या घरी पोहोचू लागला. 'चल, शाखेवर.' झक मारत मी शाखेवर जाई. आजाराचे सोंग आणावे तर येणारा स्वयंसेवक म्हणे, मी येतो तुझ्याबरोबर डॉक्टरकडे, चल. म्हणजे तीही चोरीच. या सक्तीनंतर माझे मन हळूहळू शाखेवरून उडू लागले. नाविन्य संपले. रोज तेच तेच म्हणजे काय? यात एक निमित्त घडले.
एक दिवशी शाखेनंतर आम्हाला 'अन्तां'नी एका घरी आंबे खायला नेले. लहानपणी मी आंब्यावर पोसलेला. मी उत्साहात होतो. मग एका बशीत कापलेला हापूसचा आंबा घेऊन घरचे प्रमुख (हेही संघातले) आतून बाहेर आले आणि प्रथम माझ्यापुढेच त्यांनी हातातली बशी केली. मला घरची सवय. मी सगळी बशीच हातात पकडू लागलो तशी बशी माझ्यापासून लांब करीत ते मला म्हणाले, 'अंहं, बशी नव्हे, एकच काप घ्यायचे. आंबा सर्वांसाठी आहे, तुझ्या एकट्यासाठी नाही काही!'
सर्वांसमोर हा मला माझा घोर अपमान वाटला. सगळे माझ्याकडेच बघत मला हसताहेत असे मला वाटले.
एका बशीतल्या फोडी सर्वांत विभागून शेवटी आंबा आणणारे माझ्यापुढे उभे राहून मला म्हणाले, "स्वयंसेवकाने जे मिळेल ते सर्वांत विभागून घ्यायचे बरे." यात काय चुकीचे होते? संघात राहून त्यांनी समाजवादच सांगितला होता. ('हिंदू' समाजवाद!) पण माझे बिनसले ते बिनसलेच.
हे त्यांनी सर्वांसमोर सांगितले हे झोंबले. त्यानंतर मी शाखेत जाणे सोडले. शाखेच्या वेळी घरी सापडायला नको म्हणून जवळच्या स.प. कॉलेजच्या मैदानावर जाऊ लागलो. आमच्या वर्गातली मुले तिथे क्रिकेट खेळत. मी त्यात सामील झालो. होता होता क्रिकेट खेळण्याचा नाद मला लागला.
संघ मागे पडला याला आणखीही एक कारण घडले. मी डेक्कन जिमखान्यावर क्रिकेटच्या मॅचेस बघायला जाई. संघाची टोपी घातलेला आणि खाकी हाफपँटमधला एक तालीमबाज काळा तरुण या मॅचेस बघायला येई. खाकी चड्डी, टोपीशिवाय त्याचे चालणे, वावरणे यात तो संघातला असल्याच्या खुणा मला वाटत. एका मॅचला त्याने मला जवळ येऊन गाठले. मला खेटून तो बसला. मला त्याने नाव विचारले. माझ्या पाठीवरून जरा खालवर हात फिरवला. #मला_तो_स्पर्श_वेगळा_वाटला. त्यानंतर मला शोधून माझ्या शेजारीच तो येऊन खेटून बसू लागला. मी बाजूला सरके तेवढा तो मला जास्तच चिकटे. कधी माझ्या गळ्यात त्याचा केसाळ हात टाकी, कधी माझा नाजूक हात त्याच्या मोठ्या गुबगुबीत राकट हातात घेऊन गोंजारे, कधी गालगुच्चा घेई. मला हे आवडत नव्हते, पण याचा अर्थही कळत नव्हता आणि एक दिवस माझे लक्ष नसताना त्याने माझ्या कुल्ल्याला भला मोठा चिमटा काढला. मला दुखले, त्याहीपेक्षा धक्का बसला. तो मात्र हसत होता. मी मॅच टाकून घराकडे धावत सुटलो. तो मागून येत नाही ना, हे वारंवार पाहात होतो. त्यानंतर तो कुठे मागेपुढे नाही ना, हे पाहातच चालत असे. त्याची मी धास्ती घेतली. त्याच्या डोक्यावरची संघाची टोपी आणि खाकी अर्धी तुमान हेही माझ्या संघ सोडण्याला एक कारण होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com