वाढवण आणि वरोर परिसरात आयटीडी कंपनीच्या कामाला गावकऱ्यांचा तीव्र विरोध असून सध्या या ठिकाणी तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, आयटीडी कंपनीचे कार्यालय उभारण्याच्या हालचालींना स्थानिक ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. पोलिस बंदोबस्तात हे काम सुरू करण्याचा प्रयत्न होत असल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे.गावकऱ्यांचे म्हणणे आहे की हे काम बेकायदेशीर असून, हायकोर्टाकडून यावर स्थगिती आदेश (स्टे ऑर्डर) असतानाही जबरदस्तीने कार्यालयाचे उद्घाटन करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. या प्रकरणामुळे परिसरात मोठी हालचाल दिसून आली असून, गावकरी मोठ्या संख्येने ठिकाणी जमले आहेत.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार “उन्मत्त वाग कायद्याचा उल्लंघन करून पोलिस बलाचा वापर करत आहे. स्थानिक जनतेचा आवाज दडपण्याचा प्रयत्न सुरू आहे. काही दलालांच्या माध्यमातून हे काम गुपचूप सुरू करण्याचा कट रचला जात आहे. आम्ही अशा बेकायदेशीर हालचालींना कडाडून विरोध करू.”“आपल्या गावासाठी, महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी गरज पडल्यास बलिदान देऊ; पण जुलूम, अत्याचार आणि हुकूमशाही आम्ही कदापी सहन करणार नाही.”तसेच त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केला की, वाढवण बंदर परिसरातील गावांवर दडपशाही करण्याचा प्रयत्न सुरू आहे. या विरोधात संतप्त ग्रामस्थ मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले असून, पोलिस व प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.प्रशासनाकडून या प्रकरणाबाबत अद्याप अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नाही. पोलिस सूत्रांनी मात्र परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगितले आहे. दरम्यान वाढवण आणि वरोर परिसरात बंदर प्रकल्पासंदर्भातील औद्योगिक विकास व जमिनींच्या हस्तांतरावरून गेल्या काही महिन्यांपासून स्थानिक आणि प्रशासन यांच्यात वाद सुरू आहे. ग्रामस्थांनी या प्रकल्पाला विरोध करत न्यायालयात याचिकाही दाखल केली आहे.
0 टिप्पण्या