मुंबईतील महिला बचत गटांकडून निर्मित वस्तूंचे प्रदर्शन बृहन्मुंबई मुख्यालयात आज (दिनांक १६ ऑक्टोबर २०२५) भरविण्यात आले. दिवाळीनिमित्त भरविण्यात आलेल्या या प्रदर्शनाला महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. (श्रीमती) अश्विनी जोशी यांच्यासह विविध अधिकाऱ्यांनी भेट दिली. महानगरपालिका मुख्यालयातील अधिकारी, कर्मचाऱयांनी देखील या प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
महिला स्वावलंबी व्हाव्यात तसेच आर्थिकदृष्ट्या गरजू महिलांना रोजगार मिळावा, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या नियोजन विभागामार्फत महिला बचत गटांना प्रोत्साहन देण्यात येते. याचाच एक भाग म्हणून महिला व बालकल्याण योजना / दीनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय उपजीविका अभियान योजना अंतर्गत बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालय इमारतीत आज (दिनांक १६ ऑक्टोबर २०२५) महिला बचत गट निर्मित वस्तूंचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. या प्रदर्शनाला महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. (श्रीमती) अश्विनी जोशी यांच्यासह विशेष कार्य अधिकारी (महानगरपालिका आयुक्त कार्यालय) श्री. चंद्रशेखर चोरे, विविध वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट दिली. तसेच मुख्यालयातील अधिकारी, कर्मचारी, कामगारांनी प्रदर्शनाला भेट देवून वस्तूंची खरेदी केली. दीपावली सणाच्या पार्श्वभूमीवर आयोजित या प्रदर्शनामुळे बचत गटांना आर्थिक उत्पन्न प्राप्त झाले.
या प्रदर्शनात एकूण ४० दालन थाटण्यात आले होते. उटणे, अगरबत्ती, ज्यूट बॅग्ज, इमिटेशन ज्वेलरी, मोत्यांचे दागिने, रांगोळी, सुवासिक द्रव्ये, ड्रेस, सुशोभीत पणती, विविध प्रकारचे आकर्षक तोरण, आकाश कंदिल, बांबूच्या आकर्षक वस्तू इत्यादीसह खाद्यपदार्थ देखील या प्रदर्शनामध्ये मांडण्यात आले होते. या प्रदर्शनाला उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे संचालक (नियोजन) डॉ. प्राची जांभेकर यांनी नमूद केले
महिला बचत गटांच्या या प्रदर्शनात परळ येथील नरेपार्क विशेष मुलांच्या शाळेतील दिव्यांग विद्यार्थी रुद्र जाधव आणि दक्षेष पवार या दोघांनीही स्टॉल लावला होता. या मुलांनी स्वत: साकारलेले आकाशकंदील आणि रंगांनी सजविलेल्या पणती विक्रीसाठी ठेवल्या होत्या. महानगरपालिका आयुक्त श्री. भूषण गगराणी आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. जोशी यांनी या मुलांचे विशेष कौतुक केले. तसेच त्यांच्याकडून वस्तूही खरेदी केल्या. अधिकाऱयांनी साधलेला संवाद आणि केलेल्या कौतुकामुळे मुलांच्या चेहऱयावर हास्य फुलले.

0 टिप्पण्या