Top Post Ad

उपवन परिसरात ५१ फुट उंच भव्य विठ्ठलमुर्ती !...३१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वा. अनावरण सोहळा

ठाणे हे तलावांचे शहर म्हणून ओळखले जाते. उपवन तलाव हे ठाण्यातील पर्यटन क्षेत्र असून ठाण्याचे हरित सौंदर्य आणि येऊरच्या डोंगररांगांमुळे ते शहराचे "हृदय" बनले आहे. उपवन येथील निसर्गरम्य वातावरणामुळे सकाळ-संध्याकाळी शेकडो ठाणेकर येथे फिरायला, धावायला आणि व्यायामासाठी येत असतात. स्वच्छ पायवाटा, बसण्याची सोय आणि आकर्षक प्रकाशयोजना यामुळे हे ठिकाण निसर्गप्रेमींसाठी एक आदर्श विश्रांतीस्थान ठरले आहे. उपवन हे ठिकाण आरोग्याच्या दृष्टीने उत्कृष्ट असून तेथे वर्षभर सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर राबविले जात असतात.  उपवन येथे बांधण्यात आलेल्या घाटाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव दिल्यामुळे पहाटे पासून संध्याकाळपर्यंत येणाऱ्या पर्यटकांसाठी तलावाचा परिसर आकर्षणाचे केंद्र ठरले आहे.

 ठाणे शहरात महाराष्ट्राचे आराध्य दैवत "विठूमाऊलीला " मानणारे वारकरी सांप्रदयातील मंडळी मोठ्या प्रमाणात राहत असल्यामुळे उपवन येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घाटावर विठ्ठलाची मुर्ती उभारण्यात यावी, 
या संकल्पनेला मुर्त स्वरूप प्राप्त झाले असून उपवन तलावाच्या मनोहर परिसरात विठूमाऊलीची तब्बल ५१ फूट उंच भव्य मूर्ती साकारण्यात आली आहे.  त्याचा अनावरण सोहळा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दि. ३१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७. वा. पार पडणार आहे. याप्रसंगी विठूमाऊलीची विधिवत पुजा होईल व फटाक्यांची प्रचंड आतिषबाजी (फायर शो) होईल. तत्पश्चात सुप्रसिद्ध समाजप्रबोधनकार ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांच्या हरिकीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे. यावेळी हजारोंच्या संख्येने वारकरी समाज उपस्थित राहणार असल्यामुळे तलावाचा परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमणार आहे. 
येऊरच्या डोंगररांगा आणि हिरवेगार सौंदर्य, स्वच्छ पायवाटा, बसण्याची सोय, अलिकडेच सुरू करण्यात आलेला लेझर शो, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घाट, त्यानंतर आता ५१ फुट उंच भव्य विठ्ठलमूर्तीचा देखावा या ठिकाणाच्या आकर्षणात अधिक भर घालणार आहे. भव्य मूर्तीमुळे उपवन तलावाचा परिसर हा ठाण्याच्या धार्मिक आणि सांस्कृतिक ओळखीत एक नवा अध्याय जोडला जाईल.

सदरहू ५१ फूट उंच भव्य विठ्ठलमुर्ती कोल्हापूरचे प्रसिद्ध शिल्पकार  सतीश घार्गे यांनी साकारली आहे. मूर्तीच्या सभोवती दगडी दीपमाळांची मांडणी केली आहे. यामुळे संध्याकाळी प्रकाशाच्या झगमगाटात परिसर उजळून दिसणार आहे. उपवन तलावात फ्लोटिंग स्टेज उभारण्यात आले असून त्यावर प्रथमच किर्तनकार ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांचा हरिकीर्तनाचा कार्यक्रम होणार असल्यामुळे कार्यक्रम  पाहण्यास वारकरी सांप्रदायाला एक विलक्षण आनंद अनुभवण्यास मिळणार आहे. ठाणे जिल्ह्यांमध्ये प्रथमच एवढी भव्य विठ्ठलमुर्ती साकारण्यात आली असून दुसरी मुर्ती घोडबंदर रोड येथील कासारवडवली परिसरात असलेल्या राम मंदिर तलावाच्या बाजूला साकारण्यात येईल व त्याचेही लोकार्पण डिसेंबर महिन्यात करण्यात येणार आहे. उपवन परिसरात यानिमित्ताने दर आषाढी व कार्तिक एकादशीला मोठ्या प्रमाणावर हरिकीर्तनाचा कार्यक्रम व्हावा अशी इच्छा परिवहन मंत्री  प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com