हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे असो, उध्दव किंवा राज ठाकरे असो. या तीनही महानुभवांना मी रीयल हिरो मानत नाही. माझ्या दृष्टीकोनातून ठाकरे खानदानातील एकमेव रीयल हिरो जर कोण असेल तर ते फक्त प्रबोधनकार ठाकरे होय. त्यांच्यासारखा कर्तव्यकठोर, सडेतोड विचाराचा आणि खोट्या भाकडकथेमागचा खरा इतिहास शोधून जगासमोर निर्भीडपणे मांडणारे ठाकरे खानदानातील एकमेव ठाकरे म्हणजे फक्त आणि फक्त प्रबोधनकार ठाकरेच होत. प्रबोधनकारांची पुस्तके वाचताना ठाकरे शैलीची खरी आग, खरी धग आपल्याला जाणवत राहते. पण प्रबोधनकाराचा हा मार्ग ना हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंनी स्विकारला, ना उध्दव ठाकरेंनी स्विकारला आणि ना राज ठाकरेंनी स्विकारला. खरं तर यात तिघांचाही काही दोष नाही. बाळासाहेब ठाकरेंनी प्रबोधनकारांचा फक्त 'मराठी' इश्यू उचलून शिवसेना मोठी केली आणि शिवसेना मोठी झाल्यावर मराठीचा विषय बाजूला सारुन हिंदुत्वाचा विषय आपलासा केला.
राज ठाकरेंन हिमालयाच्या उंचीचा असणारा आपला आजोबा प्रबोधनकार इतिहासाचार्य सोडून कुडमुड्या शिवशाहीर पुरंदरेला जवळ केले. गणपतीची मुर्ती फोडण्याचे आव्हान देणाऱ्या प्रबोधनकाराच्या नातवाच्या घरातच आता गणपती येऊ लागला. उध्दव ठाकरेंचं मात्र तळ्यात, मळ्यात चालू आहे. म्हणजे ते कधी वडिलांची भूमिका उचलून धरतात तर कधी आपल्या प्रबोधनकार आज्याची भूमिका घेतात. पण खऱ्या अर्थाने हे तीनही ठाकरे चाणाक्षच म्हणावे लागतील. कारण या तिघांनाही हे चांगलंच ठाऊक होतं किंवा आहे की, जर परिपूर्ण प्रबोधनकार ठाकरे स्विकारले असते तर आजचे हे नेतेपण, हि लोकप्रियता, हे वैभव त्यांना कधीच प्राप्त झालं नसतं. कारण परिपूर्ण प्रबोधनकार होणं इतकं सोप्प नसतं. त्यासाठी आपलं संपूर्ण आयुष्य उधळून द्यावं लागतं, कफल्लक व्हावं लागतं, कलंदर व्हावं लागतं, फकिरीचं जीणं जगावं लागतं. म्हणून तर बाबासाहेबांसारख्या कलंदराशी प्रबोधनकार नावाच्या या कलंदराचं अगदी जवळचं सख्य होतं.याच प्रबोधनकारांच्या पुस्तकांचं वाटप कस्तुरबा हाॅस्पिटलमध्ये एका ओबिसी (ओरिजनल बुध्दिस्ट कम्युनिटी) असणाऱ्या एका सामान्य कर्मचाऱ्याने आपल्या निवृत्ती समारंभात केले. त्यानंतर काही निर्बुद्ध असणाऱ्या बिनडोक स्त्रियांनी या प्रकाराविरुध्द थयथयाट केला. नर्सपैकी एका नर्सने प्रबोधनकारांचे पुस्तक या कर्मचाऱ्यावर फेकून मारले. सगळे शिवसेना नेते या प्रकरणात या नर्सचा निषेध करत असताना या बाई अर्थात, शिवसेनेच्या मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर तिथे येऊन त्यांनी या नर्सची बाजू घेतली आणि विचारणा केली म्हणा किंवा ऑर्डर दिली म्हणा. त्या म्हणाल्या "या पुस्तकाचे वाटप करणार्या माणसाच्या 'आका' चा शोध घ्या.
या शोधासाठी किशोरी पेडणेकरांची आम्ही मदत करतो. हे पुस्तक वाटणार्या माणसाचे आका फक्त तीन आहेत. त्या आकांची नावे आहेत "फुले - शाहू - आंबेडकर". पेडणेकर बाई असेल हिंमत तर या आकांचे काय वाकडे करताय ते करुन दाखवा. अभ्यास नाही, वाचन नाही, अक्कल नाही. अशा या मंदबुध्दी बाईला उध्दव ठाकरेंनी महापौर करायलाच नको होते. या बाईला हे तरी माहीत आहे का की, हिला ज्या शिवसेनेने महापौर बनवले त्या शिवसेनाप्रमुखांचा बाप आहे प्रबोधनकार. ठाकरेंच्या शिवसेनेचे सुप्रिमो आहेत प्रबोधनकार. तुला महापौरांच्या खुर्चीवर बसवणारे खरे शिल्पकार आहेत प्रबोधनकार. आणि ज्या पुस्तकावर आक्षेप घेऊन तू 'आका' शोधायला निघालीस त्या पुस्तकाचे लेखक आहेत. दस्तुरखुद्द प्रबोधनकार! हिला निदान त्या संजय राउतांनी तरी समजाऊन सांगायला हवे खरं तर मला या कर्मचाऱ्याचं खुप कौतुक करावसं वाटतं. अशा समारंभात प्रबोधनकारांच्या अशा ज्वालाग्रही पुस्तकांचं वाटप करण्यासाठी खुप धाडस असावं लागतं. ऑर्थर रोड सेंट्रल जेल समोर असणाऱ्या कस्तुरबा रुग्णालयातील या कर्मचाऱ्याचा जाहीर सत्कार करुया. ओबिसी प्रवर्गातील हा कर्मचारी खरोखरच "रीयल हिरो" आहे. या भावाचं खरोखरच अभिनंदन! जयभीम!!
- विवेक मोरे

0 टिप्पण्या