उल्हासनगरात सुमारे ३०० ट्रक - टँकर वाहतूकदार असून त्यांची वाहने पार्क करण्यासाठी निश्चित अशी जागा आजवर उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. त्यामुळे त्यांना मिळेल त्या निरनिराळ्या जागी आपली वाहने अनधिकृतरीत्या पार्क करणे भाग पडत आहे. तर, दुसरीकडे त्यांचा नाईलाज समजून न घेता त्यांच्यावर भरमसाठ दंड आकारण्याचा सपाटा ट्रॅफिक पोलिसांनी लावल्यामुळे ते वाहतूकदार हैराण झाले आहेत. पत्नी रुग्णालयात अत्यवस्थ असताना धंदा बुडवून आपले वाहन तीन दिवस एकाच जागी थांबवलेल्या एका वाहतूकदारावर तब्बल १७ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आल्याचेही उजेडात आले आहे. त्यामुळे ट्रक - टँकर वाहतूकदारांत कमालीचा असंतोष पसरला आहे. पार्किंगला स्वतंत्र जागा मिळण्यासाठी महानगर पालिकेने ' ट्रक टर्मिनल ' उभारावे, अशी मागणी तीव्र झाली आहे. या मागणीसाठी उल्हासनगरच्या महापालिका आयुक्त मनीषा आव्हाळे यांची
उल्हासनगर - कल्याण ट्रक, टँकर ओनर्स वेल्फेअर अससिएशनच्या पडाधिकाऱ्यांनी नुकतीच भेट घेतली. माजी नगरसेवक आणि पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे ठाणे जिल्हा अध्यक्ष प्रमोद टाले यांच्या नेतृत्वाखालील त्या शिष्टमंडळात संघटनेचे अध्यक्ष कुलविंदरसिंग बैस, उपाध्यक्ष मस्तराम धिमाण,सचिव प्रमोद शिंदे यांचा समावेश होता. ट्रक टर्मिनलचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत भरमसाठ दंड आकारण्याची मनमानी थांबवण्याचे आदेश ट्रॅफिक पोलिसांना द्यावेत, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.विठ्ठलवाडी येथील अंब्रोसिया हॉटेलच्या मागे आठ एकराचा एक भूखंड उपलब्ध आहे. त्यावर ट्रक टर्मिनल उभारण्यात यावे, अशी मागणी जुनीच आहे. त्यासाठीचा प्रस्ताव पालिकेच्या महासभेत आपण स्वतः मांडला होता, याची आठवण प्रमोद टाले यांनी पालिका आयुक्त मनीषा आव्हाळे यांना शिष्टमंडळासह बोलताना करून दिली.भूखंडापूर्वी शहाड येथील एक भूखंड आरक्षित करण्यात आला होता. पण नंतर ते आरक्षण उठवून तो भूखंड एका बिल्डरच्या घशात घालण्यात आला. त्यामुळे उल्हासनगरच्या ट्रक - टँकर वाहतूकदार टर्मिनलपासून वंचित राहिले आहेत, असा आरोप त्यांच्या संघटनेने केला आहे.

0 टिप्पण्या