*चार्ल्स डिकेन्स* हे आपल्यासोबत कायम एक होकायंत्र ठेवत असत. उत्तरेकडे तोंड करून झोपलो नाही तर आपल्याला मृत्यू गाठेल असे त्यांना वाटत असे ते जिथे जिथे गेले तिथे होकायंत्र त्यांच्यासोबत होते आणि ते उत्तरेकडे डोके ठेवून झोपत. निळी शाई ही लवकर सुकते असे त्यांचे मत होते म्हणून ते कायम निळ्या शाईनेच लेखन करत.
*सॉमरसेट मॉम* स्वतःला अंधविश्वासू मानत नसत. मात्र आपल्या संदर्भ पुस्तकातील वाचलेल्या पानावर, लिहिलेल्या तावांवर, घराच्या प्रवेशद्वारावर, आपल्या खेळण्यातील पत्त्यांच्या प्रत्येक पानावर दुष्ट नेत्राचे चिन्ह अंकित करण्याचा त्यांचा परिपाठ होता. लिहिताना ते आपल्या सोबत एक मंत्रीत धागा (तावीजसदृश) कायम बाळगीत असत.
*व्हिक्टर ह्युगो* जेव्हा "हंच बॅक ऑफ नॉसेडेमस" लिहायला सिद्ध झाले, तेव्हा त्यांनी अगदी कमी काळात हे लेखन पूर्ण करण्याची स्वतःलाच एक अट घालून घेतली. शाईची एक पूर्ण बाटली बाजारातून खरेदी करून आणली. आणि आपल्या घरातच त्यांनी स्वतःला कैद करून घेतले. बाहेर जायचा कधीही मोह होऊ शकतो म्हणून आपल्या बाहेरच्या पोशाखाच्या कपाटाला टाळे लावले आणि कधीही बाह्या मागे करून लेखन करता येईल असा एक डबल स्वेटर घालून ते लेखन करत राहिले. लेखन कार्य मर्यादेच्या आधीच पूर्ण झाले आणि शाईची बाटलीही संपली. मग या पुस्तकाला "शाईच्या बाटलीने काय प्राप्त झाले ?" या स्वरूपाचे नाव द्यावे असे मनात योजत असतानाच त्यांनी निर्णय बदलत वरील नाव दिले.
*विल्यम फॉकनर* हे जितकी व्हिस्की पीत तितका वेळ लेखन करत. जितकी जास्त नशा तितके जास्त लेखन हा त्यांचा मंत्र होता. गमतीची गोष्ट ही की ते मद्य निर्मिती कंपनीतच कामाला होते.
*सलमान रश्दी* "मिडनाइट्स चिल्ड्रेन" लिहिताना नोकरी करत होते. पाच दिवस नोकरीचे झाल्यावर ते घरी येऊन दीड तास गरम पाण्याने स्नान करत आणि नंतर लेखनाला सुरुवात करत सोमवार सकाळपर्यंत लेखन आणि झोप असे करत करत ते सोमवारी सकाळी आपल्या कामावर पुन्हा रुजू होत. नंतरच्या काळात त्यांनी रोज सकाळी तीन तास बैठक मारून लेखन केले. रात्रीच्या पेज थ्री पार्टीला जाताना ते आपण सकाळी केलेल्या लेखनाचा आढावा घेत आणि काही बदल मनात आखला तर तो दुसऱ्या दिवशी सकाळी करत.
"द काईट रनर" चे लेखक *खालीद हुसैनी* म्हणतात, "मी असे अनेक लोक पाहिले की ज्यांच्या डोक्यात एखाद्या पुस्तकाचा खर्डा तयार आहे पण त्यांनी एक वाक्यही लिहिले नसेल. लेखक होण्यासाठी तुम्हाला रोजच्या रोज लेखन करावे लागेल. तुम्हाला आवडो
न आवडो मात्र कागदावर आपले विचार उमटवत जा. सर्वांत गरजेची बाब अशी की, तुम्हाला वाचकांसाठी लिहायचे आहे ही जाणीव हवी. लिहिताना वाचक तुम्ही स्वतःच असणार आहात. त्यामुळे असे लेखन करा जे तुम्हाला स्वतःला वाचायला आवडेल. आपल्या डोळ्यासमोर जे घडतंय ते सर्व लिहून काढा. ज्यामुळे तुमच्या अनेक रात्री तुम्हाला अस्वस्थ करतील."
कलेच्या संवेदनेसाठी शारीरिक श्रमाचीही गरज असते असे मानणारे जपानी लेखक *हारी मुराकामी* हे सांगतात की, "एखादी कादंबरी लिहिताना मी सकाळी चारला उठतो आणि पाच ते सहा तास लेखन करतो. दुपारी दहा किलोमीटर धावतो किंवा दीड किलोमीटर पोहतो किंवा कधी कधी दोन्ही करतो. काही वेळ वाचन करतो व संगीत ऐकतो. रात्री नऊ वाजता मी झोपतो. अशाप्रकारे सहा महिने किंवा वर्षभर आपल्याला लिहायचे असेल तर शारीरिक श्रम जास्त आहेत. म्हणूनच कादंबरी लिहायची असेल तर स्वतः जीवित राहायचे प्रशिक्षण हवे.
*कवी एमी लोवेल* यांना लेखन करताना धुम्रपानाची सवय होती. त्या छोटीशी सिगार पीत असत. १९१५ साली त्यांच्या मनात आले जागतिक युद्धामुळे आपल्याला सिगार मिळणार नाही यास्तव त्यांनी मनीला येथून आपल्या पसंतीच्या दहा हजार सिगार मागवल्या होत्या. त्या लेखन करताना पुरुषी कपडे परिधान करत असत.
एकांत प्रिय कवियत्री *एमिली डिकिन्सन* या आयुष्यभर त्याच घरात राहिल्या जिथे त्यांचा जन्म झाला होता. त्यांचे लेखनाचे कागद घरभर विखुरलेले असत. त्या कधी पाकिटांवर तर कधी वाण्याच्या बिलाच्या मागच्या बाजूसही लिहीत. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या अनेक कविता अशा स्वरूपाच्या कागदी तुकड्यांवरच मिळाल्या. मृत्यूनंतर ७० वर्षांनी १९५५ मध्ये त्या प्रसिद्ध करण्यात आल्या.
*रांगेय राघव* हे आपली कामे स्वतःच करत असत. त्यांच्या लेखनाला लागणारी शाईदेखील ते स्वतः बनवत असत. पायाला दोरी बांधून त्या हालचालीवर चालणारा पंखा वापरून सातत्याने सिगारेट ओढत त्यांचे लेखन बराच काळ चालत असे.
अमेरिकन कथा लेखिका *युडोरा एलिस वेल्टी* यांची लेखन पद्धती अगदी आगळीवेगळी होती. एकेक पान लिहून झाले की ते आधीच्या पानाच्या खालच्या बाजूस चिकटवत असत. तिची कथा एका मोठ्या पट्टीसारखी तिला सलग पाहता यावी असा तिचा उद्देश असे.
*कैफी आजमी* जेव्हा यथायोग्य कमाई करू लागले तेव्हापासून त्यांनी माउंट ब्लॅक पेन वापरायला सुरुवात केली. त्यांच्याकडे याच कंपनीची १५ पेन होती.
*राही मासूम रजा* यांना घरात लहानग्यांचा कलकलाट, कोणतेही चालू असलेले संगीत, घरातल्यांची आपापसात चर्चा असे वातावरण असले की त्यांना तो "लेखनाचा माहोल" वाटत असे. अशा वातावरणात ते स्थितप्रज्ञासारखे लेखन करत.
*इयान फ्लेमिंग* हे सुप्रसिद्ध जेम्स बॉण्ड या व्यक्तिरेखेचे निर्माते यांच्याकडे सोन्याने मढवलेला टाईपराईटर होता व त्यावर ते आपली कादंबरी टंकलिखित करत असत.
*गॅब्रियल गार्सिया मार्कवेज* हे आपले लेखन सुरुवातीला कागदाच्या लांबलचक रीळावरच करत असत. रोज किती मीटर लेखन केले हे लिहून ठेवत असत. नंतरच्या काळात त्यांनी टाईपराईटर घेतला. नंतर त्यांनी कायम टंकलिखित लेखन केले. दोन्ही हाताची एक एक बोट वापरून ते टाईप करत. लेखन करताना आपल्या मंचकावर पिवळा गुलाब असावा असा त्यांचा कटाक्ष असे.
*ज्यां पॉल* हे असे लेखक होते की जे दोन्ही हाताने लिहू शकत. जेव्हा केव्हा दोन्ही हाताने लेखन करायचा कंटाळा येई तेव्हा ते चक्क पायाने लेखन करत.
*धर्मवीर भारती* लेखन करताना जेव्हा खाण्याकडे दुर्लक्ष करत व चहाची मागणी करत तेव्हा पुष्पा यांना कळत असे की, आज एखादी विशेष रचना मनात घोळते आहे.
*मौलियर* या नाटककाराचा मृत्यू रंगमंचावर आपल्या नाटकातील अभिनय करताना झाला. एका भ्रमिस्ट रुग्णाची भूमिका त्या दिवशी ते करत होते.
पंजाबी कथा विश्वाचे जनक *नानक सिंह* आणि हिंदी कथालेखक *मोहन राकेश* हे एखाद्या डोंगरावर जाऊन लेखन करणे पसंत करत. हिंदीत आपले लेखन टाईपरेटरवर करणारे मोहन राकेश हे सुरुवातीचे हिंदी लेखक होत.
*ब्लादिमीर नबोकोव* हे आपल्या गाडीत बसून लेखन करत. तीन बाय पाच इंच आकाराच्या कार्डवर लेखन करून त्यातील कार्डही पेपर क्लिपने जोडून ठेवत. नंतर ते छोट्या छोट्या बॉक्समध्ये ती कार्डे ठेवत. पूर्ण कादंबरी प्रसिद्धीला देताना ते क्रमांकाने बॉक्स प्रकाशकाला सुपूर्द करत.
*जॉर्ज बर्नार्ड शॉ* यांची लेखन पद्धती वाखाणण्यासारखी होती. ते रोज केवळ पाच पानेच लेखन करत. पाचव्या पानावरील शेवटचे वाक्य किंवा संकल्पना अर्धवट राहिली तरी ते लेखन थांबवत आणि दुसऱ्या दिवशी पुढचे लेखन करत. एखाद्या दिवशी साडेचार पाने लिहिल्यावर पुढे काही राहून गेले तर दुसऱ्या दिवशी साडेपाच पाने लिहून आधीचा बॅकलॉग पूर्ण करत.
*अमृतलाल नागर* सकाळी लखनऊ येथील आपल्या घरात मंचकावर बसून आपले लेखन करत. त्या मंचकाला त्यांनी नाव दिले होते "कानपूर" !
*ज्योति आणि सुरेश गुप्तारा* हे दोघे जुळे भाऊ वयाच्या तिसऱ्या वर्षापासून लिहू लागले. वयाच्या अकराव्या वर्षी त्यांनी ७०० पानी काल्पनिक कादंबरी "कॉन्फिरेन्सी ऑफ कलसपिया" लिहून पूर्ण केली. भारतात त्याचा खूप खप झाला मात्र ती त्यांनी दहा वेळा पुन्हा पुन्हा लिहून काढलेली होती. तिच्या इटालियन भाषेत प्रकाशनाधिकाराचे त्यांना साठ हजार पाउंड मिळाले. जर्मन भाषेत प्रकाशनासाठीही सहा आकडी रक्कम मिळाली. विश्वातील सर्वात लहान वयात कादंबरी लिहून अमाप पैसा मिळवणारे म्हणून हे भाऊ नावलौकिक मिळवणारे ठरले.
- *प्रा. हेमंत सुधाकर सामंत*
(हा लेख मुंबई मराठी पत्रकार संघाच्या "पत्रकार दर्पण" 2025 या दिवाळी अंकात प्रसिद्ध झाला आहे.)
0 टिप्पण्या