Top Post Ad

एकेकाळी मुंबईत ६२ गिरण्या होत्या....

 आता मुंबईत गिरण्या नाहीत.पण एकेकाळी मुंबईत ६२ गिरण्या होत्या आणि तो काळ गिरण्यांचा सुवर्णकाळ होता.गिरणी म्हणजे शंभर टक्के अर्धशिक्षीत किंवा अशिक्षीत लोकांची गर्दी असायची.अठरापगड लोकं इथे गोळा झालेले असायचे. कोकणी,घाटी,भैये आणि अण्णा अशी मिसळ असायची या सगळ्यांना एकत्र आणणारी म्हणजे गिरणी. शिक्षण नसताना खात्रीशीर रोजगार फक्त कापड गिरण्याच मुंबईत देऊ शकायच्या.गिरण्यांना ऑर्डरची कमी नव्हती.सहा सहा महीन्यांच्या ऑर्डर तयार असायच्या. तिन्ही शिफ्टमध्ये काम भरपूर असायचं .सुटीच्या दिवशी सुध्दा काम चालू असायचं, सुट्टीच्या दिवशी काम करणार्याना दिडपट पगार मिळायचा.त्याखेरीज एक हक्काची रजा मिळायची. ऑफीसर या तिन्ही पाळ्यांना ए बी आणि सी म्हणायचे .पण कामगार मात्र दिवस पाळी ,मधली पाळी आणि छल्ली पाळी म्हणायचे.

कामगारात पण चार पाच वेगळे प्रकार असायचे. कायम नोकरी असणारे जातू . तात्पुरत्या कामगारांना बदली कामगार म्हणायचे.कित्येक कामगार आठ आठ वर्षं बदली म्हणून काम करायचे. जातू होणे म्हणजे ग्रीन कार्ड मिळण्याइतकं महत्वाचं होतं. जातू झाल्यावर एक अढळ स्थान मिळायचं.एक लूम एक साचा.चार साचे म्हणजे एक जोडी .अशी एक जोडी कायम स्वरुपी त्याची व्हायची. असं झालं की त्याचा सेन्स ऑफ बिलाँगींग फार उंचावर पोहचायचा. मग त्यासाठी अर्धा तास आधी कामावर यायचा. साच्याची सफाई करायचा.साच्याखालचा केर काढायचा.त्यानी साच्यावर ठेवलेल्या फोटोला हार घालायचा.आधीच्या कामगाराकडून साच्यात काही बिघाड नाही याची खात्री करून घ्यायचा . मग पाळी संपली की ८०% एफीशीअन्सी चा रिपोर्ट छाती पुढे काढून मॅनेजरला दाखवायचा.

जातू होणं म्हणजे एक शान होती. त्याला गिरणगावात एक मानही होता. या सगळ्या जातूंचा बाप म्हणजे जॉबर. प्रत्येक जातूचं आयुष्यातलं अंतीम स्वप्न म्हणजे जॉबर होणं . एका जॉबर च्या हाताखाली तेरा साचेवाले. दोन फिटर. बारा बिगारी .एक फालतू.. एका जनरल मॅनेजरच्या अंगी असणारे सगळे गुण -अवगुण जॉबरकडे असायचे. ऑफीसरशी फक्त जॉबर बोलणार.ऑफीसरनी त्याच्या जातूंशी डायरेक्ट बोलणे देखील जॉबरला अपमानास्पद वाटायचे. एकेक जॉबर सहा सहा फुटाचा पैलवान, एका हाताच्या पकडीत लूम थांबवायची ताकद असलेले.ऑफीसरने एक अलिखीत नियम नेहेमी पाळायचा .त्याने जॉबरच्या प्रांतात ढवळाढवळ करायची नाही आणि त्यांनी ऑफीसरचा उपमर्द करायचा नाही. त्यामुळे हाताखाली दोनशे माणसं असूनही वातावरण नेहेमी खेळीमेळीचं असायचं

त्या काळी गिरण्यांमध्ये कामगारांना कसे वागवले जायचे त्याचा हा किस्सा आता वाचा !
खटाऊ आणि बाँबे डाईंग तेव्हाच्या अग्रगण्य गिरण्या समजल्या जायच्या.आपली गिरणी कशी बेष्ट आहे हा तेव्हाचा कामगार वर्गाचा चर्चेचा विषय असायचा.इतर गिरणीत जसे कामगार होते तसेच आमच्या कडे पण होते. अशिक्षीत होते दारुडे होते, कर्जबाजारी होते. काम धड करत नाही म्हणून एकही कामगाराला कधीच नोकरीतून काढून टाकले नव्हते. याचे श्रेय मॅनेजर पासून कामगारापर्यंत सगळ्यांनाच होते. याचा अर्थ असा नाही की कामगारांची बाजू घ्यायला युनीयन नव्हत्या.युनियन दोनच .एक राष्ट्रीय मिल मजदूर संघ आणि दुसरी लाल बावटा!

एक इंटकची आणि दुसरी कम्युनीस्ट. पगाराच्या दिवशी युनीयनचे दोन रुपयाचे एक तिकीट कामगार घ्यायचे. युनीयनचे लिडरही कामगारच होते. एखादा कामगार दारू पिऊन कामावर आला तर मॅनेजरच्या आधी युनियनवाल्याला कळवले जायचे.युनियनवाला त्याचं बखोट धरून त्याला गिरणी बाहेर काढायचा.त्याच्या जागी दुसरा उभा रहायचा. एक पारस्पारिक सामंजस्य करार असल्यासारखे सगळे वागायचे.डिपार्टमेंटच्या बाहेर कुठलंच प्रकरण जाणार नाही याची काळजी कामगार आपापसात घ्यायचे. कामाच्या हलगर्जीपणामुळे कुठल्याही कामगाराला कधी मिलबाहेर जायला लागले नाही पण चोरी करताना पकडलं गेलं तर एक मिनीट पण गिरणीत थारा मिळायचा नाही. पण एकदा मात्र आमच्या एका कामगाराला कामात हलगर्जीपणा केला म्हणून काढून टाकायची वेळ आली होती ती मात्र पांडू गोपाळमुळे (नाव आणि वडलांचे नाव एकत्र घेण्याची ही गिरणीची एक खासीयत).

पांडू गोपाळ पांडू भट म्हणून जास्त ओळखला जायचा. आपण भट असल्याचा त्याला फार अभिमान होता. कामात अत्यंत चुकार आणि आळशी पण युनीयनवाल्यांनी सांभाळून घेतल्यामुळे बरीच वर्षे गिरणीत टिकला होता. १३०१-४ हा त्याचा साचा नंबर.या साच्याच्या जोडीवर तो काम करायचा. आता साचा म्हणजे लूम .त्यात उभे आडवे धागे विणून कपडा बनायचा. आडवे धागे (वेफ्ट)विणण्यासाठी शटल असायचे त्याला कामगार धोटे म्हणायचे.बिमवरून उभे धागे (वार्फ) पुढे आले की धोटा आडवा फिरायचा .एका वेळी बिमवर तीन हजार चारशे धागे पुढे यायचे. पांडू भट आपली अक्कल चालवून हे काम कसे बंद पडेल आणि पर्यायानी आपल्याला आराम कसा करता येईल याच्या क्लुप्त्या शोधत असायाचा. शिस्तीचा बडगा कधी मिळायच नाही असं नव्हतं. गिरणीत कामचुकारपणाला चार आणे दंड असायचा.तीन दंड झाले की एक वॉर्नींग पास मिळायचा. तीन वॉर्नींग पास झाले की एक चार्जशीट. तेव्हाचे गिरणीतले वातावरण सगळ्यांना सांभाळून घेण्याचे होते याचा पूरेपूर फायदा पांडोबा घेत होते.

असे होता होता पांडूभटाच्या नावावर अकरा चार्जशीट जमा झाल्या होत्या. पांडोबांची मस्ती मात्र कायम होती. कामचुकारपणा अंगात भिनलेला होताच पण डोके सुपीक होते. पांडूनी एक नवी शक्कल लढवायला सुरुवात केली. कामाच्या आधी अर्धा तास पांडू हजर व्हायचा. धोट्याची (शटलची )जोडी बादलीभर पाण्यात बुडवून ठेवायचा.लाकडी धोटे पाण्यात फुगायचे. लूम ला हे धोटे जोडून विव्हींगची सुरुवात झाली की थोड्याच वेळात धोटे फायबरच्या बफरवर आपटायचे .असे दोन चार वेळा झाले की ते धोटे फुटायचे.बिम मात्र चालू असल्यामुळे उभे धागे तुटायचे.एक मोठा गुंता व्हायचा.काम थांबायचे. ह्या गुंत्याला आर्या झाला असे म्हणायचे आणि भटाचे काम संपायचे.भट बोंबलत फिरायला मोकळा. रात्रभर जॉबर आणि फालतू त्याच्या साच्यावर धागे जुळवत बसायचे. पांडूभटाच्या ह्या कुरापतीला डिपार्ठमेंट कंटाळलं. सगळे सहकारी -जॉबर -मॅनेजर त्याच्या विरुध्द गेले. पांडूभटाला एक नविन अंतीम चार्जशिट दिली गेली. चौकशी झाली. ह्याच्या बाजूने कुणीच नाही. निकाल लागला. पगाराच्या दिवसापासून पांडू गोपाळला कामावरून काढून टाकण्याचा आदेश आला.

बोर्डावर कामवरून काढून टाकण्याची नोटीस लागली. पांडूचे धाबे दणाणले. त्याची धावपळ सुरु झाली.युनियन लिडर त्याला जवळ करेनात. दयेचा अर्ज फेटाळला गेला. पगाराची तारीख (पगार दहा तारखेला व्हायचा.)जवळ आली.पांडू एक शेवटचा प्रयत्न म्हणून युनियनवाल्यांकडे गेला.त्यांनी परत हाकलून दिले. शेवटी युनियनची एक महीला नेता सत्यभामा शंकर यांना (प्रेमानी सगळेजण त्यांना भामी म्हणायचे)पांडूची दया आली. भामीनी पांडूला सांगीतलं .
"बघ पांडू , नोकरी तर गेल्यात जमा आहे पण तूला धरमशी शेठच वाचवू शकतात."
आता समस्या अशी होती की आमचे धरमशी शेठ आठवड्यातून एकदाच,बुधवारी ,अर्धा तास गिरणीत यायचे. कामगारांसमोर तर दसर्याला दोन मिनीटे यायचे.
शेठला भेटायचे कसे ?
भामीनी पांडूला कानमंत्र दिला.

पांडूनी दापोलीहून कुटुंबाला बोलावून घेतलं.चार पोरं आणि बायको.
पगाराच्या आधीचा बुधवार आला.पांडू सकाळपासून गेटवर बायकोमुलांसहीत हजर झाला होता.पांड्याचे नशीब एव्हढे चांगले की शेठची गाडी वेळेवर आली.
आता शेठ गिरणीत येणे हा बुधवारचा एक सोहळा होता.बंगल्यावरून गाडी निघाली की गिरणीत फोन यायचा.मॅनेजर लोकं धावपळ करायला लागायचे. मिलचे पटांगण ओस पडायचे. शेठची पांढरी मर्सीडीझ दुरून दिसली की फायर ब्रिगेड ते सात रस्त्यावरून येणारा रस्ता या दोन्ही बाजूची वाहतूक थांबवली जायची. वॉचमन दोन्ही बाजूनी खडी ताजीम देत उभे रहायचे. गाडी गेट वर आली की गेट ते पहील्या मजल्यावरची केबीन असे लाल कार्पेट अंथरले जायचे. ड्रायव्हरनी गाडीचे दार उघडले की शेठ पाऊल खाली ठेवायचे.
पांडू सकाळपासून गस्त घालत बसलेलाच होता. गाडी आली आणि पांडू नी स्वतःला मुलांसकट गाडीसमोर झोकून दिले. शिंदे ड्रायव्हरनी करक्चून ब्रेक दाबत गाडी थांबवली.
एकच गोंधळ. शेठ नी विचारले "शिंदे क्या हो गया ?"
पांडू गाडी के सामने सोया है " ड्रायव्हरनी उत्तर दिले.
शेठनी एक नजर टाकली."आ बाळको कोण छे"
"पांडूची पोरं आहेत शेठ"ड्रायवरनी सांगीतलं
"फिर गाडीके सामने क्युं सोये है" शेठना काही कळेना .
"पांडूको काम से निकाला हैना इसलीये सोये हय."
हा तमाशा चालू असताना पर्सनल मॅनेजर किबे धावत आले.
गाडीच्या खिडकीची काच खाली आली.
"क्या हुआ" शेठनी आता किबेंना विचारलं.
"कामगार है ,काम बराबर नही करता इसलीये कामसे निकाल दिया है."
एव्हाना पांडूची बायको देखील शेठना दिसली.ती बिचारी रडत होती
"वो बाई कौन है"?
"पांडूकी औरत है "मॅनेजरनी उत्तर दिलं .
शेठला गोंधळाचा उलगडा झाला.
मग त्यांनी सगळ्यासमोर मॅनेजरलाच विचारलं
"तमारे सू लागे छे तमे लोगो काम करो छो?
मॅनेजर बिचारे काहीच बोलले नाही.
"जवा दे ना भाई...छ हजारमां और एक चिडीया असं म्हणत पांडू भटाला पाय धरण्याची संधी न देता गाडीतून उतरून आपल्या केबीन मध्ये निघून गेले .
झाssलं . पांडू भटाला माफी मिळाली. साच्यामधून त्याची बदली स्टोअरमध्ये झाली आणि मी धरमशी शेठचा माणूस असं टिर्या बडवत म्हणायला पांडू मोकळा झाला.
येणार्या दहा पंधरा वर्षात मुंबईत औद्योगीक वातावरण बदलणार होतं. पण त्याची चाहूलही तेव्हा नव्हती.
कामगारांनी देव म्हणावे असे मालक होते.
लेखक - हेमंत ब

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com