Top Post Ad

ठाण्यातील मानपाडा येथील राजमाता जिजाऊ उद्यानाचे लोकार्पण

ठाण्यातील मानपाडा येथील हाईड पार्कसमोर असलेल्या राजमाता जिजाऊ उद्यानाचे लोकार्पण सोमवारी दुपारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी,  महापालिका आयुक्त सौरभ राव, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश म्हस्के, माजी आमदार रवींद्र फाटक, माजी महापौर हरिश्चंद्र पाटील उपस्थित होते. याप्रसंगी, उद्यान अधिक्षक केदार पाटील, रचनाकार प्रणव अनायल आणि जुईली मांजरेकर, वृक्ष मित्र आनंद पाटील यांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सोहळ्यास परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.  लोकार्पण केल्यावर सर्व मान्यवरांनी या उद्यानात फिरून तेथील झाडे, औषधी वनस्पती, नागरिकांसाठी असलेल्या सुविधा यांची पाहणी केली.

ठाण्यात विविध संकल्पनांवर आधारित उद्यानांचा विकास करण्यात येत आहे. त्यापैकीच एक अशा राजमाता जिजाऊ उद्य़ान म्हणजेच ऑक्सिजन पार्कचे आज लोकार्पण करण्यात येत आहे. लवकरच कळवा येथे नक्षत्र उद्यान विकसित केले जाईल. एकेक संकल्पना घेऊन विकसित होत असलेल्या या उद्यानांसाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही शिंदे यांनी दिली. रस्त्यावरून या उद्यानाच्या आत आल्यावर आपल्याला हवेतील फरक स्पष्टपणे जाणवतो. इथल्या औषधी वनस्पतींचे गुणधर्म ऐकल्यावर व्याधीमुक्त होण्यासाठी या उद्यानाची सैर आवश्यक असल्याचे लक्षात येते. व्याधीमुक्त होण्यासाठी या ऑक्सिजन पार्कची नागरिकांना मदत होईल, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला. ग्लोबल वॉर्मिंगमुळे पावसाचे बदलेले वेळापत्रक आपण पाहतो आहोत. मराठवाड्यात तर अतिवृष्टीमुळे शेतकरी संकटात सापडलेला आहे. त्याला दिलासा देण्याचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. आपण शहरातील नागरिकांनीही याची जाणीव ठेवली पाहिजे, असेही उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

या सोहळ्याचे प्रास्ताविक करताना, ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी राजमाता जिजाऊ उद्यानाची माहिती दिली. येथे चार-पाच दिवसांपूर्वी लावलेल्या रोपट्यापासून १०० वर्षे जुना वृक्ष आहे. साडेतीन एकर जागेत नवीन संकल्पनेसह हे उद्यान साकारले आहे. २७ ऑगस्ट रोजी मा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या उद्यानाचा नव्याने विकास करण्याचे निर्देश दिले होते. त्यासाठी त्यांची चार कोटी रुपयांचा निधीही उपलब्ध करून दिला. आज त्याचे लोकार्पण होत आहे, ही मनाला समाधान देणारी गोष्ट असल्याचे प्रतिपादन आयुक्त सौरभ राव यांनी केले. ठाणेकरांना विविध प्रकारच्या समस्या त्रास देत आहेत. आम्ही त्यातील एकेका समस्येवर तोडगा काढण्याचे प्रयत्न करतो आहोत, असेही राव म्हणाले.

·       ठाणे महानगरपालिका वर्तकनगर प्रभाग समिती अंतर्गत हिरानंदानी मेडोज परिसरात साडेतीन एकर क्षेत्रफळात राजमाता जिजाऊ उद्यान आहे.·       या उद्यानाची निर्मिती महानगरपालिका क्षेत्रात मुलभूत सोई सुविधांच्या विकासासाठी विशेष तरतूद योजनेअंतर्गत एकात्मिक उद्यान विकास कार्यक्रमाअंतर्गत ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील उद्यान विकसित करणेकरिता शासनाकडील प्राप्त निधीतून करण्यात आली आहे.·       या उद्यानात दुर्मिळ वृक्ष तसेच गुडमार, अडुळसा, हळद, सिट्रोनेला, डिकेमाली, कापूर, बारतोंडी, अंबाडा, गोकर्ण, जायफळ, दमवेल, आपटा, बेल, रुद्राक्ष, शेर, भद्राक्ष, निरगुडी, गुळवेल इ. सारख्या औषधी वनस्पती व शोभिवंत फुलझाडे यांच्या १०० हून अधिक प्रजातींची एकूण १५००० झाडांची लागवड करण्यात आलेली आहे.·       औषधी वनस्पतींच्या लागवडीसह आयुर्वेदाची देवता धन्वंतरी तसेच आयुर्वेदाचे जनक आचार्य चरक व आचार्य सुश्रुत यांचेही शिल्प उभारण्यात आलेले आहे.·       

तसेच या ठिकाणी कृत्रिम तलावदेखील साकारण्यात आला असून यात विविध जल वनस्पतींची लागवड करण्यात आलेली आहे.·       येथील बहुतांश झाडांना क्यू आर कोडसह माहिती फलक लावण्यात आले आहेत व त्या क्यू आर कोडला स्कॅन करुन नागरिकांस झाडांबाबत माहिती मिळेल.·       या उद्यानाचा एक फेरफटका मारल्यास सुमारे ५०० मीटर अंतर पार होणार असून त्याकरिता टप्याटप्याने विशिष्ट अंतरावर फलक लावण्यात आलेले आहेत.·       पक्ष्यांना त्रास होणार नाही अशा पध्दतीने विद्युत दिव्यांची सोयही करण्यात आलेली आहे. ·       उद्यान साकारताना तेथील प्राचीन वड व पिंपळ वृक्षांचे संवर्धन व सुशोभिकरण करण्यात आले आहे.·       या उद्यानात अधिकाधिक ऑक्सिजन निर्मितीकरिता सघन पध्दतीने ५०० हून अधिक बांबूची लागवड करण्यात आलेली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com