भारतीय घटनेचे शिल्पकार, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य दिव्य असे स्मारक मुरुड जंजिरा येथील ऐतिहासिक नगरीतच व्हावे असे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या मुरुड तालुक्यातील बौद्ध समाजाच्या तब्बल पन्नास वर्षाच्या संघर्षा नंतर आणि एकजूटीने दिलेल्या लढ्याने अखेर डॉ. बाबासाहेब आंबेडकंराचे अतिभव्य, बहूउद्देशीय स्मारक बांधण्याला मुरुड तालुका बौद्ध समाज सेवा संघाला अखेर यश आले आहे. स्मारकाचा उद्धाटन आणि लोकांर्पण सोहळा कार्यक्रम रविवार दि. 2 नोव्हेंबर 2025 रोजी आपणा सर्वांच्या साक्षीने होणार आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या हयातीत दोन वेळा न्यायालयीन कामकाजा निमित्त मुरुड येथे आले होते. त्यामुळे हिंदू बोर्डिंग येथे त्यांचे पंधरा दिवसांचे वास्तव्य होते. म्हणूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेल्या रायगड जिल्ह्यातील ऐतिहासिक मुरुड जंजिरा शहरांमध्ये त्यांच्या महान विद्वत्तेला शोभेल असे उत्कृष्ट दर्जाचे भव्य दिव्य व बहू उद्देशीय स्मारक व्हावे अशी मुरुड तालुक्यातील बौद्ध समाजासह शेतकरी, कष्टकरी व तमाम बहुजन समाजाची गेल्या पन्नास वर्षा पासून इच्छा होती नव्हे तर स्वप्न होते, ते स्वप्न सत्यात आणण्यासाठी आणि त्यासाठी जमीन उपलब्ध करुन घेण्यासाठी येथील बौद्ध समाजाने संविधानिक मार्गने गेले अनेक वर्षे शासनांकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. त्यासाठी मुरुड तालुक्यात अनेक वेळा जणआंदोलने ही करण्यात आली. पण प्रत्येक वेळी शासनाने ठोस भूमिका न घेतल्यामुळे जमीनीचे हातांतरित होत नव्हतं.
शेवटी नाविलाजास्तव संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष रमेश रांजणकर यांच्या नेतृत्वाखाली न भूतो न भविष्यती असे आंदोलन छेडले, समाजाने मोठे आंदोलन उभारलं. गावा गावातून लहान मोठ्यां पासून झाडून बौद्ध जनता रस्त्यावर उतरली. बौद्ध समाज आणि स्थानिक रहिवाशी, सवर्ण याच्या मध्ये संघर्षाची ठिणगी उडाली. करो या मरोची लढाई पेटली. नियोजित जागेवर अतिक्रमण करुन "डॉ. बाबा साहेब आंबेडकर स्मारकाची नियोजित जागा" अशा आशयाचा नाम फलकही अर्ध्या रात्रीत लावण्यात आला. स्थानिकांनी जोरदार विरोध दर्शविला. फलक हटविण्यास जनता तयार नव्हती, संघर्ष शिगेला पोहचला होता. बाबा साहेबांचा विजय असो अशा घोषणा देण्यात आल्या. पण पोलीस आणि प्रशासन यांना तोंड देण सोपं नव्हतं त्यातच खूप मोठी साथ लाभली ती मुंबईहून आलेले युवा नेतृत्व मा. नितीनभाऊ मोरे यांची. राजकीय अनुभव असलेल्या मोरे यांच्या अभ्यासपूर्ण नेतृत्वामुळे आणि बौद्ध समाजाच्या कडक भूमिकेमुळे मुरुडच्या तात्कालीन तहसीलदार सौं अश्विनी सुर्वे यांनी यशस्वी मध्यस्थी केली.
" राखेतून उठलो आम्ही, आगीतून घडवलं स्मारक, "
" घाम आणि अश्रुंनी लिहिलं इतिहासाचं स्मारक "
स्मारकाला जागा आरक्षित केली खरी परंतु संपूर्ण उंचवटा असलेला खडकाळ भाग, या जागेत स्मारक बांधायचे कसे? असा पेच निर्माण झाला. त्याही खडकावर प्रथम समाजाने एक एक पैसा गोळा करुन छोटंसं संघटनेचे कार्यालय उभारले. पण तिथंच थांबून स्मारक कसे उभे राहिल? या विवंचनेत असताना या अडचणीच्या वेळी खऱ्या अर्थाने धाऊन आले ते म्हणजे आर पी आय या पक्षाचे रायगड जिल्ह्याचे तात्कालीन अध्यक्ष मा. जगदीशभाई गायकवाड आणि त्यांची पत्नी मा. जिल्हा परिषद अध्यक्षा सौं कविताताई गायकवाड. या उभयतांनी स्वतःच्या पदरचे लाखो रुपये पैसे खर्च करुन या कातळरुपी जमिनीचे सपाटी करण केले, त्यामध्ये सुद्धा या कामी साथ लाभली ती दानशूर व्यक्तिमत्व असलेले स्थानिक नेते भाई सुर्वे यांची. जागेचा सपाटी करण झाले खरे पण बहुउद्देशीय बाबासाहेबांचा स्मारक बांधायला करोडो रुपये आणणार कुठून?
*" राख झाली आशा पण निर्धार पेटला, शत्रूच्या नजरेत आमचा अभिमान रेटला"*
वर्षानूवर्षे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सर्वच नेत्यांच्या घरी चपला झिजवल्या होत्या प्रत्येक निवडणूकीवेळी राजकीय नेता जसा बोलत होता तसा समाज नाविलाजास्तव वागत होता, नोकरदार सुट्टी टाकून कित्येक दिवस प्रचारामध्ये अग्रेसर असायचे, हा उमेदवार निवडून येईल आणि बाबासाहेबांचा स्मारक बांधून देईल, अशा भाबड्या आशेवर निमूटपणे सर्वच नेत्यांची दंडेलशाही सहन करत होते, अशी अनेक वर्षे उलटून गेली. स्मारक बांधायचं स्वप्न अर्धवटच राहिले. या पंचेचाळीस वर्षामध्ये स्मारक करता करता दोन पिढ्या मरण पावल्या, संपल्या परंतु समारकाचे स्वप्न जिवंतच राहिले.
*" दोन पिढ्या गेल्या, तरी डोळ्यांत उजेड आहे,"*
*"बाबासाहेबांच्या समारकातच आमचं वेड आहे"*
स्वप्न जिवंत ठेवण्यामागे येथील गावागावातील तळागाळातील कार्यकर्ता जागृत आणि दक्ष राहिला, येथील महिला वर्गाची मोठी साथ लाभली आणि आपली सत्तरी, अंशी पार केलेल्या वृद्धांचे स्मारका बाबत असलेल्या विचारांनी कार्यकर्त्यांना उभे राहण्याची आणि पुन्हा पुन्हा लढण्याची ताकद मिळाली, त्यामुळे एका एका कार्यकर्त्यांच्या मनगटामध्ये दहा दहा हत्तीचे बळ आले. कार्यकर्ताही दमला नाही किंवा डगमगला नाही. सर्व पक्षाच्या नेत्यांनी फसवले असले तरी कार्यकर्ते आपल्या ध्येया पासून किंचितही हटले नाही.
*"संघर्ष आमचा श्वास आणि स्वाभिमान आमचं रक्त,*
*"बाबासाहेबांचे स्मारक हेच आमच्या हृदयात फक्त "*
अजून एकदा नव्हे तर बाबासाहेबांसाठी हजारदा प्रयत्न आणि कष्ट घेण्याची प्रत्येकाची मानसिक तयारी होती. मात्र निसर्गाला सुद्धा येथील जनतेने घेतलेल्या कष्टाची दया आली असावी किंवा जंजिरा किल्लाच जणू लाटेसंगती सांगत होता की, ऐतिहासिक वारसा लाभलेल्या नगरितच या देशाच्या भाग्यविधात्याचे आणि घटनेच्या शिल्पकाराचे स्मारक उभे राहयला पाहिजे, त्यामुळेच ही ऐतिहासिक भूमी अधिक शोभून दिसेल आणि म्हणूनच त्यांनी मा. महेंद्रशेठ दळवी यांच्या बरोबर संबंध जुळून आले असावे. "तुम मुझे खून दो, मै तुम्हे आजादी दूंगा " हे वाक्य जसे नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं होतं तसेच वाक्य महेंद्रशेठचे होते की, "तुम्ही मला निवडून द्या मी तुम्हाला डॉ. बाबासाहेब आंबेडकंराचा स्मारक बांधून देतो". आणि लागलीच सर्वांनी तयारी दर्शविली, कार्यकर्ते पुन्हा नव्या दमाने कामाला लागले, गावागावात, चौका चौकात, नाक्या नाक्यावर मा. महेंद्रशेठ यांचा जयघोष झाला, परिस्थिती बदलली, वातावरण तापलं, मतदारांची मानसिकता बदलली आणि मा. महेंद्रशेठ एक हाती निवडून आले. शेठच्या अनुयायाबरोबर बौद्ध समाजालाही आत्यानंद झाला, गुलाल उधळला, ढोल तासे नगारे वाजले.
*"माणसांमध्येच देव भेटला, ज्यांनी दिलेला शब्द पाळला....."*
आता पुढे काय? असा प्रश्न आ वासून उभा राहिला. यावेळीही कार्यकर्ते डगमगले नाहीत, पुन्हा तोच प्रश्न समारकाच काय? नव्या दमाने आमदार झालेल्या आणि गरिबीची जाण असलेल्या मा. आमदार महेंद्रशेठ दळवी यांनी लागलीच प्रशासनाला आदेश देऊन प्रथम वर्षानूवर्षे धूळ खात पडलेली फाईल बाहेर काढली आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य दिव्य स्मारक बांधण्याचा जणू काही चंगच बांधला, फाईल अलिबाग मुरुड पुन्हा अलिबाग, पुन्हा कोकण भवन आणि पुन्हा थेट मंत्रालंया पर्यंत समाजाचा प्रत्येक कार्यकर्ता पुन्हा धाऊ लागला, हातावर कामावणाऱ्या कार्यकर्त्यांनेही कुटुंबाची पर्वा केली नाही. यामध्ये प्रत्येकाचा सिंहाचा वाटा आहे. आणि आमदार साहेबांनी मनापासुन अलिबाग ते मंत्रालया पर्यंत मारलेल्या फेऱ्या, नगर विकास मंत्र्यांबरोबर बैठीकीचे आयोजन, तात्कालीन मुख्यामंत्र्यांची घेतलेली भेट, मुख्य सचिवाच्या सतत राहिलेल्या संपर्कात आणि सर्वात मोठं की, आमदार साहेबांनी मनापासुन केलेल्या प्रयत्नामुळेच आज तब्बल सात कोटीचे बाबासाहेबांच स्मारक उभं राहिले आहे. ते सुद्धा ऐतिहासिक मुरुड नगरीत मोठ्या दिमाखादार मध्ये उभी राहिलेले आहे.
*"या स्मारकाच्या प्रत्येक विटेत आपल्या प्रत्येकाचा घाम आहे, त्या प्रत्येक दगडात समाजाच्या अश्रुंचे तेज आहे "* यामागे सर्वात महत्वाचे आहे की, येथे एक तालुका एक संघटना, त्या संघटनेचे नाव आहे " मुरुड तालुका बौद्ध समाज सेवा संघ (रजि.) या संस्थेची स्थापना सन 1965 साली होऊन आज संस्थेला 60 वर्षे पूर्ण होत आहे. या साठ वर्षामध्ये समाजाने अनेक संघर्ष झेलले, मुरुड ते अलिबाग पर्यंतचा पोलीस स्टेशनला अनेक चकरा मारल्या. समाजाच्या एकीमध्ये कित्येक वेळा बेकी होऊन जात पंचायतीच्या नावाखाली खोट्या केसेस मध्ये अडकवण्याचा प्रयत्न झाला, खोट्या केसेस मध्ये जेलमध्ये डाबून ठेवण्याचा प्रयत्न झाला, माणुसकीलाही लाजवेल अशा सत्तर सत्तर अंशी अंशी वर्षाच्या वडीलधाऱ्या मंडळीना जेल मध्ये टाकण्यात आले. रात्री 10 - 10 वा. खास कोर्ट चालू ठेवण्यात येत होते. काही वर्षानंतर कोर्टामध्ये केसेस जिंकल्या तरी आजही अशा नतदृष्ट्या, असंतृष्ट आणि अक्कल शून्य समाजातील काही बिनडोक माणसांचा त्रास आहे. अशा किती किती वाईट परिस्थितून संस्थेला एकंदरीत समाजाला जावे लागले. आज ते दिवस आठवले की, डोळ्यांत पाणी येते.
या संस्थेचे संस्थापक बाबासाहेबांचे निकटवर्ती असलेले मा. प्रसेनजीत वडवलकर गुरुजी. ज्यांनी दुरदृष्टी ठेऊन ग्रामीण विभागामध्ये अतिशय अल्प बौद्ध लोकसंख्या असलेल्या मुरुड तालुक्याचा विचार करुन एक समाज आणि एकच संस्था कार्यरत केली. आणि त्याच मार्गाने संस्थेवर आलेल्या वडिलधाऱ्या मंडळींनी अनेक हालआपेष्ठा सहन करुन अनेक संघर्षाना सामोरे जाऊन, गटबाजीला आव्हान देऊन बाबा साहेबांनी दिलेल्या दोन्ही संस्थेचा अनेक वेळा विरोध पत्करून अनेक सुख दुःखाचे कार्यक्रम पार पाडून मोठ्या हिंमतीने या लहानशा रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर केले. मध्यंतरी संघटनेला गळती लागल्याने युवा संघटनेनी जोर धरला, त्याला पाठिंबा दिला मा. मनोहर तांबे आणि शिवादास मोरे या जाणकार आणि अनुभवी मंडळींनी. या युवा संघटनेचे तात्कालीन अध्यक्ष मा. जनार्दन मोरे आणि सचिव किशोर शिंदे यांनी समाजाचा पाठिंबा घेऊन मुरुड मध्ये एक दिवशीय आंदोलन केले होते पण खऱ्या अर्थाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाची संकल्पना मांडली ती मुंबई येथील राजाभाई टॉवर्स येथील मिटिंगमध्ये मा. सी. डी. मोरे यांनी तेथूनच समारकाची मशाल पेटत राहिली ती आज पर्यंत..
आज यातील बहुतेक मार्गदर्शक मंडळी ही आपल्या दैवताचा स्मारक पाहायला जिवंत नाहीत. जिवंत राहिल्या त्यांच्या फक्त आठवणी आणि मागे ठेऊन गेले ते त्यांचे विचार, त्यांच्या कर्तृत्वरुपी विचाराचं अजरामर स्मारक....! यामध्ये राम साकृडकर, सी. डी. मोरे, जे सी पवार, रमेश रांजणकर, असे अनेक माण्यवर मंडळी होऊन गेले.या मंडळींनी स्मारकरुपी पाया घालून आपल्या समाजासाठी हयात घालविली. आज त्यांच्या पाऊलांवर पाऊल ठेऊन ही तिसरी पिढीने सुशिक्षित होऊन त्यावर कळस उभारला......बंधुनो, याच स्मारकाचा उद्धाटन आणि लोकांर्पण सोहळा कार्यक्रम रविवार दि. 2 नोव्हेंबर 2025 रोजी याच स्मारकामध्ये आपणा सर्वांच्या साक्षीने होणार आहे. या ऐतिहासिक सोहळ्याचे आपण साक्षीदार व्हाल हीच अपेक्षा..... धन्यवाद!
म्हणून म्हणतो आहे की,
मुरुडची माती आज बोलत आहे,
भीमाच्या पाऊलांची महती सांगत आहे.l
भीमाच्या लेकरांनी वर्षानुवर्षे झुंज दिली आहे,
आज त्या स्वप्नांमधून स्मारक उभं राहिलं आहे.l
दिलेला शब्द पाळणाऱ्या आमदाराचं ऋण आहे,
संघर्षातून वाट काढणाऱ्या समाजाचं हेच धन आहे.l
हा स्मारक नाही, आत्मसन्मानाची लढाई आहे,
हा संघर्ष नाही, स्वाभिमानाची निशानी आहे.l
- जयभीम!
- रघुनाथ कांबळे
- उपाध्यक्ष - केंद्रीय समिती
- मुरुड तालुका बौद्ध समाज सेवा संघ (रजि.)
0 टिप्पण्या