निवडणूक स्वच्छ, पारदर्शक असायला हवी यासाठी महाराष्ट्रातील सर्व प्रमुख प्रादेशिक पक्ष लढत आहेत. निवडणूक आयोगाकडे सातत्याने बैठका झाल्या. त्या बैठकांमध्ये सर्व पक्षांचे प्रमुख नेते होते. आमच्या प्रमुख नेत्यांनी बैठकीत जे मुद्दे मांडले ते निवडणूक आयोग मानायला तयार नाही. निवडणूक आयोगाने गुन्हेगारी स्वरुपाचं कृत्य केलं आहे. ते ऐकत नसल्याने सर्वांचं एकमत झालं आहे, त्यांना रस्त्यावर उतरुन दणका द्यावा लागेल. येत्या 1 नोव्हेंबरला महाराष्ट्रातील सर्व विरोधी पक्षांचा निवडणूक आयोगाच्या विरोधात मुंबईत विराट मोर्चा निघेल, अशी मोठी घोषणा संजय राऊत पत्रकार परिषदेत केली. महाविकास आघाडीच्या नेत्यांची मुंबईत दादरच्या शिवसेना भवन येथे ही पत्रकार परिषद पार पडली. यावेळी शिवसेना खासदार संजय राऊत, मनसे नेते बाळा नांदगावकर, राष्ट्रवादी नेते जयंत पाटील, काँग्रेस नेते सचिन सावंत, कम्युनिस्ट नेते प्रकाश रेड्डी, मनसे नेते नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
आज सगळ्यांनी एकत्र येणं गरजेचं होतं. गेल्या काही दिवसांपासून निवडणूक आयोगाच्या घोटाळ्याबाबत महाराष्ट्रातील सर्व विरोधी पक्ष लढाई लढत आहोत. ही लढाई आम्ही दिल्लीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात लढतोय. त्यानंतर आता महाराष्ट्रात ही लढाई सुरु झाली आहे. त्यातून काय निष्पन्न होईल त्या विषयी शंका आहे. निवडणुकीचं मॅच फिक्सिंग झालेलं आहे. या मॅच फिक्सिंग विरुद्ध आपली लढाई आहे. महाराष्ट्राच्या यादीत 96 लाख बोगस मतदार आहेत. म्हणजेच जवळपास 1 कोटी मतदार, हे मतदार आमच्या मते घुसखोरच आहेत. या घुसखोरांना यादीतून बाहेर काढणं ही लोकशाहीची गरज आहे. निवडणूक आयोगाच्या मनमानी आणि भ्रष्ट कारभारा विरुद्ध मुंबईत सर्वपक्षीय विराट मोर्चा निघेल. महाराष्ट्राच्या गावागावातून, जिल्ह्या-जिल्ह्यातून मतदानाचा अधिकार गमावलेले लाखो लोक इथे येतील आणि मतदारांची ताकद देशाचे पंतप्रधान, गृहमंत्री आणि निवडणूक आयोगाला दाखवली जाईल. या मोर्चाचं नेतृत्व ज्येष्ठ नेते शरद पवार, शिवसेना उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि मविआतील इतर नेते करतील. त्या दृष्टीने पुढील पावलं टाकली जातील. अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.

0 टिप्पण्या