जीवन आणि आरोग्य विम्यावर केंद्र सरकारने जीएसटी पूर्णतः माफ केल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली असली, तरी बहुतांश खासगी विमा कंपन्या अजूनही एजंटांच्या कमिशनवर १८% जीएसटी कपात करत आहेत. एवढेच नव्हे, तर १ एप्रिल २०२५ पासून लागू केलेली ३३% कमिशन कपात एजंटांसाठी मोठा आर्थिक आघात ठरत आहे. याविरोधात विमा क्षेत्रातील प्रमुख संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, ही लूट तात्काळ थांबवली नाही तर देशव्यापी आंदोलन छेडण्यात असा इशारा अध्यक्ष मनजितसिंग खोसला व सरचिटणीस अनिल गणाचार्य यांनी दिला. मुंबई मराठी पत्रकार भवन येथे जनरल इन्शुरन्स एजंट्स असोसिएशन (GIAA), जनरल इन्शुरन्स एजंट्स फेडरेशन इंटिग्रेटेड (GIAFI) आणि असोसिएशन ऑफ LIC फुवंट्स (ALICA) यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली.
यावेळी बोलताना अनिल गणाचार्य यांनी सांगितले की,“विमा कंपन्या भरघोस नफा कमावत असताना एजंटांच्या कमिशनवर जीएसटी आणि कपातीच्या नावाखाली होत असलेली लूट सहन केली जाणार नाही. एजंटांकडे ना पेन्शन आहे, ना वैद्यकीय विमा, ना जोखीम संरक्षण. तरीही तेच गावोगावी विमा संरक्षण पोहोचवतात. पण आज त्यांचे अस्तित्वच धोक्यात आले आहे.”
१८ ऑक्टोबर २०२५ रोजीच्या निवेदनात GIAA ने स्पष्ट केले की, “जीवन आणि आरोग्य विम्यावर जीएसटी माफी स्वागतार्ह आहे, पण खासगी कंपन्यांनी केलेली कमिशन कपात म्हणजे सरळ लूट आहे.” तसेच ८ ऑक्टोबर २०२५ रोजीच्या पत्रात GIAFI ने म्हटले आहे की, “एजंटांच्या कमिशनमधून जीएसटी कपात करता येणार नाही. १ एप्रिलपासून लागू केलेली ३३% कपात मागे घ्यावी आणि संयुक्त सल्लागार समिती स्थापन करावी.” तथापि, कंपन्यांकडून कोणतीही दखल घेतली गेली नाही, तसेच अर्थ मंत्रालयाकडूनही डोळेझाक केल्याचा आरोप संघटनांनी केला आहे.
एजंटांच्या कमिशनवरील जीएसटी कपात तात्काळ थांबवावी,१ एप्रिल २०२५ पासूनची ३३% कमिशन कपात रद्द करावी,एजंटांना सामाजिक सुरक्षा , पेन्शन, वैद्यकीय विमा, जोखीम संरक्षण आणि ग्रॅच्युइटी लागू करावी., आयआरडीएआय (IRDAI) ने खासगी विमा कंपन्यांना एजंटांच्या हिताचे संरक्षण करण्याचे बंधनकारक आदेश द्यावेत. आदी मागण्या मान्य केल्या नाहीत, तर आम्ही रस्त्यावर उतरून सत्याग्रह आंदोलन करू. असा इशारा ही संघटनांनी दिला.गेल्या २५ वर्षांत आयआरडीएआय ने कंपन्यांच्या हितासाठीच काम केले, पण एजंटांच्या न्यायासाठी एकही पाऊल उचलले नाही. आता ही उदासीनता गप्प बसून सहन केली जाणार नाही.”असे गणाचार्य म्हणाले.

0 टिप्पण्या