प्रति,
सौ किशोरी किशोर पेडणेकर ताई,
खरेतर आपल्याला माहिती नसलेल्या विषयाबद्दल माणसाने बोलू नये. पण तुम्ही माहिती नसलेल्या विषयाबाबत फक्त बोलला नाहीत तर सुमार फेका फेकी देखील केली. माध्यमांच्या समोर 'देशाचे दुष्मन' या पुस्तकाबाबत मांडलेल्या तुमच्या भूमिका या अतिशय उथळ आणि अज्ञानी स्वरूपाच्या होत्या. त्या तुम्ही अजाणतेपणी मांडल्या की जाणीवपूर्वक दिशाभूल करण्यासाठी मांडल्या हे खरेतर तुमचं तुम्हालाच माहिती. पण या निमित्ताने तुम्ही 'देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे' आणि 'देशाचे दुष्मन' या दोन्हीही पुस्तकांना नवचैतन्य दिलेत. त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे.
प्रबोधनकार ठाकरे यांचे 'देवळांचा धर्म धर्माची देवळे' हे पुस्तक तुम्ही स्वतः तरी वाचलं आहे का ? नसेल वाचले तर वाचा. एवढंच काय तर प्रबोधनकार ठाकरे यांचे कोदंडाचा टणात्कार, भिक्षुक्षाहीचे बंड, खरा ब्राह्मण ही पुस्तके देखील वाचा. मग तुम्हाला प्रबोधनकार ठाकरे समजतील. तुमचे पक्षप्रमुख 'आमचं हिंदुत्व शेंडी जाणव्याचे नाही' असे वारंवार म्हणतात ना ? त्या विचारांची फळं प्रबोधनकार ठाकरे यांच्या साहित्याच्या आणि विचारांच्या बिजातून आलेली आहेत. हे कायम लक्षात ठेवा. हवंतर एकदा पक्षप्रमुखांना भेटून शांतपणे हे सगळं विचारून घ्या. मग तुम्हाला समजेल.
'देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे' खरेतर या पुस्तकाचे सार्वत्रिक रित्या तुम्ही वाटप करायला हवे. या देशात किती बौद्ध लेण्यांची मंदिरे इतिहासात झालेली आहेत त्याची सविस्तर माहिती प्रबोधनकार ठाकरे यांनी त्यात दिलेली आहे. तो इतिहास लोकांच्या समोर यायला नको का ? दोन्हीही शिवसेनेपेक्षा जास्त शिव-फुले-शाहू-आंबेडकरी चळवळीतील लोक प्रबोधनकार ठाकरे यांच्यावर प्रेम करतात. प्रबोधनकार ठाकरे यांचे विचार ठाकरेंनी कमी आणि चळवळीतल्या लोकांनीच जास्त घरोघरी पोहोचवले आहेत. याला कोणीही नाकारू शकत नाही.
प्रबोधनकार ठाकरे यांनी अनेकदा विनायक दामोदर सावरकर यांच्यावर देखील टिका केलेली आहे. प्रबोधनकार ठाकरेंना सावरकरांचे विचार अजिबात मान्य न्हवते. या सर्व भूमिकांमुळे प्रबोधनकार ठाकरे यांना खूप त्रास झाला होता. अगदी त्यांच्या घरासमोर मेलेले गाढव आणून टाकले गेले होते. हे सर्व करणारी मंडळी कोण होती ? हा इतिहास लोकांच्या समोर यायला नको का ? हजार वर्षांपूर्वीचा इतिहास चवीने सांगता, पार त्या इतिहासाचा कोथळा वारंवार बाहेर काढता. आणि शंभर वर्षांपूर्वीच्या इतिहासाच्या शेंडीला मात्र गाठ मारून ठेवता. आणि ती गाठ खोलु नका म्हणता. असं कसं चालेल ताई ?
किशोरी ताई, देशाचे दुष्मन पुस्तक लिहिणारे दिनकरराव जवळकर व देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे पुस्तक लिहिणारे प्रबोधनकार ठाकरे या दोन महान विभूती एकाच मशालीत जळणारे दोन धगधगते अग्निकुंड आहेत. या अग्निकुंडाचा प्रकाश ज्या ज्या व्यक्तींवर पडतो तो प्रत्येक व्यक्ती शिव-फुले-शाहू-आंबेडकरी विचारधारेशी आणखीन प्रामाणिक होतो. तसेच या अग्निकुंडाची आग अर्बन मनुवाद्यांचे धोतर जाळणारी देखील आहे. त्यामुळे अर्बन मनुवादी ही प्रबोधनाची आग संपवण्यासाठी कायमच प्रयत्नशील असतात. पण आम्ही या मशालीची वैचारिक आग विझू देणार नाही. आम्ही ती आणखीन प्रकाशित करू तिही लोकशाही मार्गाने. आमचा त्या मार्गावर पूर्ण विश्वास आहे. कारण आमच्या विचारधारेचा पाया मजबूत आहे. भीती त्यांना असते ज्यांचा पाया मजबूत नसतो. असे लोक पुस्तके फेकून मारतात, आणि त्याहून अधिक माध्यमांसमोर काहीही बरळत बसतात. आम्हाला अशा गोष्टींची गरज नाही.
आम्ही प्रत्येकाच्या वाढदिवसाला किंवा इतर कार्यक्रमात देखील ही दोन पुस्तके इथून पुढे आवर्जून भेट देणार. मी स्वतः आज ५० पुस्तके यासाठी घेतली आहेत. हा वैचारिक वणवा आता पेटल्याशिवाय राहणार नाही. उत्तर फक्त विचारातून नाही तर कृतीतून देखील मिळणार. समजलं तर ठीक
- जय महाराष्ट्र, जय जय महाराष्ट्र
- - पैगंबर शेख
- (शिव-फुले-शाहू-आंबेडकर या वैचारिक वस्तादांच्या तालमीतला पठ्ठ्या)
- संपर्क - ९९७००७०७०५

0 टिप्पण्या