मुंबई इंटर रिलिजियस सॉलिडॅरिटी कौन्सिल आणि बहाई समुदाय, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने बहाउल्लाह आणि महात्मा बाब यांच्या जयंतीनिमित्त सर्वधर्मीय प्रार्थना व प्रेम, शांतता आणि ऐक्याचा संदेश देणारा भव्य सोहळा मरीन लाईन्स येथील बहाई सेंटर येथे संपन्न झाला. या बहुधर्मीय सोहळ्यात इस्कॉन, ब्रह्मकुमारी, इस्लाम, शीख, ख्रिश्चन, झोरोॲस्ट्रियन आणि बहाई धर्माचे प्रतिनिधी उपस्थित होते. या कार्यक्रमात सर्व धर्मातील प्रतिनिधींनी मानवतेबद्दल करुणा, बंधुभाव आणि एकतेचा संदेश दिला. भाषणांमधून बहाउल्लाह यांच्या "पृथ्वी एकच देश आहे आणि मानव तिचे नागरिक आहेत" या विचाराचा पुनः उच्चार करण्यात आला. मानवतेची सेवा म्हणजे देवाची सेवा, ही बहाई धर्माची शिकवण सर्वांनी अधोरेखित केली.
कार्यक्रमात दोन प्रमुख उपक्रम सादर करण्यात आले.बालवर्ग ६ ते ११ वयोगटातील मुलांसाठी दर आठवड्याला घेण्यात येणारे नैतिक-आध्यात्मिक वर्ग, ज्यामध्ये विविध धर्माच्या कथा, प्रामाणिकपणा, दयाळूपणा आणि मैत्रीच्या मूल्यांचा समावेश असतो. ज्युनियर यूथ एम्पॉवरमेंट प्रोग्रामः १२ ते १५ वयोगटातील तरुणांसाठी छोट्या गटात घेतले जाणारे सत्र, ज्याद्वारे नेतृत्वगुण, नैतिक विचारसरणी आणि समाजसेवेची प्रेरणा दिली जाते. या दोन्ही उपक्रमांमुळे सामाजिक सलोखा वाढवणे, कुटुंबातील नातेसंबंध मजबूत करणे आणि आंतरधर्मीय संवादासाठी तरुण नेते तयार करणे हे उद्दिष्ट साध्य होत आहे. बहाई सेंटर च्या सचिव नर्गिस गौर आपल्या भाषणात म्हणाल्या की,आपल्या भारत देशातील सर्व धर्मीय समाजात राष्ट्रीय एकात्मिका, सामाजिक एकता, विश्व बंधूता, विश्वास,आदर आणि प्रेम वाढत जावे सर्वांच्या साथीने देशाचे उज्वल भवितव्य घडावे अशी आमची बहाई समाजाची आकांशा असल्यामुळे आम्ही असे सामाजिक उपक्रम राबवीत सर्व समुदायांना एक व्यासपीठ उपलब्ध करून देतो त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. कार्यक्रमाच्या शेवटी आयआरएससीचे अध्यक्ष राम पुनीयानी यांनी सर्व सहभागींचे आभार मानले आणि २०२४ मुंबई पार्लमेंट ऑफ रिलिजियन्समध्ये घेतलेल्या परस्पर आदर व सहकार्याच्या प्रतिज्ञेचे पुनरुज्जीवन केले. सर्व उपस्थितांनी दर महिन्याला आंतरधर्मीय सभा आणि संयुक्त सेवा प्रकल्प राबविण्याचा संकल्प व्यक्त केला. एकत्रितपणे, हे कार्यक्रम सामाजिक एकता मजबूत करतात, आंतर-कुटुंब नेटवर्क तयार करतात आणि आंतर-धार्मिक सहकार्याचे समर्थन करणारे युवा नेत्यांची लाइपलाइन वाढवतात, प्रेम हे सर्व धर्मांचे सार आहे हे बळकट करतात.


0 टिप्पण्या