माझगाव डॉकयार्ड येथील सुमारे १८० कंत्राटी कामगारांना कोणतीही पूर्वसूचना न देता कामावरून कमी करण्यात आलं आहे.मॅनोन एंटरप्रायझेस प्रायव्हेट लिमिटेड( Manone Enterprises Pvt. Ltd.) या कंत्राटदार कंपनीकडून आणि माझगाव डॉकयार्डच्या एचआर विभागाकडून ही कारवाई करण्यात आली असून, ही पावले थेट माझगाव डॉकयार्डचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांच्या आदेशावरून उचलण्यात आली असल्याची माहिती कामगारांकडून समोर आली आहे. कंत्राटी कामगारांची संख्या सध्या सुमारे ८०० असून, अचानक झालेल्या या निर्णयामुळे कामगारांमध्ये तीव्र संताप पसरला आहे.
“आमच्या मुलांच्या भविष्यासमोर अंधार उभा राहिला आहे. एवढ्या मोठ्या शहरात, नोटीस न देता, एकाच दिवशी आम्हाला काढलं गेलं. आम्ही न्याय मागायचा कुठे?” असा प्रश्न एका कामगाराने व्यक्त केला. कामगारांच्या म्हणण्यानुसार, कंत्राटदार कंपनीकडून दोन वर्षांच्या कंत्राटाच्या नावाखाली प्रत्येकी १५ हजार ते २०,हजार इतकी रक्कम आकारली जाते. हे सर्व माझगाव डॉकयार्ड प्रशासनाला माहिती असूनही कोणतीही कारवाई होत नाही, ही अत्यंत लाजिरवाणी बाब असल्याची टीका कामगारांनी केली आहे. “आम्ही मुंबईत राहतो, आम्ही भूमिपुत्र आहोत. तरीही आमच्याशी असं वागणं ही अन्यायाची परिसीमा आहे,” असं म्हणत कामगारांनी प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. कामगारांनी तात्काळ काढून टाकण्यात आलेल्या सहकाऱ्यांना पुन्हा कामावर घेण्याची आणि दोषी कंत्राटदाराविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
0 टिप्पण्या