आदिवासी समाजाच्या मागण्यांबाबत सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप अखिल भारतीय आदिवासी सेनेचे संस्थापक प्रमुख दि. ना. उघाडे यांनी केला. आमच्या समस्यांबाबत दिलेल्या पत्राला कोणत्याही प्रकारचे उत्तर दिले जात नाही. आमच्या मागण्यांबाबत दिलेल्या पत्रांवर २५ सप्टेंबरपर्यंत चर्चेची प्रक्रिया सुरू झाली नाही, तर २ ऑक्टोबरपासून महाराष्ट्रभर आंदोलन उभारले जाईल, असा इशारा उघाडे यांनी मुंबई मराठी पत्रकार भवन येथे दिला. दादर स्थानकाचे नामांतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर टर्मिनस करणे, आदिवासी महिलांना रोजगार उपलब्ध करणे, आरक्षणावरून होणारे वाद थांबवून संविधानिक तरतुदींनुसार निर्णय घेणे, डोंगरकपाऱ्यातील आदिवासींचे सर्वेक्षण करून रोजगार हमी योजनांतर्गत सुविधा उपलब्ध करणे, वनमजुरांना कायमस्वरूपी नोकरी देणे, महिलांवरील अत्याचाराच्या गुन्ह्यांना कठोर शिक्षा देणे आदी मागण्यांसाठी राज्यभर तीव्र जनआंदोलन उभारण्याचा इशारा दिला आहे.
मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आज आयोजित पत्रकार परिषदेत दि. ना. उघाडे आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी त्यांनी सांगितले की, आदिवासी समाजाच्या मागण्यांवर सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असून, लेखी उत्तरही दिले जात नाही. त्यामुळे २५ सप्टेंबरपर्यंत चर्चेची प्रक्रिया सुरू झाली नाही, तर २ ऑक्टोबरपासून महाराष्ट्रभर आंदोलन उभारले जाईल, आंदोलनाची सुरुवात मंत्रालय, वर्षा, सह्याद्री, देवगिरी बंगल्यासह भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या पक्षांच्या कार्यालयांवर करण्यात येईल. या सर्व पक्षांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा वर्ग आहे, मात्र त्यांच्या मागण्यांकडे सरकारने दुर्लक्ष केले असल्याचा आरोप त्यांनी केला. सरकार कार्यक्षम आहे की अकार्यक्षम, हा प्रश्न आज उभा राहिला असून, योग्य प्रतिसाद न दिल्यास राज्यभर काळे झेंडे दाखवून आंदोलन पेटवले जाईल, असा इशारा उघाडे यांनी दिला.
0 टिप्पण्या