मुंबईतील लालबागचा राजाच्या विसर्जनाला यावेळी प्रचंड उशीर झाला? विसर्जन मिरवणुकीत यंदा अभूतपूर्व खोळंबा पाहायला मिळाला. 6 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता सुरू झालेली मिरवणूक तब्बल 33 तासांनंतर, 7 सप्टेंबरच्या रात्री उशिरा विसर्जनान संपन्न झाली. याबाबत अनेक उलटसूलट चर्चा सोशल माध्यमातून पहायला मिळाल्या त्यातील महत्त्वाचं कारण म्हणजे यंदा लालबागच्या राजाच्या मूर्तीच्या विसर्जनासाठी गुजरातमध्ये बनवण्यात आलेल्या मोटराइज्ड तराफ्याचा वापर करण्यात आला. मात्र, या तराफ्यावर मूर्ती विराजमान करण्याची प्रक्रिया अत्यंत किचकट आणि वेळखाऊ ठरली. अनेक तासांच्या प्रयत्नांनंतर अखेर मूर्ती तराफ्यावर स्थिर करण्यात यश आलं. तसेच मूर्ती तराफ्यावर विराजमान झाल्यानंतरही, समुद्रात योग्य भरतीची प्रतीक्षा करावी लागली. भरतीची योग्य पातळी रात्री 9 वाजता प्राप्त झाल्यानंतरच विसर्जनाची प्रक्रिया सुरू झाली आणि लालबागच्या राजाचं विसर्जन पार पडलं.
सकाळी 11: 44 वाजता 4.43 मिटर उंचीच्या समुद्राच्या लाटा उसळत होत्या कारण की भरतीची वेळ होती. त्यामुळे लालबाग राजा मंडळाला विसर्जनासाठी जोपर्यंत पाणी कमी होत नाही आणि खवळलेला समुद्र शांत होत नाही तोपर्यंत थांबावं लागणार होतं. विसर्जनाला होत असलेला विलंब आणि समुद्राची भरती यामुळे मूर्तीसोबत जे इतर भक्त,.तसेच लालबागचा राजा मंडळाचे कार्यकर्ते गणपतीला समुद्रातच ठेवून माघारी किनाऱ्यावर आले. समुद्राला भरती असल्याने इतर भक्तही मूर्तीच्या जवळ जायची हिंमत करत नव्हते. त्यावेळी कोळी बांधवांनी मात्र लालबागचा राजाची साथ सोडली नाही. कोळी समाजातील काही तरुण मुलं लालबागचा राजाच्या मूर्तीसोबत पाण्यात तरंगत होती. हे सर्वजण लालबागचा राजाचे आसन आणि चारही बाजूंना कोंडाळे करुन होते. या सर्वांनी लालबागचा राजाची मूर्ती विसर्जनापूर्वी समुद्रात वाहून जाणार नाही किंवा सरकणार नाही, यासाठी घट्ट धरुन ठेवली होती. एक वेळ अशी आली की समुद्राचे पाणी लालबागच्या राजाच्या मूर्तीच्या कंबरेच्या वरपर्यंत पोहोचले. तेव्हाही एक-दोन कोळी बांधव लालबागचा राजाच्या मूर्तीसोबत होते. त्यासाठी कोळी बांधवांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.गेली अनेक वर्षे लालबागचा राजाचे विसर्जन हे कोळी बांधवांकडून गेले जात होते. मात्र, अलीकडच्या काळात लालबागचा राजाच्या विसर्जनसाठी तराफा वापरला जात होता. हा तराफा कोळी बांधवांच्या बोटींकडून ओढला जात असे. मात्र, अंबानी कुटुंबाचा लालबागच्या राजाच्या मंडळात शिरकाव झाला आणि यंदा लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून गुजरातचा एक हायड्रोलिक्स यंत्रणा असलेला स्वयंचलित तराफा आणण्यात आला. त्यामुळे लालबागचा राजाचा तराफा ओढण्यासाठी कोळी बांधवांच्या बोटींची गरज राहिली नव्हती. मात्र, काल समुद्राला भरती आल्यानंतर मोठा गाजावाजा करुन आणलेला हा गुजरातचा स्वयंचलित तराफा पूर्णपणे कुचकामी ठरला होता आणि लालबागचा राजाचे विसर्जन लांबणीवर पडले होते.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे भरती ओहोटीची वेळ लालबाग राजा मंडळाकडून पाळण्यात आली नाही, तशा प्रकारचे नियोजन करण्यात आलं नाही. सकाळी 05:16 वाजता कमी भरती म्हणजे ओहोटीची वेळ होती त्यामुळे सकाळी पाच ते सहाच्या दरम्यान लालबाग राजाचे विसर्जन शक्य झालं असतं मात्र या वेळेत लालबाग राजा हा गिरगाव चौपाटीवर पोहोचू न शकल्याने आणि साडेसात वाजता आल्याने खवळलेल्या समुद्रात आणि भरतीची वेळ जवळ आल्याने लालबाग राजाची गणेश मूर्ती ही ट्रॉलीमध्येच राहिली. लालबाग राजाची मूर्ती ट्रॉलीतून तराफ्यावर आणता येत नव्हती कारण ज्या ठिकाणी लालबाग राजा गिरगाव चौपाटीवर आला त्या ठिकाणी उंच उंच समुद्राच्या लाटा उसळत होत्या आणि लालबाग राजाची गणेश मूर्ती अर्धी पाण्यात होती.
विसर्जनांसाठी आजूबाजूला असलेल्या बोटी सुद्धा भरतीची वेळ असताना पुन्हा एकदा किनाऱ्यावर लागल्या होत्या. त्यामुळे लाटा कमी होण्यासाठी भरतीची वेळ निघून कमी भरतीची म्हणजे ओहोटीची वेळेची सायंकाळी सहा वाजता वाट पहावी लागली. साधारणपणे संध्याकाळी सात साडे सातच्या दरम्यान ट्रॉलीतून लालबाग राजाची मूर्ती तराफ्यात ठेवून आठ-साडेआठच्या दरम्यान तराफा हा समुद्राच्या आत मध्ये निघाला. त्यानंतर तब्बल 33 तासानंतर लालबाग राजाचे विसर्जन झालं. भरती ओहोटीची वेळ न पाळल्याने,योग्य नियोजन त्यानुसार न झाल्याने आणि लालबाग राजा हा गिरगाव चौपाटीवर उशिरा दाखल झाल्याने साधारणपणे 12 ते 14 तास उशिराने लालबाग राजाचे विसर्जन यंदाच्या वर्षी पहिल्यांदाच झाले.

0 टिप्पण्या