Top Post Ad

देवरांच्या ' उपकार भावा ' चे साक्षीदार !

  •  पत्रकार कुमार कदम.....देवरांच्या ' उपकार भावा ' चे साक्षीदार !
  • -- *दिवाकर शेजवळ*

मुंबई मराठी पत्रकार संघाच्या यंदाच्या आचार्य अत्रे पुरस्काराचे मानकरी ठरलेले नामवंत पत्रकार कुमार कदम हे मोजक्या ' चळवळ्या ' पत्रकारांपैकी एक आहेत. ते राज्यातील  मोठ्या कालखंडाचे साक्षीदार असून इतिहासातील सामाजिक - राजकीय घडामोडींचा ' एन्सायक्लोपिडिया ' आहेत. ' मुरली देवरांचे ' संस्थान ' खालसा झाले तेव्हा ...! ' हा माझा दैनिक ' सामना ' मध्ये मंगळवारी ( ९ सप्टेंबर २०२५) प्रसिद्ध झालेला लेख वाचला आणि त्यांनी मला लगेचच फोन केला. त्यांना तो लेख ४० वर्षांपूर्वीच्या भूतकाळात, मुंबई - महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात घेवून गेला होता. तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील आणि मुरली देवरा या दोन वजनदार काँग्रेस नेत्यांमधील  जवळून पाहिलेल्या संघर्षाच्या आठवणी कदम यांच्या मनात जागल्या होत्या. अन् ते आठवणी सांगू लागले....

१९८५ मधील मुंबई महानगर पालिका निवडणुकीसाठी काँग्रेसच्या उमेदवारांची यादी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष देवरा यांनी तयार केली होती. ती जाहीर करण्यासाठी त्यांनी पत्रकार परिषद बोलावली होती. त्यानिमित्त कुमार कदम यांनी देवरा यांना विचारले की, काँग्रेसने किती मराठी कार्यकर्त्यांना उमेदवारी दिली आहे? .,त्यावर मुरली देवरा म्हणाले : मुंबईत २२ टक्के असलेल्या मराठी लोकांना आम्ही ४० टक्के उमेदवारी ( ६८ जागा) दिली आहे. मराठी लोकसंख्येचा विचार करता किती जागांवर उमेदवारी द्यायला हवी? देवरा यांनी विचारलेल्या सवालात ' उपकार भाव '  भरलेला होता.

त्यानंतर संध्याकाळी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील हे दादरच्या ' शिवाजी मंदिर ' मध्ये एका कार्यक्रमासाठी येणार होते. तो कार्यक्रम सुरू होण्यापूर्वीच कुमार कदम यांनी वसंतदादा यांना व्यासपीठाच्या मागे गाठले. देवरा यांनी तयार केलेल्या काँग्रेसच्या उमेदवार यादीची माहिती देत त्यावर दादांना प्रतिक्रिया विचारण्यात आली. पण कदम यांच्या प्रश्नावर काहीही उत्तर न देता वसंतदादा शांत बसून राहिले होते.

पण त्यानंतर व्यासपीठावर गेल्यावर मात्र आपल्या भाषणातून मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी त्या कार्यक्रमात मोठा बॉम्बगोळा टाकला. त्यांचे टार्गेट अर्थातच काँग्रेस नेते मुरली देवरा होते!' मुंबईला आणि मराठी माणसाला आपल्याला वाचवावे लागेल ! ' असे वसंतदादा यांनी तिथे जाहीररीत्या सांगितले. तेवढ्यावरच ते थांबले नाहीत. मराठी माणसांचा कैवार घेण्याची भूमिका त्यांनी पत्रकारांशी बोलतांनाही मांडली. त्यानंतर ते उपचार आणि विश्रांतीसाठी ब्रिच कँडी रुग्णालयात दाखल झाले होते. वसंतदादा यांच्या या नव्या भूमिकेतून  काँग्रेसमधील  मोठ्या संघर्षाची पहिली ठिणगी पडली होती. त्यातून मराठी जनतेत उडालेल्या भडक्यामुळे महापालिका निवडणुकीत त्यावेळी मुंबई काँग्रेस चांगलीच होरपळली होती.

त्याला दोन दशकांतील अमराठींच्या मुंबईत वाढलेल्या राजकीय वर्चस्वाची पार्श्वभूमी होती. त्याविरोधात  मराठी जना - मनातील लाव्हा १९८५ सालातील महापालिका निवडणुकीत उफाळून बाहेर पडला. त्यातून शिवसेनेने १४० पैकी निम्म्या म्हणजे ७० जागा जिंकण्याचा इतिहास घडला. अन् त्याच वर्षी नोव्हेंबरमध्ये दुसरे अधिवेशन महाड येथे भरवून शिवसेनेने मुंबई - ठाण्याबाहेर पडून राज्यभरात घोडदौड सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. 

*देवरा पर्वाची अखेर*

काँग्रेस नेते दिवंगत गुरुदास कामत हे २००३ सालात अध्यक्ष होण्यापूर्वी मुंबई प्रदेश काँग्रेसमध्ये ' देवरा पर्व ' होते. महापौर पदापासून केंद्रीय मंत्रिपदापर्यंत मजल मारलेले मुरली देवरा हे १९८१ ते २००३ पर्यंत मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष होते. आजघडीला मुंबईतील ३६ आमदारांपैकी  २३ जण मराठी असून १३ जण अमराठी आहेत. २०१९ मध्ये अमराठी आमदारांची संख्या ११ होती. ती २०२४ मध्ये दोनने वाढून १३ झाली आहे. पण काँग्रेस मधील देवरा पर्वात मुंबईवर अमराठी लोकांचे  राजकीय वर्चस्व प्रस्थापित झाले होते. १९८० च्या दशकाच्या प्रारंभी मुंबईतील अमराठी आमदारांची संख्या २२ झाली होती. तर, १९७० च्या दशकात म्हणजे शिवसेना विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात नसलेल्या काळात मुंबईतील अमराठी आमदारांची संख्या ६० टक्के इतकी होती.

==============

मुंबई, ठाणे, मिरा भाईंदरची २०१७ नंतरची स्थिती

🔘 मुंबई महानगर पालिका एकूण नगरसेवक संख्या- २२७ .त्यापैकी ८३ अमराठी.

🔘 ठाणे महानगर पालिका एकूण नगरसेवक संख्या-१४२. त्यापैकी २२ अमराठी .

🔘 मीरा भाईंदर महानगर पालिका एकूण नगरसेवक संख्या - ९५ .त्यापैकी ४७ अमराठी नगरसेवक .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com