Top Post Ad

कोकण संकटात आहे एवढे नक्की....

 दशावतार ... मन विषन्न करणारा ,आणि भयानक भविष्यकाळ दाखवणारा सिनेमा . नाट्यश्री दिलीप प्रभावळकर आणि सर्वच कलाकार यांच्या अप्रतिम अभियानामुळे वेगळ्याच उंचीवर गेलेली मराठी माणसांचे , कोकणाचे भविष्य सांगणारी कलाकृती .पण दुर्दैवाने ही एक फक्त कलाकृती नाही.  ती कोकणातील सत्यस्थिती आहे . फक्त कोकणातच नाही तर इतर अनेक ठिकाणी आर्थिक विकासाच्या नावावर निसर्गाला अक्षरशः ओरबाडले जात आहे . आणि निसर्गाच्या रक्षकांना अगदी किड्या मुंग्यांसारखे तुडवले जात आहे . या सिनेमात दाखवलेले तांडेल आणि सरवनकर  सारखी पैशाला हपापलेली माणसे गावोगावी निर्माण झाली आहेत . या सर्वांच्या आयुष्यातील सर्वोच्च ध्येय एकच , कोणत्याही मार्गाने पैसा सत्ता आणि संपत्ती . यांचा सर्वोच्च आनंद  दारू, मटन आणि शिवराळ भाषेतील कमरेखालचे विनोद . 

आपल्या समाज ,संस्कृती ,गाव, देव ,भाव जराही चाड नसलेली ही व्यक्तीमत्वे पैशासाठी परप्रांतीयांसमोर लाचार झालेले  दिसतात . पैसा मिळवण्यासाठी यापेक्षा इतरही अनेक चांगले मार्ग असू शकतात याची जाणीव नसलेली हे लोक विकृत लोक आपला स्वार्थ साधण्यासाठी कोणत्या थराला जातील याचा नेम नाही .  अनेक संसार उध्वस्त करून , निसर्ग संपन्न गावखेडी उध्वस्त करून ,काही संस्कृती नष्ट करून निसर्गाची अपरिमित हानी करून नेमका कोणता विकास साधायचा आहे ? हा प्रश्नच पडतो . आता काही लोक म्हणतील मग विकास करायचाच नाही का ? कोकणात उद्योगधंदे आणायचेच नाहीत का ? 

विकास हवाच, उद्योगधंदे हवेच पण कुठे, कसे ,कोणते याचे काही  नियोजन हवे ना . जगात इतरही अनेक देश आहेत , ज्यांनी आपली संस्कृती आपला निसर्ग जपून सर्वोत्तम विकास साध्य  केला आहे . त्यासाठी नैसर्गिक संपत्ती उध्वस्तच करावी लागते असे नाही . पण आपल्याकडे मात्र  गोरगरिबांना फसवून , कायदा वाकवून/मोडून अनेक खाणी ,अनेक उद्योगधंदे उभारले जातात. चुकीच्या पद्धतीने , नियमांचे पालन न करता .  त्याचा निसर्गावर सर्वसामान्य गरीब जनतेवर किती भयानक परिणाम होतो याचा विचारही नसतो या मेलेल्या मनाच्या  लोकांना . गाडगीळ समिती आणखीन इतरही अनेक अभ्यास गटांनी पश्चिम घाटाचे म्हणजेच सह्याद्री पर्वतरांगांचे, त्यातील निसर्गाचे ,परिसंस्थांचे  संरक्षण अत्यावश्यक असल्याचे सांगितले . त्यामुळेच सर्वसामान्य लोकांना,  घरावर पडणारे झाडही तोडायला बंदी करणारे कायदे आले . पण मग या क्रोनी कॅपिटालिस्ट  लोकांना सगळे जंगल तोडायचे आणि डोंगरही उध्वस्त करायचे परवाने मिळतातच कसे ? सर्वसामान्य लोकांना वेगळा न्याय आणि धन दांडग्यांना वेगळा न्याय . 

डोंगर अक्षरशः पोखरून टाकणाऱ्या या खाणींमुळे काय परिणाम होतो हे चिपळूणच्या पुराने आणि केरळमधील वारंवार येणाऱ्या पूर परिस्थितीने या आधीही दाखवले आहेत . निसर्गाच्या रक्षणासाठी आपल्या पूर्वजांनी कातळोबा , वेतळोबा, रवळोबा , सातेरी ,भराडी , यांसारखी देवस्थाने आणि देवराया निर्माण केल्या. आधुनिक अभयारण्यासारख्याच .  आणि आताची पिढी मात्र चार पैशांच्या हव्यासासाठी हे सगळं विकायला, उध्वस्त करायला तयार आहे .कोकण संकटात आहे एवढे नक्की . एका बाजूला परकीय भाषेचं आणि संस्कृतीचे  आक्रमण , दुसऱ्या बाजूला क्रोनी कॅपिटालिस्ट जमातीचे जंगले, देवराया उध्वस्त करून निसर्ग लुटण्याचे  धोरण , आणि त्यांना आपल्याच लाळघोट्या लाचारांचे  समर्थन.  ही कोकणाच्या नव्या दशावताराची नांदी तर नाही ना ? 

 सिंधुदुर्ग जिल्ह्यात अशी अनेक उदाहरणं सापडतील, जिथे जमिनीच्या मूळ मालकांना फसवून त्यांच्या जागा- जमिनी दुसऱ्यांच्याच नावावर विकल्या गेल्या . या गोरगरिबांचा कोर्टकचेऱ्यांमध्ये टिकाव लागतच नाही . एजंटगिरी करणाऱ्याच्या गळ्यात मात्र सोन्याची नवीन साखळी दिसते . आज समाजातील काही राजकारण्यांनी मुंबईतील केंद्र सरकारच्या खात्यात असलेली सर्व जमीन एका ठराविक मोठ्या व्यवसायिकाला देऊन टाकली आज मराठी माणूस हा मुंबईतून हद्दपार होणार हे जगजाहीर आहे... आज या महाराष्ट्राच्या छत्रपती शिवाजी महाराज आणि संतांच्या भूमीमध्ये मराठी माणसाची जी अवस्था करून ठेवली आहे हे लक्षात घेता आपल्या मुलांच्या भविष्याबद्दल चिंता निर्माण होते...हा विनाश थांबेल की नाही माहिती नाही . पण आपण लढणाऱ्यांना किमान साथ तरी देऊ शकतो . तुमची शांतता मात्र धनदांडग्या शेटजीला मदत करू शकते . विचार तुम्हालाच करायचा आहे. आज नाहीतर उद्या ही टोळधाड  तुमच्याही  घरापर्यंत नक्कीच येणार . तुमचे घर ,तुमचा गाव, तुमचा देव ,तुमचे जंगल ... कदाचित काहीच नसणार ... खूप भयानक आहे हे ...

आपण जगाला सुधरू शकतो की नाही हे माहिती नाही.  पण दशावतार बघून निदान एवढा तरी निर्धार करायला हवा की किमान माझ्यापुरता मी तरी समाज, संस्कृती आणि निसर्ग रक्षणाचा जास्तीत जास्त प्रयत्न करेन .  दशावतार सिनेमाने दिलेला संदेश,  जनतेच्या एकतेची नांदी ठरावी एवढीच अपेक्षा . अन्यथा निसर्गाचा प्रकोप या आधीही अनुभवला आणि यापुढे तो वाढतच जाईल .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com