वाहतूक कोंडी मुक्त ठाणे शहर करण्याच्या दृष्टीने मेट्रो लवकरच सुरु केली जाणार आहे. ठाणेकरांची पहिली मेट्रो ट्रेन ट्रायल रनसाठी सज्ज झाली आहे. ठाण्यातील मेट्रो मार्गिका ४-४ अ मधील १० स्थानकांवर ट्रायल रन होणार आहे. सप्टेंबर महिन्यात ट्रायर रन करण्यासाठी एमएमआरडीएने तयारी केली होती. मेट्रो लाईन -४ मेट्रो रेल्वे स्टेशनच युद्धपातळीवर काम सुरू आहे. २५ ऑगस्ट रोजी मेट्रो ट्रेनचे काही डबे स्टेशनवर मेट्रो मार्गिका ४-४ अ या मार्गिकवर ठेवण्यात आले होते. हा उन्नत मार्ग असल्याने क्रेनच्या मदतीने मेट्रो डबे ट्रॅकवर ठेवण्यात आले होते. सोमवार २२ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ठाणे मेट्रो प्रकल्पातील १०.५ किमीच्या पहिल्या फेजचे ट्रायल रन होणार आहे. ठाणे मेट्रो मार्गिकेवर १) कॅडबरी २) माजीवाडा ३) कपूरबावाडी ४) मानपाडा ५) टिकूजी-नी-वाडी ६) डोंगरी पाडा ७) विजय गार्डन, ८) कासरवाडावली, ९) गोवानिवाडा १०) गायमुख ही स्थानकं असणार आहेत.
एकीकडे ठाण्यात वाहतुक कोंडीच्या समस्येवर ठाणेकर आक्रमक होत असतानाच मुंबईसह ठाणेकरांसाठी वाहतुकीच्या समस्येचे समाधान म्हणून महत्त्वाकांक्षी ठरणारा मेट्रो मार्ग ४ व ४ए (हिरवी मार्गिका) प्रकल्पाला गती मिळाली आहे. वडाळा–घाटकोपर–मुलुंड–कासारवडवली–गायमुख या मार्गावर उभारण्यात येणारा हा प्रकल्प केवळ प्रवाससुविधा निर्माण करणार नाही, तर शहराच्या आर्थिक, सामाजिक व पर्यावरणीय विकासालाही चालना देईल. ठाण्याच्या जनतेचे मेट्रो मधून प्रवास करण्याचे स्वप्न लवकरच पूर्ण होत आहे. याबरोबरच गायमुख ते छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या मेट्रो प्रकल्पाचे भूमिपूजन होणार आहे. त्यामुळे भविष्यात घोडबंदर मार्गावरील वाहतूक कोंडीतून मुक्तता होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ठाणे सारख्या महानगराला आधुनिक वाहतुकीची कास धरावी लागणार हे वास्तव आता टाळता येणार नाही. मेट्रो मार्ग ४ व ४ए या दृष्टीने नवा टप्पा ठरेल. आज वाहतूक कोंडी, प्रदूषण आणि तासन्तास वाया जाणारा वेळ हे सर्व प्रश्न जटिल झाले आहेत. अशा वेळी पर्यावरणपूरक, सुरक्षित व जलदगती मेट्रो हा प्रवासाचा नवा पर्याय ठरेल.
0 टिप्पण्या