- सायबरबुलिंग आणि ऑनलाईन शोषणाविरोधातील मोहिमेचा एक भाग म्हणून महाराष्ट्र सायबर पोलीस यांच्या सहकार्याने ब्रश ऑफ होपच्या मोबाईल अॅप्लिकेशन, चॅटबॉट आणि सुधारित वेबसाईटचे शनिवार, २७ सप्टेंबर २०२५ रोजी वरळी येथील हॉटेल ब्ल्यू सी येथे अनावरण झाले. या कार्यक्रमास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ध्वनीचित्रफितीच्या माध्यमातून कार्यक्रमाला संबोधले. त्याचसोबत महाराष्ट्र सायबरचे अतिरिक्त पोलिस महासंचालक यशस्वी यादव (आयपीएस), मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी मुंबईचे सह पोलिस आयुक्त (कायदा आणि सुव्यवस्था) सत्यनारायण चौधरी (आयपीएस), ख्यातनाम अभिनेत्री सोनाली बेंद्रे, प्रसिद्ध अभिनेते जॅकी भगनानी आदी मान्यवर देखील उपस्थित होते.
ब्रश ऑफ होपचा हा ऍप सायबर क्राईमसाठी गेमचेंजर ठरणारा असेल. या ऍपमुळे सायबरबुलिंग आणि सेक्सटॉर्शन पिडीतांना चांगली मदत ठरेल. ब्रश ऑफ होपच्या या स्तुत्य उपक्रमासाठी डॉ.शीतल गगराणी, श्रीमती मिनू देवरा, श्रीमती रूपल कनकिया आणि श्रीमती गायत्री ओबेरॉय, यशस्वी यादव आणि ब्रश ऑफ होपच्या संपूर्ण चमूचे अभिनंदन, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी कौतुक केले.
आजच्या काळात ब्रश ऑफ होपने निर्माण केलेल्या या ऍपची खऱ्या अर्थाने गरज आहे. महिला सक्षमीकरणाच्या दिशेने हे देखील महत्वाचं पाऊल आहे. सायबरबुलिंग आणि सेक्सटॉर्शनने पिडीत प्रत्येक व्यक्तीसाठी हे ऍप सहाय्यभूत ठरेल. या महत्वपूर्ण पावलासाठी ब्रश ऑफ होप संस्था आणि डॉ. शीतल गगराणी यांचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे, असे गौरवोद्गार अभिनेत्री सोनाली बेंद्रे यांनी काढले.
सायबरबुलिंग आणि सेक्सटॉर्शन या दुष्प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र सायबर विभाग नेहमीच तत्पर असतो. ब्रश ऑफ होपचा हा ऍप सायबर गुन्ह्याने पिडीतांना नक्कीच सहाय्यभूत ठरणारा आहे. महाराष्ट्र सायबरचे या कामी ब्रश ऑफ होप संस्थेला नेहमीच पाठबळ असेल, अशी ग्वाही महाराष्ट्र सायबरचे अतिरिक्त पोलिस महासंचालक यशस्वी यादव यांनी दिली.
आजच्या वेगाने विकसित होणाऱ्या डिजिटल युगामध्ये, सायबरबुलिंग आणि सेक्सटॉर्शन हे आपल्या समाजासमोरील सर्वात गंभीर समस्यांपैकी एक समस्या आहे. समाजातील प्रत्येक घटक विशेषतः तरुण वर्ग या समस्येने ग्रस्त आहे. या समस्येला बळी पडणारी व्यक्ती याची कुठेही वाच्यता करत नाही याचा अपप्रवृत्ती गैरफायदा घेतात. पिडितांनी न घाबरता पुढे येऊन या अपप्रवृत्तीचा सामना करावा यासाठी मोबाईल अॅप्लिकेशन, चॅटबॉट आणि वेबसाईटची निर्मिती ब्रश ऑफने केली आहे. सायबर गुंडांविरुद्धची ही मोहिम महाराष्ट्र सायबर पोलीस यांच्या सहकार्याशिवाय अशक्य आहे. या मोबाईल ऍप द्वारे पिडीतास कायदेशीर मार्गदर्शन, समुपदेशन आदी सेवा गोपनीयता बाळगून नि:शुल्क मिळणार आहेत, असे ब्रश ऑफ होप (BoH) संस्थेच्या संस्थापिका डॉ. शीतल गगराणी यांनी सांगितले.
सायबरबुलिंग आणि सेक्सटॉर्शनच्याला बळी पडून आपले जीवन गमावलेल्या डॉ. गगराणी यांच्या भाची स्वरा यांच्या स्मृतीप्रित्यर्थ, डॉ.शीतल गगराणी यांनी ही संस्था निर्माण केली. स्वरा सारख्या सायबरबुलिंग आणि सेक्सटॉर्शन सारख्या अपप्रकाराला कोणी बळी पडू नये म्हणून ही संस्था कार्यरत आहे. संस्था निर्मितीत श्रीमती मिनू देवरा, श्रीमती रूपल कनकिया आणि श्रीमती गायत्री ओबेरॉय यांचे देखील योगदान आहे. समुपदेशन, जागरूकता कार्यशाळा, प्रशिक्षण कार्यक्रमांपासून ते जनजागृती मोहीम आणि कायदेशीर मार्गदर्शनापर्यंत सर्व सेवा ब्रश ऑफ होप मोफत प्रदान करते.
नवीन विकसित केलेले मोबाइल अॅप्लिकेशन पुढील सेवा प्रदान करेल:
त्वरित सहाय्य - प्रशिक्षित समुपदेशक आणि कायदेशीर तज्ञांशी त्वरित संपर्क
सुलभता आणि सुविधा – वापरकर्त्यास अनुकूल असा इंटरफेस
गोपनीयता आणि सुरक्षा - पीडितांना मदत मिळविण्यासाठी एक सुरक्षित डिजिटल सहाय्य
व्यापक मार्गदर्शन - भावनिक, कायदेशीर मदत
अॅपसोबतच, एक सुधारित ब्रश ऑफ होप वेबसाइटचे देखील अनावरण करण्यात आले. नवीन डिझाइन, परस्परसंवादी वैशिष्ट्ये, रिपोर्टिंग पर्याय आणि वर्धित जागरूकता संसाधने यामध्ये आहेत.

0 टिप्पण्या