Top Post Ad

ठरवून दिलेल्‍या कालमर्यादेतच पूल प्रकल्‍पांची कामे मार्गी लावण्याचे निर्देश

मुंबई महानगरक्षेत्रातील उड्डाणपुलांच्या कामांना गती मिळाली असून, ही कामे नियोजनबद्ध व वेगाने पूर्ण करण्यावर विशेष भर देण्यात यावा. रेल्वे प्रशासनासोबत आवश्यक समन्वय साधून कामांचे सुयोग्य नियोजन करावे. सर्व प्रकल्प नियोजित मुदतीत पूर्ण होण्यासाठी आवश्यक उपाययोजना तातडीने हाती घेण्यात याव्यात, असे निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प)  अभिजीत बांगर यांनी दिले. ठरवून दिलेल्‍या कालमर्यादेतच पूल प्रकल्‍पांची कामे मार्गी लावावीत, अशी सक्‍त ताकीददेखील  बांगर यांनी दिली.

 महानगरपालिकेने केलेल्या नियोजनाप्रमाणे अंधेरी पूर्व आणि पश्चिम भागांना जोडणारा गोपाळ कृष्ण गोखले पूल, मशीद बंदर रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर असलेला व पी. डि' मेलो मार्गाला जोडणारा सिंदूर (पूर्वीचे कर्नाक) उड्डाणपूल आणि मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणारा विक्रोळी पूल पावसाळ्यापूर्वी वाहतुकीस खुले करण्यात आले. विशेषतः गोपाळ कृष्ण गोखले पूल  आणि सिंदूर पुलाची कामे अनेक आव्हाने पार करत विहित कालावधीत पूर्ण करण्यात आली. या पार्श्वभूमीवर शीव (सायन) उड्डाणपूल, बेलासिस उड्डाणपूल, विद्याविहार उड्डाणपूल आणि महालक्ष्मी येथील 'केबल स्टेड पूल' या रेल्वे उड्डाणपुलांच्या  पुनर्बांधणीच्या कामांचा आढावा अतिरिक्त  महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प)  अभिजीत बांगर व पोलीस सह आयुक्त (वाहतूक)  अनिल कुंभारे यांनी आज (दिनांक १६ सप्टेंबर २०२५) घेतला. महानगरपालिका मुख्यालयात झालेल्या बैठकीस  महानगरपालिकेचे प्रमुख अभियंता (पूल)  उत्तम श्रोते यांच्यासह रेल्वे विभागाचे संबंधित अधिकारी, अभियंते उपस्थित होते.

शीव पूर्व - पश्चिम भागांना जोडणा-या शीव (सायन) उड्डाणपुलाचे बांधकाम दिनांक ३१ मे २०२६ पर्यंत पूर्ण करण्यासाठी महानगरपालिका प्रयत्नशील आहे.  उड्डाणपुलाच्‍या दक्षिण बाजूकडील पादचारी पुलाचे (FOB) काम रेल्‍वे विभागामार्फत सुरू आहे. हे काम दिनांक ३१ ऑगस्‍ट २०२५ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु, त्यास विलंब झाला आहे. आता पादचारी पुलाचे काम दिनांक ३१ ऑक्टोबर २०२५ पर्यंत पूर्ण करण्याची हमी रेल्वे प्रशासनाने दिली आहे. पादचारी पूल उभारल्यानंतरच पुलाचे पाडकाम पूर्ण केले जाईल. उर्वरित कामे सत्वर व्हावीत, यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी, असे निर्देश रेल्वे प्रशासनाला देण्यात आले आहेत.

अतिरिक्‍त महानगरपालिका आयुक्‍त (प्रकल्‍प)  अभिजीत बांगर म्‍हणाले की, ताडदेव - नागपाडा आणि मुंबई सेंट्रल स्थानकाला जोडणा-या बेलासिस उड्डाणपुलाच्या पुनर्बांधणीस वेग आला आहे. पुलाचे रेल्वे हद्दीतील काम पश्चिम रेल्वे करत असून पुलाच्या पोहोच रस्त्याची उभारणी बृहन्मुंबई महानगरपालिका करत आहे.  या अंतर्गत पहिल्याच टप्प्यात रेल्वे कंत्राटदाराने ३६ मीटर स्पॅनच्या  एकूण १२ तुळया स्थापित (Girder Launching) करण्याची कार्यवाही दिनांक १० ऑगस्ट २०२५ रोजी पूर्ण केली आहे. आता, रेल्वे प्राधिकरणाने तुळयाचे मजबुतीकरण (girder bracing), पुलाच्या प्रवास पृष्ठ भागाची रचना (Deck Sheet) करणे, स्लॅब कास्टिंग इत्यादी कामे हाती घेतली आहेत. यासाठी वाहतूक व वीज पुरवठा या दोन्ही‍ घटकांमध्ये ४० खंड (Block) घेतले जाणार आहेत. पूर्व आणि पश्चिम बाजुला प्रत्येकी एका खांबाचे काम शिल्लक राहिले होते, ते काम वेगाने सुरू करण्यात आले आहे. एकूणच, निविदा अटी-शर्तीनुसार, पुलाच्या बांधकामाचा विहित कालावधीत दिनांक ३१ मे २०२६ आहे. त्यापूर्वी ६ महिने अगोदर म्हणजेच, दिनांक ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत बेलासिस उड्डाणपुलाचे बांधकाम पूर्ण करण्याचा महानगरपालिकेचा प्रयत्न आहे.     

‘एन’ विभाग हद्दीत, पूर्व आणि पश्चिम यांना जोडणारा विद्याविहार रेल्वे स्थानकावरून जाणाऱया उड्डाणपुलाचे संपूर्ण काम दिनांक ३१ मे २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट्य आहे. पुलाच्या पूर्व बाजूकडील सर्व कामे दिनांक ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहेत. तर, पश्चिम बाजूकडील प्रकल्‍प बाधित व्यक्तींचे (Project Affected Person - PAP) पर्यायी सदनिका देऊन पुनर्वसन करण्याची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी ५ महिन्यांचा कालावधी लागणार आहे. बाधितांसाठी निवासी सदनिका निश्चित करण्यात आल्या आहेत. येत्या १५ दिवसात विभाग कार्यालयाच्या (Ward Office) माध्यमातून प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन केले जाईल व बांधकामांचे निष्कासन केले जाईल. त्यानंतर, पुढील ५ महिन्यात म्हणजेच दिनांक ३१ मे २०२६ पर्यंत पुलाची उर्वरित कामे जलद गतीने मार्गी लावावीत, असे स्पष्ट, निर्देश बांगर यांनी दिले.

 महालक्ष्मी  येथे होणारी वाहतूककोंडी फोडण्यासाठी विकास नियोजन आराखड्यानुसार बृहन्‍मुंबई महानगरपालिकेच्यावतीने दोन नवीन पूल बांधण्यात येत आहेत. या पुलांमुळे वाहतुकीचे नियमन सुरळीत होणार आहे. केशवराव खाड्ये मार्गावर महालक्ष्मी येथे उभारण्यात येणारा 'केबल स्टेड पूल' हा रेल्वे रूळांवरील महानगरपालिकेचा पहिला केबल आधारित पूल आहे. केबल स्टेड पुलास आधार देण्‍यासाठी ७० मीटर उंच पायलॉन (मोठा खांब) उभारण्‍याचे काम प्रगतिपथावर आहे. जानेवारी २०२६ पर्यंत पायलॉनचे काम पूर्ण केले जाईल. केबल स्‍टेड पुलासाठी पूर्व बाजूला रेल्‍वे भागावर १६० मीटरचा तर, पश्चिम बाजूस ९० मीटरचा स्‍पॅन (Span) आहे. डिसेंबर २०२५ अखेरपर्यंत पायलॉनच्‍या पश्चिम बाजूच्‍या ९० मीटरच्‍या पुलाचा स्‍पॅन (Span) पूर्ण केला जाईल. तर, पूर्व बाजूकडील रेल्‍वे भागावरील १६० मीटरच्‍या स्‍पॅनचे काम जानेवारी २०२६ पासून सुरू केले जाईल. सप्‍टेंबर २०२६ पर्यंत हे काम सुरू राहील. त्‍याचवेळी पुलाच्‍या पोहोच मार्गाचे (Approach Road) काम सुरू करण्‍यात येईल.  एकंदरीतच, बांधकामासह पुलाची अनुषंगिक कामे दिनांक ३० नोव्‍हेंबर  २०२६ पर्यंत पूर्ण व्‍हायला हवीत, असे निर्देश बांगर यांनी दिले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com