महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जनआरोग्य योजना सर्वसामान्यांपर्यंत वर्षानुवर्षे पोहचविणारे आरोग्य मित्र कर्मचारी यांचे प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालले आहेत. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र आरोग्य मित्र कर्मचारी संघटना (सीटू संलग्न)च्या वतीने आरोग्य मंत्र्यांना निवेदन देण्यात आले. सदर निवेदन हे संघटनेचे अध्यक्ष डॉ.डी.एल.कराड यांच्या अध्यक्षतेखाली कॉ. आनंदी अवघडे, कॉ. राहुल गायकवाड, कॉ. युवराज पाटील, कॉ. किरण ढमढेरे , कॉ.गौतम कोंगळे यांच्या शिष्टमंडळाच्या नेतृत्वाखाली देण्यात आले
सदर निवेदनाद्वारे संप काळात टीपीए कंपन्यांनी 16000 पगार अदा करण्यात येईल असे सांगून देखील अद्याप पर्यंत काही टीपीए कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना ते लागू केलेले नाही. ते त्वरित लागू करण्यात यावे. त्याचबरोबर संप काळात सहभागी झालेल्या काही कामगारांना हेतूपूर्वक कामावरून कमी करण्यात आले असून काही कामगारांचे कॉन्ट्रॅक्ट रिन्यूएशनदेखील करण्यात आलेले नाही. याबाबत देखील आरोग्यमंत्र्यांनी मध्यस्थी करून कामगारांना न्याय मिळवून द्यावा. त्याचबरोबर दरवर्षी दहा टक्के पगार वाढ, किमान 26 हजार रुपये वेतन अदा करण्यात यावे, पाच वर्ष पूर्ण झालेल्या कामगारांना ग्रॅच्युइटी अदा करण्यात यावी, पी.एफ. इ.एस.आय.सी च्या त्रुटी दूर करण्यात याव्या, ड्युटी दरम्यान प्रवास करावा लागल्यास पेट्रोल अलाउन्स देण्यात यावा,इत्यादी बाबत महत्त्वाच्या प्रश्नांवर आरोग्यमंत्र्यांसोबत चर्चा करण्यात आली. यामध्ये संबंधित टीपीए कंपनी व्यवस्थापन, आरोग्य मित्र कर्मचारी संघटना त्याचबरोबर आरोग्य हमी सोसायटी व्यवस्थापन यांची संयुक्त बैठक माननीय आरोग्य मंत्री यांच्या मध्यस्थीने आयोजित करण्यात यावी. यासाठी चर्चा करण्यात आली याबाबत आरोग्यमंत्र्यांनी सकारात्मकता दर्शवली असून पुढील काळात लवकरच संयुक्त बैठक आयोजित करण्यासाठी नियोजन केले जाईल. असे आरोग्यमंत्र्यांकडून कळविले गेले आहे.
0 टिप्पण्या