सातत्याने सुरू असलेला पाऊस, काही ठिकाणी खोळंबलेली वाहतूक, नागरी सुविधांमध्ये खंड न पडू देणे, अशा ४८ तासांच्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये वेळीच उपाययोजना करणे आणि एकूणच कोट्यवधी मुंबईकरांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विविध विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचे लाखो हात अविरतपणे झटत होते. यामध्ये साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी, कचरा वाहून पावसाच्या पाण्यात अडथळा निर्माण होऊ नये यासाठी, तसेच आपत्कालीन परिस्थितीत अडकलेल्या नागरिकांचा बचाव आणि मदतीसाठी महानगरपालिकेचे कर्मचारी शर्थीचे प्रयत्न करत होते. या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे मुंबईतील जनजीवन लागलीच पूर्वपदावर येण्यास मदत झाली. अशा परिस्थितीमध्ये मुंबईकर नागरिकांनी दाखवलेले धैर्य, संयम आणि सहकार्याबद्दल बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून आभार मानण्यात येत आहे.
सोमवार, दिनांक १८ आणि मंगळवार दिनांक १९ ऑगस्ट २०२५ या ४८ तासांच्या कालावधीदरम्यान बृहन्मुंबई (मुंबई शहर व उपनगरे) क्षेत्रात अतिजोरदार पाऊस झाला. काही ठिकाणी अल्पावधीतच ३०० मिलिमीटरपेक्षा अधिक तर बहुतांश ठिकाणी २०० मिलिमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. अतिजोरदार पाऊस, प्रसंगी वेगाने वाहणारे वारे, सखल भागांमध्ये जोरदार पावसाने साचलेल्या पाण्यामुळे विस्कळीत वाहतूक या एकंदर परिस्थितीत मुंबईकरांना काही प्रमाणात असुविधांचा सामना करावा लागला. तथापि, मुंबईकरांची सुरक्षितता आणि विविध उपाययोजना अत्यंत तत्परतेने आणि जलदगतीने पार पाडत जनजीवन सामान्य ठेवण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने अविरतपणे कार्य केले. त्यासाठी इतर सर्व यंत्रणांशी समन्वयदेखील राखले.
या सततच्या जोरदार पावसामुळे निर्माण होणारी परिस्थिती तसेच त्यावर वेळीच करावयाच्या उपाययोजनांच्या अनुषंगाने महानगरपालिकेचे सर्व वरिष्ठ अधिकारी संपूर्ण परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून होते. महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. (श्रीमती) अश्विनी जोशी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) श्री. अभिजीत बांगर हे महानगरपालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षातून परिस्थितीचा सातत्याने आढावा घेत विविध उपाययोजनांसंदर्भात वेळीच निर्देश देत होते. आवश्यक त्यावेळी स्वत: प्रत्यक्ष क्षेत्रावर उपस्थित राहून त्यांनी देखरेख केली. महानगरपालिकेचे सर्व संबंधित सह आयुक्त, उपायुक्त, सहायक आयुक्त तसेच विविध विभागांचे, खात्यांचे प्रमुख त्यांच्या संबंधित कार्यक्षेत्रात प्रत्यक्ष कार्यरत होते.
सततच्या पावसामुळे पाण्याचा निचरा होण्यासाठी येणारी आव्हाने, समुद्राला भरती असताना अतिसखल भागांमध्ये पाण्याचा निचरा होण्यासाठी विलंब होणे आदी आव्हानांवर वेळीच उपाययोजना करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पर्जन्य जलवाहिनी, मलनि:सारण, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी प्रत्यक्ष क्षेत्रावर (On field) कार्यरत होते. यामध्ये प्रामुख्याने अभियंते, पंप ऑपरेटर, आरोग्य कर्मचारी, आपत्कालीन पथके, कामगार आदींचा समावेश होता. पावसाळी पाणी निचऱ्याच्या कामांमध्ये अडथळा येऊ नये म्हणून आवश्यक त्या उपाययोजना तातडीने केल्या जात होत्या. तसेच, पावसाच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांना महानगरपालिकेची यंत्रणा आवश्यक ती सर्व मदत करत होती. मुंबईतील विविध उपनगरीय रेल्वे स्थानकांवर अडकलेल्या प्रवाशांना महानगरपालिकेच्या वतीने अल्पोपहार, पिण्याचे पाणी वितरण करण्यात आले. पर्यायी व्यवस्था म्हणून बेस्ट प्रशासनाशी समन्वय साधून त्यांच्या पुढील प्रवासासाठी बसेसची व्यवस्थाही करण्यात आली.
दोन दिवस सुरू असलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर, आपत्कालीन परिस्थितीबाबतच्या विविध यंत्रणांशी समन्वय साधण्यासाठी महानगरपालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षातून अत्यंत तत्परतेने आणि जलदगतीने कार्यवाही होत होती. या ४८ तासांच्या कालावधीत १८ कर्मचारी आपत्कालीन नियंत्रण कक्षातच मुक्कामी राहून सलगपणे कार्यरत होते. यामध्ये १२ महिला कर्मचाऱ्यांचा समावेश होता. या कालावधीत महानगरपालिकेच्या १९१६ या मदतसेवा क्रमांकावर सुमारे ३ हजार ५०० कॉल्स प्राप्त झाले. त्यामध्ये पाणी साचणे, झाडे, फांद्या, घरे किंवा भिंती पडणे यासंबंधीत तक्रारी तसेच भरती, ओहोटी, वाहतुकीसंदर्भात माहिती घेण्यासाठी आलेल्या कॉल्सचा समावेश होता. प्रत्येक कॉल्सला समाधानकारक उत्तरे देण्यासोबतच त्यांचे निराकरण करण्यासाठी विविध यंत्रणांशी समन्वयदेखील साधला गेला. यासह महानगरपालिकेचे संकेतस्थळ, व्हॉट्सअॅप चॅटबॉट, समाजमाध्यमे (सोशल मीडिया) आदींवर प्राप्त झालेल्या तक्रारींबाबतदेखील संबंधित खात्याशी समन्वय साधून निराकरण करण्यात आले.
आपत्कालीन व्यवस्थापन विभागाच्या अंतर्गत मुंबईमध्ये अंधेरी, डी विभाग, घाटकोपर, कुर्ला या चार ठिकाणी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे ५ पथक कार्यरत आहेत. कुर्ला भागातील क्रांतिनगर येथे दरडप्रवण परिसरात वास्तव्यास असलेल्या सुमारे ३५० नागरिकांना स्थलांतरित करण्याचे काम त्यांनी केले. तसेच, त्यांचे निवास, भोजनाची व्यवस्था महानगरपालिकेकडून करण्यात आली. त्यांना प्राथमिक आरोग्यविषयक सुविधाही पुरविण्यात आल्या. तर, चेंबूर येथे मोनोरेल्वेमध्ये अडकलेल्या ५८२ प्रवाशांना सुखरुपपणे बाहेर काढण्याची अत्यंत कौतुकास्पद कामगिरी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुंबई अग्निशमन दलाने पार पाडली. या दोन्ही घटनांवर उपाययोजना करण्यासाठी आपत्कालीन व्यवस्थापन विभागातून समन्वयन साधले जात होते. तसेच, भांडूप येथे १० ऑटोरिक्षांवर झाड उन्मळून पडले. महानगरपालिकेच्या उद्यान विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचत पुढील कार्यवाही केली आणि तेथील वाहतूक सुरळीत केली.
पावसाच्या ४८ तासांच्या कालावधीदरम्यान नागरिकांना वेळीच सत्य आणि अधिकृत माहिती व्हावी, यासाठी महानगरपालिकेच्या वतीने प्रसारमाध्यम आणि समाजमाध्यमांचा (सोशल मीडिया) प्रभावीपणे वापर करण्यात आला. त्यामध्ये हवामानविषयक माहिती, पावसाची आकडेवारी, वाहतूक व्यवस्थेबाबत माहिती, प्रशासनाकडून देण्यात आलेल्या सूचना, नागरिकांना वेळोवेळी केलेले आवाहन, सुटीबाबतचा संदेश आदी वेळच्या वेळी प्रसारित केल्यामुळे नागरिकांना सहजपणे योग्य आणि अधिकृत माहिती प्राप्त होऊ शकली. परिणामी, नागरिकांपर्यंत अचूक माहिती पोहोचली. पर्यायाने, त्यांना वेळीच योग्य तो निर्णय घेण्यास मदत झाली. बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आलेल्या कारवाईबाबत प्रसारमाध्यमांकडून आणि समाजमाध्यमांवर नागरिकांकडून सकारात्मक प्रतिक्रिया प्राप्त झाल्या.
मुसळधार पाऊस सुरू असूनही महानगरपालिकेकडून मुंबईकरांना पुरविण्यात येणाऱ्या मूलभूत नागरी सेवा-सुविधांवर कोणताही परिणाम होणार नाही, याची पूर्णपणे दक्षता घेण्यात आली. मुंबईकरांना पुरविण्यात येणाऱ्या पाणीपुरवठ्यामध्ये कोणताही खंड पडणार नाही, याची काळजी जल अभियंता विभागाकडून घेण्यात आली. रुग्णालये व दवाखाने यांची यंत्रणा कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीवर मात करण्यासाठी सज्ज होती. सर्व रुग्णालयांतील बाह्यरुग्ण विभाग नेहमीप्रमाणे दक्षतेने कार्यरत होते. घनकचरा व्यवस्थापन विभागातील स्वच्छता कर्मचाऱ्यांकडून रस्त्यांवर, गल्लीबोळात कचऱ्यामुळे पाण्याचा निचरा होण्यात अडथळा निर्माण होणार नाही, याची आवर्जून काळजी घेतली. याशिवाय, महानगरपालिकेच्या सर्व यंत्रणा जागोजागी आपापली कर्तव्ये तत्परतेने पार पाडत होती.
केवळ आपल्या कार्यक्षेत्रापुरते मर्यादित न राहता आपत्कालीन परिस्थितीमध्ये अडकलेल्या इतर भागातील नागरिकांनाही मदत करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासन हिरिरीने सरसावले. वसई-विरार भागातील मोरगावी येथे पावसाच्या पाण्यामुळे अडकून पडलेल्या नागरिकांच्या बचावासाठी मुंबईतील राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे (एनडीआरएफ) पथक पाठवण्यात आले. या पथकाने सुमारे ४० नागरिकांना सुखरुप बाहेर काढले. या बचावकार्यासाठीदेखील महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने समन्वयन केले.

0 टिप्पण्या