५ सप्टेंबर शासकीय शिक्षक दिवस म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने मुंबई महानगरपालिकेकडून शिक्षण क्षेत्रात अतुलनीय कामगिरी करणाऱ्या शिक्षकांना दरवर्षी ‘आदर्श शिक्षक महापौर पुरस्कार’ जाहीर केले जातात. त्यानिमित्ताने आदर्श शिक्षक महापौर पुरस्कार सन २०२४-२५ च्या पुरस्कार प्राप्त शिक्षकांची नावे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या उप आयुक्त (शिक्षण) डॉ. (श्रीमती) प्राची जांभेकर यांनी आज (दिनांक २५ ऑगस्ट २०२५) महानगरपालिका मुख्यालयातील पत्रकार कक्ष येथे आयोजित पत्रकार परिषदेत जाहीर केली. महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक. भूषण गगराणी आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी यांच्या मार्गदर्शनात, निर्धारित निकषांनुसार संबंधित समितीद्वारे आदर्श शिक्षक महापौर पुरस्कारार्थींची निवड करण्यात आली.
मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षणाधिकारी (माध्यमिक) श्रीमती सुजाता खरे, उपशिक्षणाधिकारी मुख्तार शाह आदी मान्यवर पत्रकार परिषदेस उपस्थित होते. शिक्षण विभागातील महानगरपालिका प्राथमिक व माध्यमिक शाळा, खासगी अनुदानित व विनाअनुदानित प्राथमिक शाळांमधील जे शिक्षक ज्ञानदानाचे व विद्यार्थी घडविण्याचे काम प्रामाणिकपणे करीत आहेत, त्यांचा यथोचित गौरव करण्याची परंपरा सन १९७१ पासून सुरू आहे. या परंपरेत आता दरवर्षी ५० आदर्श शिक्षकांना ‘महापौर पुरस्काराने’ गौरविण्यात येते.
मुंबई महानगरपालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळा, खासगी अनुदानित शाळा व विना अनुदानित प्राथमिक शाळांतील ५० शिक्षकांना प्रत्येकी रुपये ११ हजार (ECS द्वारे), महानगरपालिका मानचिन्हाचे सोन्याचा मुलामा दिलेले पदक, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, शाल, श्रीफळ व फेटा प्रदान करुन सन्मानित केले जाणार आहे.
सन- २०२४-२५ च्या पुरस्कारासाठी आदर्श शिक्षकांची निवड करण्यासाठी महानगरपालिका प्राथमिक व माध्यमिक शाळा, खासगी अनुदानित शाळा व विनाअनुदानित शाळांतील एकूण १४२ शिक्षकांच्या मुलाखती घेऊन त्यातून ५० आदर्श शिक्षकांची निवड करण्यात आली आहे. पुरस्कारार्थींमध्ये २७ महिला शिक्षकांसह २३ पुरुष शिक्षकांचा समावेश आहे. तसेच पुरस्कारार्थींमध्ये मराठी माध्यमाचे १०, इंग्रजी माध्यमाचे ०५, हिंदी ०६, उर्दू ६, गुजराथी भाषा एक, विशेष मुलांची शाळेतील एक शिक्षक, मान्यताप्राप्त खासगी अनुदानित व विनाअनुदानित १२ यासह तमीळ, तेलगू आणि कन्नड माध्यमाच्या शाळा मिळून एक, शारीरिक शिक्षण, चित्रकला, हस्तकला/कार्यानुभव आणि संगीत या माध्यमाच्या शाळांमधून प्रत्येकी एक आणि माध्यमिक शाळांमधून ४, असे एकूण ५० शिक्षकांची निवड करण्यात आली आहे.

0 टिप्पण्या