फोडा आणि राज्य करा ही इंग्रजांची राजनिती होती काँग्रेस भाजप बहुजन प्रती तीच निती वापरून सत्ता भोगत आहेत पण आंबेडकरी नेते या नितीने कोणते राजकारण करीत आहेत? डॉ.बाबासाहेबांच्या संकल्पनेतील रिपब्लीकन पक्ष कळला नसल्यामुळेच ना-लायक नेते आंबेडकरी जनतेचे गटातटात लचके तोडत आहेत. आजच्या युवा पिढीने त्यांच्या गटबाजीची वाट न मळता बहुजनास एकसंघ शक्ती बनविण्यासाठी राजकारण करण्यापूर्वी डॉ.बाबासाहेबांच्या संकल्पनेतील रिपब्लीकन पक्ष समजून घेतला पाहिजे. गरीब, कष्टकरी, श्रमजीवी वर्गाच्या कल्याणासाठीच बाबासाहेबांनी शेड्युल्ड कास्ट फेडरेशन स्थापन केली होती. सविधानात एस.सी., एस.टी.बरोबरच ओबीसी आयोग स्थापन केलेले बाबासाहेब 1954 मध्ये लखनौच्या एका जाहीर सभेत म्हणतात की, एस.सी. एस.टी अॅण्ड ओबीसींना मी दिलेला मताचा अधिकार व विकासाकरिता आरक्षण दिले. ते सत्तेसाठी संघटीत झाले तर भविष्यात या देशाचे मालक असतील आणि गोविंद वल्लभ पंतासारखी माणसे आमच्या लोकांच्या बुटाची लेस सोडण्यात व बांधण्यात धन्यता मानतील.
प्रबळ रिपब्लिकन पक्षाच्या निर्मितीबाबत बाबासाहेबांनी खुले पत्र लिहिले होते. रिपब्लीकन पक्षाची प्रारुप मांडणी करताना सात उद्दिष्ट्ये असलेला लोकशाही समाजवादी पक्ष काढावयाचा होता. या पक्षात आचार्य अत्रे, एस.एम.जोशी, डा.राममनोहर लोहिया, जयप्रकाश नारायण, मधु लिमय सारख्या अनेक पुरोगी नेत्यांनी येण्याचे मान्य केले होते. परंतु पक्ष स्थापन होण्यापूर्वी बाबासाहेबांचे 6 डिसेंबर 1956 रोजी महापरिनिर्वाण झाले. परंतु त्यांनतरच्या आंबेडकरी नेत्यांनी गटातटात वादविवाद इतर नेत्यांना न बोलविताच 3 ऑक्टोबर 1957 रोजी रिपब्लीकन पक्षाची स्थापना केली. परंतु बहुजन समाजाला संघटित करण्यापेक्षा गटातटाने हा पक्ष एका समुहापलिकडे गेलाच नाही.दादासाहेब गायकवाडांचे भूमीहिन आंदोलन सोडले तर देश पातळीवर दखल घेणारे रिपब्लीकन पक्षाचे कोणतेच आंदोलन केलेले नाही. बाबासाहेबांनी काँग्रेस हे जळत घर म्हटले पण याचा अर्थ प्रत्येक नेत्याने आपल्या सोईने घेतला. भाजप हा भांडवली व्यवस्थेचा पुरस्कर्ता तर काँग्रेस हा भांडवलशाही पक्ष आहे. एकाच नाण्याच्या दोन बाजू असलेल्या पक्षांना तिसरा पर्याय आंबेडकरी नेत्यांना देता आला नाही. उलट देश गुलाम करणारी अर्थनिती काँग्रेसने आणली आणि भाजपाने स्वीकारली अशा दोन्ही पक्षाचे समर्थन करणारे नेते आणि विचारवंत, अर्थतज्ञ हे आंबेडकरवादी होऊ शकत नाहीत. य मंडळींनी परत एकदा डॉ.बाबासाहेबांच्या खुल्या पत्राचा अभ्यास करावा. कारण बाबासाहेबांनी खुल्या पत्रात बौद्धांच्या राजकीय संस्कृतीचा नकाशा रेखाटलेला आहे. पण तो दिसण्यासाठी दृष्टी हवी आणि वास्तवात येण्यासाठी कृती हवी पण नेत्यांकडे ना दृष्टी ना कृती आहे. ती चुक आजच्या युवा वर्गाने करू नये. खरा आंबेडकरवादी प्रतिक्रांती वाद्यांच्या ओंजळीने पाणी पिणार नाही की सत्तेसाठी कोणापुढे लाचार होणार नाही. ज्यांच्या डोक्यात बुद्ध फुले, शाहू, आंबेडकर आहेत ते अल्पसंख्यांक न होता बहुजन हिताय बहुजन सुखायचे राजकारण करतील.
डॉ.बाबासाहेबांच्या संकल्पनेतिल पक्षाची निर्मिती झाली असती तर संविधानिक मुल्यांचा पराभव झाला नसता. महासत्ता भारतात कोणीच गरीब राहिले नसते. जनतेला अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्यासाठी संघर्ष करावा लागला नसता. प्रगतीपथावर असलेल्या भारतातील शेवटच्या माणसाला लोकशाही स्वातंत्र्याचा खरा आनंद घेता आला असता. आणि संपूर्ण देशाला धम्म स्तुपाच्या पंखांखाली नेऊन बसविता आले असते. परंतु रिपब्लीकन पक्ष त्या कुवतीने जन्माला घालणे आणि तशी कृती करण्याची धमक आंबेडकरी नेत्यांमध्ये नाही. सर्वच नेत्यांमध्ये धगधगत्या आंबेडकर स्वभावाचा अभावच होता. प्रचंड बौद्धीक कुवत, निस्वार्थ वृत्ती, लोककल्याणाचा प्रचंड कळवळा याचा अनोखा संग्राम म्हणजे आंबेडकरी नेतृत्व पण ते स्वार्थाने आणि नाटकी पद्धतीने अजिबात दाखवता येत नाही.
बाबासाहेब म्हणत `बुद्धीवाद हाच आपल्या राजकीय संस्कृतीचा पाया असला पाहिजे. पण आमच्या नेत्यांना आपआपसात वाद घालण्यात आणि गटतट निर्माण करण्यापलिकडे येते तरी काय? मागासवर्गातील गायरान जमीनी, वतनी जमीनी आणि भुमीहिनांना सरकारकडून मिळालेल्या जमिनीचा वाद मिटविता आलेलाा नाही. छोट्या शेतकऱयांसाठी सामुदायिक शेती योजना राबविली जात नाही. सरकार व बिल्डर्स कवडी दामाने जमीनी खरेदी करून आदिवासी आगरी यांना भूमीहीन बनवित आहे. शिक्षणाचे खाजगीकरण करून शिक्षण सम्राट होत आहेत. त्याविरोधी आंदोलन उभे करून बहुजन समाजाला संघटित करण्यापेक्षा आंबेडकरी नेते बड्या पक्षाचे बटिक बनत आहेत. ताटाखालची मांजर होऊन आपला स्व-स्वार्थ साधत आहेत.
बाबासाहेबांचे नाव हेच त्यांच राजकीय कवच आहे. बाबासाहेबांना लणी नाणे बनवून ज्याला जसे बाजारात विकता येईल तसा तो विकण्या प्रयत्न करीत असतो. परंतु आंबेडकरवादाशी केलेला तो वैचारिक भ्रष्टाचार आहे तसाच तो आंबेडकरद्रोह आहे. त्यांना धडा शिकवून नव्याने पुढे येणाऱया पिढीणे लक्षात ठेवले पाहिजे की राजकारण करावयाचे तर प्रथम आंबेडकरवाद समजून घ्या. बाबासाहेब म्हणत, मी रिपब्लीकन पक्षाचे झाड खडकावर लावले असून त्याला फळे उशीरा येणार आहेत. परंतु येणारी फळे ही अतिशय मधूर असतील म्हणून ज्यांना घाई आहे त्यांनी खुशाल बाहेर जावे आणि तसेच घडत आहे सत्तेची घाई असणारे काँग्रेस भाजपात आणि आता शिवसेनेतही दाखल झाले आहेत. भगव्याच्या तंबुत निळा बांबू घुसावीत आहेत. परंतु सगळेच मिळून निळा तंबू उभा करण्याचा कधीच प्रयत्न करीत नाहीत.
ओबीसीचे नेते मुंडे भुजबळ कितीही अपमान झाला तरी त्याच पक्षात लाथा खातील पण तिथेच राहतील कारण ब्राह्मण सवर्णाच्या सोबत राहण्यात त्यांना धन्यता वाटते. असल्या स्वाभीमानहिन ओबीसी जाती आणि नेत्यांपेक्षा, आंबेडकरी नेत्यांना ओबीसी व मुस्लीम मधील अनेक गरीब, मागास, अन्यायग्रस्त जातींना संघटित केले पाहिजे. आगरी आदिवासींना सोबत घेतले पाहिजे. त्यासाठी त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी राष्ट्रपातळीवर आंदोलन उभे केले पाहिजे. असे करण्यात आंबेडकरी नेते यशस्वी होतील तर महाराष्ट्रातून रिपब्लीकन पक्षाचे आमदार मोठ्या संख्येने निवडून येऊ शकतात. त्यावेळी महाराष्ट्राच मुख्यमंत्री रिपब्लीकन पक्षाचाच असेल. नगरपालिका, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत मध्ये रिपब्लीकन पक्षाचे प्राबल्य निर्माण होऊ शकते. त्याची प्रयोगशाळा आता येणाऱ्या महानगर पालिका निवडणुका असायला हव्यात. झोपडपट्टीतून मोठ्या प्रमाणात मतदान होत असून एस सी, एस टी मतदार मोठ्या प्रमाणात आहे. केवळ बौद्ध मातंग, ढोर, चर्मकार संघटित झाले तर मुंबईत रिपब्लीकन पक्षाचे मोठ्या संख्येने नगरसेवक निवडून येऊ शकतात. परंतु आरपीआय नेते बेरजेपेक्षा वजाबाकीचे राजकारण करण्यात तरबेज आहेत. अहंकारी, माणुसघाणे, एककल्ली आणि हुकुमशाही त्यांच्या नसात भिनली आहे. कधी नामांतर तर कधी स्मारकाचा मुद्दा बनवून आंबेडकरी जनतेला भावनिक बनविण्यात तरबेज आहेत. त्यामुळे आंधळं दळतयं अन् कुत्रं पीठ खातंय अशी एकूण चळवळीची अवस्था झालेली आहे. आंबेडकरी नेत्यांच राजकीय वर्तन हे तमाशातील राजा सारखे आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांना देखील निवडणुकीचे दिवस हे सुगीचे दिवस वाटतात. निवडणुकीचा दिवस हा तुमचा नवा जन्म आणि प्रवर्तन क्रांतीचा दिवस आहे या बाबासाहेबांच्या शब्दांचा विसर पडला. तसेच काशीरामजींच्या शब्दांचा देखील विसर पडत असेल तर पेसे घेवून मतदान करणारे नक्कीच षंड् असले पाहिजे. कारण काशीरामजी म्हणत पैसे घेवून मत विकणे म्हणजे स्वत:च्या आई बहीण बायकोची इज्जत विकण्यासारखे आहे. तरी देखील चाड नसलेले, षंडाची संख्या कमी नाही. त्यासाठी पक्षात दलालांची नव्हे तर निष्ठावान भीम सैनिकांची फौज तयार झाली पाहिजे.
100 वर्षापूर्वी स्थापन करताना आरएसएसने शपथ घेतली होती भारत देशाला हिंदु राष्ट्र बनवून हिंदु राष्ट्राची घोषणा करणार... आज आपण भोवतालची परिस्थिती पाहिली तर याचा प्रत्यय आल्याशिवाय रहात नाही. त्या दृष्टीने यशस्वी होण्यासाठी ते सर्व मार्गाचा अवलंब करीत आहेत. त्यांना यशस्वी होऊ द्यायचे नसेल आणि या देशात बुद्धिझम रुजवायचा असेल तर आज युवा पुढीने आंबेडकरी नेत्यांच्या गटबाजीची स्वत:ला आणि पक्षाला कदापि लागण लाऊ देऊ नये. बाबासाहेबांच्या संकल्पनेतील रिपब्लीकन पक्ष यशस्वी करण्यासाठी त्याची ध्येय उद्दिष्ट समजून घेतली पाहिजेत आणि ती कृतीत आणण्याचा सतत प्रयास केला पाहिजे. त्यासाठी आंबेडकरवाद हा रक्तात नव्हे तर डोक्यात अर्थात मेंदूत असला पाहिजे. वर्तमानाच्या उंबरठ्यावर उभा असलेल्या युवा पिढीने, गेला तो भुतकाळ, येणारा भविष्यकाळ उज्ज्वल करावयाचा असेल तर मला नाही तुला नाही टाक कुत्र्याला ही संघबाधक वृत्ती टाकून एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ ही संतवाणी कृतीत आणायला हवी. त्यासाठी बौद्धीक ज्ञान असलेले तरुण जागृत करणे गरजेचे आहे. तोच बुद्धीझम सोबत रिपब्लीकन पक्षाची सत्ता प्रस्थापित करून प्रबुद्ध भारताची नव निर्मिती करेल.

0 टिप्पण्या