हिवताप, डेंगी आणि लेप्टोस्पायरोसिस या आजारांबाबतच्या तसेच गणपती मंडळातर्फे धूम्रफवारणी करण्याबाबत विनंती करण्याच्या अनुषंगाने विविध वृत्तपत्रांमध्ये बातम्या प्रकाशित झाल्या आहेत. या बातम्यांच्या अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून करण्यात येत आहे. महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्यामार्फत पावसाळ्याच्या कालावधीत प्रत्येक पंधरवड्यातून एकदा कीटकजन्य आणि जलजन्य आजारांच्या संदर्भात मासिक तुलनात्मक आकडेवारी जाहीर करण्यात येते. पावसाळी आजारांबाबत घ्यावयाची दक्षता याबाबतचे प्रसिद्धीपत्रक सर्वसामान्य नागरिकांच्या माहितीस्तव प्रसारमाध्यमांतून देण्यात येते. पावसाळी आजारांच्या अनुषंगाने प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आणि नागरिकांनी घ्यावयाची काळजी किंवा ताप आल्यानंतर काय करावे? यासारख्या सूचनांचा समावेश प्रसिद्धीसाठी देण्यात येणाऱ्या माहितीमध्ये करण्यात येतो. त्यासोबतच विभागनिहाय वैद्यकीय आरोग्य अधिकारी आणि कीटक नियंत्रण अधिकारी यांनी संबंधित सहायक आयुक्त यांच्या देखरेखीखाली केलेल्या विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि कार्यवाहीबद्दल माहिती नागरिकांना दिली जाते.
मुंबई महानगर क्षेत्रात यंदा मे २०२५ महिन्यापासूनच पाऊस सुरू झाल्याने कीटकजन्य आजारांचा विचार करता, २०२४ च्या तुलनेत २०२५ मध्ये हिवताप (मलेरिया) आणि चिकुनगुनिया आजारांच्या रुग्णसंख्येत वाढ दिसून आली. तुलनेत लेप्टोस्पायरोसिस रुग्णसंख्येत गत वर्षाच्या तुलनेत लक्षणीय घट झालेली दिसून येते. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) अहवालानुसार, जगभरात २०२५ मध्ये चिकुनगुनिया व डेंगीसारख्या कीटकजन्य रोगांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. आफ्रिका, आशिया व युरोपातील काही भागांमध्ये या आजारांचे उद्रेक झाले आहेत.महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक २० ऑगस्ट २०२५ रोजी झालेल्या बैठकीत पावसाळी आजारावर (हिवताप, डेंगी आणि लेप्टोस्पायरोसिस) प्रतिबंधात्मक कार्यवाहीबद्दल आढावा घेण्यात आला. प्रतिबंधात्मक कार्यवाही अधिक प्रभावीपणे करावी, असे निर्देश महानगरपालिका आयुक्त यांच्यामार्फत देण्यात आले आहेत. महानगरपालिका आयुक्त यांच्या निर्देशानुसार मुंबईत ‘शून्य डास’ मोहीम अंतर्गत रुग्णालये, कार्यालये, शाळा इत्यादी ठिकाणी दर शनिवारी मोहीम राबविण्यात येत आहे. रुग्णालय परिसरात डासांची उत्पत्ती स्थळे निर्माण होवू नये, याकरिता डास - प्रतिबंधक उपाययोजना म्हणून पाण्याच्या टाक्या, पाणी साठवण ठिकाणे, टाकाऊ (स्क्रॅप) आणि अडगळीचे साहित्य तसेच छत, मोकळी जागा इत्यादी ठिकाणी होणारी गळती व पाणी साचण्याची समस्या दूर करण्यात येत आहे. परिसरात पाणी साचण्यास कारणीभूत ठरणाऱ्या निरुपयोगी वस्तू तत्काळ काढून टाकण्यात येत आहे.
याव्यतिरिक्त महानगरपालिका विभाग कार्यालयांचे कर्मचारी नागरिकांच्या घरोघरी जाऊन तापाच्या रुग्णांचे सर्वेक्षण करत आहेत. तसेच गृहभेटी दरम्यान नागरिकांना लेप्टोविरुद्ध प्रतिबंधात्मक औषधोपचार देत आहेत. अतिवृष्टीमुळे साचलेल्या पाण्यातून प्रवास केलेल्या महानगरपालिका कर्मचाऱ्यांनी नजीकच्या दवाखाना किंवा रुग्णालयात त्वरित जाऊन लेप्टो प्रतिबंधक (Prophylaxis) उपचार घेण्याविषयी माहिती देण्यात आली आहे. खासगी वैद्यकीय व्यावसायिक (PMPs) व आयुष डॉक्टरांचे प्रबोधन (Sensitization) करण्यात येत आहे. तसेच हिवतापाकरिता समूळ उपचार देणे (रॅडिकल ट्रीटमेंट) आवश्यक आहे, याबाबत डॉक्टरांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिका कर्मचारी गणेशोत्सव मंडळांना भेट देऊन जनजागृती (IEC) उपक्रम राबवत आहेत. तसेच धूम्रफवारणी आणि इतर डास प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत आहेत.
*नागरिकांसाठी महानगरपालिकेच्या माध्यमातून डेंगी, हिवताप (मलेरिया), चिकुनगुनिया प्रतिबंधासाठी ....सद्यस्थितीत अधूनमधून पाऊस सुरु असल्यामुळे नागरिकांनी आपल्या घरामध्ये, घराच्या आजूबाजूला व इमारतींच्या परिसरात कुठेही पाणी साचू नये, याची दक्षता घ्यावी. साचलेल्या पाण्यातच डासांची मादी अंडी घालते व डासांची उत्पत्ती स्थळे तयार होतात, ही बाब लक्षात घेता साचलेले पाणी आढळून आल्यास तत्काळ निचरा करावा व खास दक्षता घ्यावी.जुने टायर, पाण्याच्या टाक्या, नळ्या, प्लास्टिक कंटेनर यांसारख्या वस्तुंची विल्हेवाट लावावी.दिवसा आणि रात्री झोपताना मच्छरदाणी किंवा डास प्रतिबंधात्मक (Mosquito Repellent) औषधांचा वापर करावा.ताप आल्यास जवळच्या बृहन्मुंबई महानगरपालिका संचालित हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, बृहन्मुंबई महानगरपालिका रुग्णालयात त्वरित संपर्क साधावा व उपचार पूर्ण करावेत.
लेप्टोस्पायरोसिस प्रतिबंधासाठी..... - पावसाच्या साचलेल्या पाण्यात प्रवास करणे टाळावे.- मुसळधार पावसात अनवाणी पायाने चालणे टाळावे. शक्य असेल तेव्हा गमबूटचा वापर करावा.- साचलेल्या पावसाच्या पाण्याशी संपर्कात आल्यास वैद्यकीय सल्ल्यानुसार रोगप्रतिबंधक उपचार घ्यावेत.
*जलजन्य रोगांसाठी खबरदारीचे उपाय (गॅस्ट्रो, हिपॅटायटीस, टायफॉइड):*
- गॅस्ट्रोपासून बचाव करण्यासाठी रस्त्यावरील / उघडे अन्न खाणे टाळावे.
- जेवण्यापूर्वी हात धुवावेत किंवा हँड सॅनिटायझर वापरावे.
- पाणी उकळून प्यावे.
नागरिकांनी ताप असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. स्वतः औषधी घेणे टाळावे. घराजवळच्या महानगरपालिका आरोग्य केंद्र / दवाखाना / रुग्णालयात जाऊन त्वरित सल्ला घ्यावा, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाच्यावतीने करण्यात येत आहे.

0 टिप्पण्या