Top Post Ad

मोनोरेलमधील ५८२ प्रवाशांची यशस्वी सुटका,

 कोणतेही संकट वा अणीबाणीच्या प्रसंगी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे मुंबई अग्निशमन दल खंबीरपणे उभे राहते. आपला जीव धोक्यात घालून मुंबईकरांच्या सुरक्षिततेसाठी मुंबई अग्निशमन दल सदैव वचनबद्ध आहे. मोनोरेलमधील ५८२ प्रवाशांची यशस्वी सुटका करणा-या मुंबई अग्निशमन दलाची कामगिरी प्रत्‍येक मुंबईकरांसाठी अभिमानास्‍पद बाब आहे, असे गौरवोद्गार महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी यांनी काढले.


 चेंबूर ते भक्ती पार्क दरम्यान, म्हैसूर कॉलनीजवळ काल (दिनांक १९ ऑगस्‍ट २०२५) सायंकाळी मोनो रेलमध्‍ये तांत्रिक बिघाड होऊन ५८२ प्रवासी अडकून पडले. परिणामी, प्रवाशांच्या सुरक्षिततेला मोठा धोका निर्माण झाला. मुंबई अग्निशमन दलाच्या शूर जवानांनी अपार धाडस, समयसूचकता आणि कौशल्य दाखवत एकूण ५८२ प्रवाशांची सुखरूप सुटका केली. या कामगिरीबद्दल संपूर्ण मुंबईसह इतर भागातून देखील मुंबई अग्निशमन दलाच्या शूर जवानांचे कौतुक होत आहे. महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी यांनी भायखळा येथील मुंबई अग्निशमन दलाच्‍या मुख्‍यालयात जाऊन अग्निशमन दलाच्या जवानांचे आज (दिनांक २० ऑगस्‍ट २०२५) कौतुक केले. त्‍यावेळी श्री. गगराणी बोलत होते.

भायखळा येथील मुंबई अग्निशमन दलाच्‍या मुख्‍यालयात झालेल्‍या या भेटीप्रसंगी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. (श्रीमती) अश्विनी जोशी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमीत सैनी यांच्यासह प्रमुख अग्निशमन अधिकारी श्री. रवींद्र आंबुलगेकर आदी उपस्थित होते. यावेळी मोनोरेल मदतकार्य मोहिमेचे नेतृत्‍व करणारे उप प्रमुख अग्निशमन अधिकारी श्री. अनिल परब यांच्‍यासह उप अग्निशमन अधिकारी श्री. आर. बी.  घाडगे, श्री. एम. व्‍ही. सावंत, श्री. वाय. पी. शेलार, सहायक  अग्निशमन अधिकारी श्री. आर. एस. करलकर, वरिष्‍ठ केंद्र अधिकारी श्री. आय. के. कांबळे, केंद्र अधिकारी श्री. डी. ए. भोसले, श्री. वाय. एच. पवार, श्री. डी. एस. चौधरी, श्रीमती एस. व्‍ही. भोर यांचा श्री. गगराणी यांच्या हस्ते गौरव करण्‍यात आला.

श्री. गगराणी म्‍हणाले की, मुंबई अग्निशमन दलाचे जवान प्रशिक्षित व अनुभवी आहेत. विविध संकटे आणि आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ योग्य योजना आखून ती अचूक व यशस्वीपणे अंमलात आणण्याचे संपूर्ण कौशल्य त्यांच्याकडे आहे.  मोनोरेलमध्‍ये तांत्रिक बिघाड होऊन ५८२ प्रवासी अडकून पडल्‍यावर माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्यासह माननीय उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे, माननीय उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार यांनी संपर्क साधला. मुंबई अग्निशमन दलाचे जवान मदतकार्य करत असल्‍याचे त्‍यांना सांगण्‍यात आले. सर्व प्रवाशांची सुखरूप सुटका होईल, असा आत्‍मविश्‍वास होता. मुंबई अग्निशमन दल विषयी खात्री होती. सर्व यंत्रणांनी आपापसांत समन्वय राखल्याने प्रयत्न यशस्वी झाले,

 मोनोरेलमधील प्रवाशांची सुटका ही केवळ मोहीम नव्हती, तर ती संपूर्ण मुंबईकरांच्या मनात आत्मविश्वास व धीर निर्माण करणारी उल्लेखनीय घटना आहे. आपला जीव धोक्यात घालून मुंबईकरांच्या सुरक्षिततेसाठी मुंबई अग्निशमन दल सदैव वचनबद्ध आहे, हे कृतीतून सिद्ध झाले आहे.  प्रत्‍येक मुंबईकरांसाठी ही अभिमानास्‍पद बाब आहे, असे श्री. गगराणी यांनी नमूद केले.)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com