Top Post Ad

मराठा आरक्षण आंदोलन दडपण्याचा सरकारचा प्रयत्न - मनोज जरांगेचा आरोप

 मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होऊ नये म्हणून मुंबई पोलिसांनी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. मराठा आंदोलनात सुरक्षेसाठी चार सुरक्षा पथक तैनात, मुंबई पोलीस, सीआयएसएफचे जवान, धडक कृती दलाचे पोलीस आणि सीआरपीएफचे जवान सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेयत.  आझाद मैदानात आंदोलनासाठी 5 हजार लोकांना परवानगी देण्यात आली होती, परंतु लाखो आंदोलक आझाद मैदानावर उपोषणासाठी दाखल झाले आहेत. या मराठा आंदोलकांना पिण्याचे पाणी, शौचालयात पाणी आणि निवाऱ्याची व्यवस्था पुरवण्यात आलेली नाही. त्यामुळे शनिवारी सकाळी मराठा आंदोलक छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) स्थानकाच्या बाहेरील रस्त्यावर उतरले. मराठा आंदोलकांनी या रस्त्यावरील वाहतूक रोखून धरली.

मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाचा दुसरा दिवस आज उग्र झाला आहे. हजारो मराठा बांधव आझाद मैदानात जमले असून, आंदोलकांची गर्दी सीएसएमटी परिसरापर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे या भागात मोठी वाहतूक कोंडी झाली असून, गेल्या अर्ध्या तासापासून रस्त्यांवर वाहनांचा ठप्पा बसला आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस उपायुक्त स्वतः रस्त्यावर उतरले आहेत. त्याचबरोबर वाहतूक सुरळीत करण्यासाठी सीआयएसएफची तुकडी तैनात करण्यात आली आहे. एवढ्यावरच थांबता कामा नये, म्हणून केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ) देखील घटनास्थळी दाखल करण्यात आले. 

आझाद मैदान परिसरात रॅपिड अॅक्शन फोर्स (RAF) दाखल होताच आंदोलकांमध्ये संतापाची लाट उसळली. "आमच्या रक्ताचं थारोळं तयार झालं तरी आम्ही माघार घेणार नाही," अशी हाक आंदोलकांनी दिली. दरम्यान, आंदोलनादरम्यान आलेल्या गैरसोयीबाबत मराठा बांधवांनीही संताप व्यक्त केला आहे."आम्ही जेवण घेऊन आलो आहोत, पण शौचालयाची सोय नाही. अंगोळीला टँकरखाली बसावं लागतंय," अशी खंत आंदोलकांनी बोलून दाखवली. सरकार जाणीवपूर्वक आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करत असल्याचंही आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरातून आलेले आंदोलनकर्ते ठाम आहेत. दुसऱ्या दिवशी आंदोलन अधिक तीव्र होत असून पुढील काही तासांत परिस्थिती आणखी तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 मनोज जरांगे यांचं आझाद मैदानात आंदोलन सुरु आहे. मात्र याच आझाद मैदानात लाईट्स उपलब्ध नाहीय. यावरुन मनोज जरांगे यांनी काल (29 ऑगस्ट) सायंकाळी मुंबई महानगरपालिकेवर हल्लाबोल केला. आझाद मैदानात महानगरपालिकेच्या लाईट्स नाहीय. काय भिकारचाळे आहेत तुमचे...50-60 वर्षे तुम्ही सत्ता भोगल्या. भिकार आहेत तुम्ही, स्वत:चे घरं भरुन घेतली. आझाद मैदानात साध्या लाईट्स नाहीय. पोरांनो...लगेच 10-12 फोकस विकत आणा...या महानगरपालिकेला आपण फुकटात देऊन जाऊ...हे भिकार आहेत..., असं मनोज जरांगे म्हणाले. सरकारने पार्किंगची जागा घोषित केली पाहिजे. पोलीस आणि सरकारने पार्किंगचा मॅप टाकावा. तुम्ही जसा विलंब कराल तसं मराठे मुंबईत वाढतील, असा इशारा मनोज जरांगेंनी दिला. तसेच आझाद मैदानाच्या आजूबाजूची मैदाने पार्किंगसाठी मोकळी करा, मराठे शांततेत आंदोलन करतील हा सरकारला शब्द आहे असं मनोज जरांगे म्हणाले. 

मराठा आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशीही मुंबई महानगरपालिकेने या परिसरातील हॉटेल्स आणि खाऊगल्ली बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे पहिल्या दिवशी मराठा आंदोलकांचे खाण्याचे प्रचंड हाल झाले. रात्रभर सीएसएमटी स्थानकात मुक्काम केल्यानंतर मराठा बांधवांनी आझाद मैदानाकडे कूच केले. मात्र, आज सकाळीही या परिसरातील हॉटेल्स आणि खाऊगल्ली बंद ठेवण्यात आली आहे. त्यामुळे आता मराठा आंदोलकांनीच आपल्या बांधवांसाठी नाश्त्याची सोय केली आहे. परभणीतील एका मराठा बांधवाने याठिकाणी नाश्त्याचा एक टेम्पो आणला आहे. याठिकाणी मराठा बांधवांना चहा, केळी आणि पोहे दिले जात आहेत. प्रशासनाकडून दुसऱ्या दिवशीही सीएसएमटी परिसरातील हॉटेल्स आणि खाऊगल्ली बंद ठेवली आहे. आंदोलकांच्या जेवणाची गैरसोय व्हावी म्हणून इतिहासात पहिल्यांदा लालबागच्या राजाच्या दरबारातील अन्नछत्र बंद करण्यात आले असल्याची माहीती मिळत आहे.  त्यामुळे मराठा आंदोलकांचे काल खाण्यापिण्याचे हाल झाले होते. अनेक मराठा आंदोलक काल रात्रभर उपाशी राहिले होते. रात्रभर सीएसएमटी स्थानकात मुक्काम करावा लागल्याने मराठा आंदोलक चांगलेच वैतागले होते. सकाळी आजुबाजूला खाण्याचा काही पर्याय नसल्याने संतापलेल्या मराठा आंदोलकांनी सीएसएमटी स्थानकाबाहेरील रस्त्याच्या मधोमध शेगडी पेटवून पोहे बनवायला सुरुवात केली. यामुळे वाहतुकीची मोठी कोंडी झाली. अनेक बस आणि टॅक्सी गेल्या तासाभरापासून येथे अडकून पडल्या आहेत. 

या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी आंदोलकांना रस्त्यावरुन हटवण्याचा प्रयत्न केला. डीसीपी प्रवीण मुंडे यांनी आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, मराठा आंदोलक ऐकण्याच्या मनस्थितीत नसून त्यांनी अजूनही सीएसएमटीचा रस्ता रोखून धरला आहे. काही आंदोलकांनी मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयासमोर आंघोळ केली.  त्यामुळे या परिसरात सध्या प्रचंड गोंधळाचे वातावरण आहे. काही मराठा आंदोलक बसवर चढले आहेत. पोलिसांनी अनेकदा समजावूनही आंदोलक रस्त्यावरुन हटायला तयार नाहीत. या पार्श्वभूमीवर आता प्रशासनाने शीघ्र कृती दल  आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांची तुकडी रस्त्यावर उतरवली आहे. त्यामुळे आता याठिकाणी काय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

  • मनोज जरांगे पाटील यांच्या नेमक्या मागण्या कोणत्या? 
  • 1. मराठा कुणबी एक आहेत. याची अंमलबजावणी झाली पाहिजे, 
  • 2. हैदराबाद गॅझेटियर लागू करा...सातारा, बाँबे गॅझेटियर लागू करावे.
  • 3. ज्याची कुणबी नोंद सापडली आहे त्याचे सगे सोयरे घ्या...सगे सोयरे पोट जात म्हणून घ्या.
  • 4. मराठा आंदोलकांवरील सरसकट गुन्हे मागे घ्या.
  • 5. आमचं कायद्यात बसणारे आरक्षण द्या.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com