Top Post Ad

बेलासिस पुलाचे बांधकाम नियोजित कालावधीपूर्वी होणार

*ताडदेव - नागपाडा आणि मुंबई सेंट्रल स्‍थानकाला जोडणा-या बेलासिस उड्डाणपुलाच्‍या पुनर्बांधणीला वेग आला आहे. पुलाचे रेल्वे हद्दीतील काम पश्चिम रेल्वे करत असून पुलाच्या पोहोच रस्त्याची उभारणी बृहन्‍मुंबई महानगरपालिका करत आहे.  या अंतर्गत पहिल्‍या टप्‍प्‍यात रेल्वे कंत्राटदाराने ३६ मीटर स्‍पॅनच्‍या एकूण १२ तुळया स्‍थापित (Girder Launching) करण्‍याची कार्यवाही नुकतीच पूर्ण केली आहे. आता, रेल्वे प्राधिकरणाने तुळयाचे मजबुतीकरण (girder bracing), पुलाच्‍या प्रवास पृष्‍ठभागाची रचना (Deck Sheet) करणे, स्लॅब कास्टिंग इत्यादी कामे हाती घेतली आहे. यासाठी वाहतूक व वीज पुरवठा या दोन्‍ही घटकांमध्‍ये ४० खंड (Block) घेतले जाणार आहेत. एकूणच,  बेलासिस पुलाचे बांधकाम नियोजित कालावधीपूर्वी म्‍हणजेच दिनांक ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत पूर्ण करण्‍याचे महानगरपालिकेचे उद्दिष्ट्य आहे.     


 बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक. भूषण गगराणी यांच्या मार्गदर्शनाखाली बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पूल खात्यामार्फत महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधा, विविध प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. मुंबईकर नागरिकांचा प्रवासात कमीत कमी वेळ खर्ची व्हावा, यासाठी विविध ठिकाणी उड्डाणपूल उभारणे, लोहमार्गावर तुळया टाकून पूल उभारणे, रस्त्यांची गुणवत्ता उत्तम असावी यासाठी सिमेंट क्राँकिटच्या रस्त्यांची बांधणी करणे आदी प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. याच अनुषंगाने ब्रिटिशकालीन १३० वर्षे जुना बेलासि‍स पूल पाडून त्‍याची पुनर्बांधणी केली जात आहे.     

 मुंबई सेंट्रल स्‍थानकानजीक रेल्वे मार्गावर केबलआधारित पूल उभारण्यासाठी बृहन्‍मुंबई महानगरपालिका, मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण (MMRDA) यांनी महाराष्ट्र रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट (महारेल) यांच्याशी करार केला आहे.  बेलासिस  पूल प्रकल्प पूर्णत्‍वाचा कालावधी एप्रिल २०२६ पर्यंत आहे. मात्र, या पुलाचे बांधकाम नियोजित कालावधीपूर्वी पूर्ण करून डिसेंबर २०२५ अखेरपर्यंत वाहतुकीस खुला करण्यासाठी प्रयत्नशील रहावे, असे निर्देश अतिरिक्‍त महानगरपालिका आयुक्‍त (प्रकल्‍प). अभिजीत बांगर यांनी दिले आहेत.

 पूल उभारणीच्‍या अनुषंगाने माती परीक्षण, पायाबांधणी, खांबांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. बांधकामास अडथळा ठरणारी बांधकामे हटविण्यात आली आहेत.  पूर्व बाजूला पोहोच रस्‍त्‍यासाठी महानगरपालिकेच्‍यावतीने ४० तुळया अंथराव्‍या लागणार आहेत. त्‍यापैकी ४ तुळया अंथरण्‍यात आल्‍या आहेत. रेल्वे हद्दीतील काम पश्चिम रेल्वे करत असून रेल्वे कंत्राटदाराने  ३६ मीटर स्‍पॅनच्‍या एकूण १२ तुळया स्‍थापित करण्‍याची कार्यवाही पूर्ण केली आहे. तुळया येणे, त्‍यांची जुळवाजुळव (Assembly) आणि स्‍थापित करणे आदी कामे दिनांक १० ऑगस्‍ट २०२५ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. त्‍यानुसार, तुळया स्‍थापित करण्‍याची कार्यवाही दिनांक १० ऑगस्‍ट २०२५ पर्यंत पूर्ण झाली आहे. आता, पश्चिम दिशेच्या पोहोच मार्गातील राहिलेल्‍या एका खांबाचे काम सुरू करण्‍यात येणार आहे. दिनांक १४ सप्‍टेंबर २०२५ पर्यंत तुळयांचे मजबुतीकरण (girder bracing), पुलाच्‍या प्रवास पृष्‍ठभागाची रचना (Deck Sheet) करणे, स्लॅब कास्टिंग इत्यादी कामे पूर्ण करण्‍याचे नियोजन आहे. त्‍यानंतर, दोन्‍ही पोहोच मार्गांची कामे हाती घेऊन एकंदरीत दिनांक ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत पुलाचे संपूर्ण काम पूर्ण होईल, असे नियोजन आहे, असे बांगर यांनी नमूद केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com