Top Post Ad

मुंब्रा-दिवा अनधिकृत बांधकामांवर तात्काळ कारवाई, मात्र येऊरच्या बंगल्यांबाबत ठाणे महापालिकेची चालढकल

अनधिकृत बांधकामांची स्मार्ट सिटी म्हणून ओळख असणाऱ्या ठाणे शहरातील मुंब्रा येथील खान कंपाउंडमधील २१ अनधिकृत इमारतींवर कारवाईचे आदेश उच्च न्यायालयाने ठाणे महापालिकेला दिले. त्यानंतर ठामपाने लागलीच कारवाईचा बडगा उचलला. त्यानंतर याच भागातील आणखी अकरा इमारतींवर कारवाईचा हातोडा पडणार आहे. मात्र १९ वर्षापूर्वी दाखल झालेल्या याचिकेत न्यायालयाने ठाणे महापालिकेला येऊरमधील २०० अनधिकृत बांधकामे तत्काळ तोडण्याचे आदेश दिले असताना देखील अद्याप याबाबत महापालिका डोळेझाक करीत असल्याचा आरोप ठाणेकरांकडून होत आहे. येऊर मधील बंगल्यांबाबत शहर विकास विभागाशी संपर्क साधून येथे परवानगी दिलेल्या बंगल्याची यादी मागविण्यात आली असून यादी तपासून उर्वरित बंगल्यांवर न्यायालयाच्या निर्देशानुसार कारवाई करण्यात येईल असे अतिक्रमण विभागाचे उपायुक्त शंकर पाटोळे  असे स्पष्ट केले. ही तर महापालिकेची जाणिवपूर्वक चालढकल असल्याचे स्पष्ट मत येऊर परिसरातील स्थानिक नागरिकांनी व्यक्त केले. या भागात अनेक राजकीय नेत्यांसह त्यांच्या नातेवाईक आणि महापालिकेतील सेवानिवृत्त अधिकाऱ्यांचे बंगले आहेत. मुंब्यातील सर्वसामान्य, गोरगरिबांच्या इमारतींवर झटपट कारवाई करणे सोपे होते. १९ वर्षापूर्वी दाखल झालेल्या याचिकेत न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार या बंगल्यावर कारवाईचे धारिष्ट्य पालिका दाखविणार का, असा सवालही ठाणेकरांनी उपस्थित केला आहे. 

  येऊरमधील २०० अनधिकृत बंगल्यांवर कारवाईचे आदेश न्यायालयाने दिले. यासंदर्भात २००६ साली येऊरमधील याचिकाकर्ते बळीराम जाधव यांनी याचिका दाखल केली होती. २००६ पासून ही याचिका न्यायालयात प्रलंबित होती. याचिकेच्या सुनावणीपूर्वीच जाधव यांचा सहा वर्षापूर्वी मृत्यू झाला. ही याचिका जेव्हा दाखल केली त्यावेळी ठाणे महापालिकेने न्यायालयात येऊरमध्ये २०० अनधिकृत बांधकामे असल्याचा अहवाल सादर केला होता. यावर मंगळवारी सुनावणी झाली. तेव्हा २०० अनधिकृत बांधकामे तत्काळ पाडण्याचे आदेश दिले. या प्रकरणात केलेल्या कारवाईचा अहवाल सहा महिन्यांत पालिकेला न्यायालयात सादर करावा लागणार आहे. न्यायालयाने येथील बंगल्यांवरून महापालिकेला फटकारले. आजमितीस येऊरमध्ये ४५० हून अधिक बंगले असल्याचा दावा महापालिकेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने केला. येथील बहुतेक परिसर इको सेन्सेटिव्ह झोनमध्ये असल्याने या ठिकाणी कोणत्याही स्वरूपाचे बांधकाम करता येत नाही. मात्र, असे असतानाही येथे बंगले बांधले गेले.  येऊर येथे बंगले बांधण्याकरिता महापालिकेच्या शहर विकास विभागाकडे २८ प्रस्ताव सादर झाले आहेत. येथील १४२ बंगल्यांना पालिकेने परवानगी दिली. सत्तेत असलेल्या एका बड्या राजकीय नेत्याच्या नातेवाइकाच्या बंगल्याचे काम सध्या सुरू आहे. शासकीय सेवेतील सेवानिवृत्त अधिकाऱ्यांचेही बंगले येथे आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com