Top Post Ad

‘गणपतीला रस्त्यावर आणू नका’ .... टिळकांना रानडे यांनी दिलेला इशारा

टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली अन् गणेशोत्सवाला सार्वजनिक स्वरूप देण्याच्या त्यांच्या कृतीवर न्या. रानडय़ांनी ‘गणपतीला रस्त्यावर आणू नका’ या शब्दांत टीका केली. भले लोकमान्य टिळकांचा सार्वजनिक गणेशोत्सवामागील हेतू त्या काळी कितीही उदात्त असेल, पण त्यातून भविष्यात ज्या समस्या, प्रश्न निर्माण होतील त्याची ‘जाण’ न्यायमूर्ती रानडय़ांसारख्या द्रष्टय़ा समाजसुधारकाला होती. थोडक्यात ‘धर्माला रस्त्यावर आणणे’ ही कृतीच न्या. रानडय़ांना मान्य नव्हती.

आज सार्वजनिक गणेशोत्सवाचे स्वरूप पाहता न्या. रानडय़ांच्या या इशाऱ्याची आठवण आल्यावाचून राहात नाही. या दहा दिवसांत होणारे ध्वनिप्रदूषण, जलप्रदूषण, गणेश मूर्तीची उंची, देखाव्यावरून निर्माण होणारे वाद हे मुद्दे आहेतच; पण ज्या ‘उदात्त हेतूने’ (!) लो. टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ रोवली त्या ‘सामाजिक ऐक्य’, ‘जागृती’ या तत्त्वांनाच हरताळ फासला जात आहे. ‘उत्सवाच्या’ नावाखाली हे सगळं खपून जातं; कारण गेल्या दोन दशकांत आपला समाज धर्म-संस्कृतीच्या बाबतीत अधिक ‘हळवा’ झाला आहे (अन् हे विधान थोडय़ाफार प्रमाणात आज सर्वच धर्माना लागू पडते). त्यामुळे भररस्त्यात खड्डे खोदून मंडप टाकणाऱ्या मंडळांपुढे प्रशासन व कायदा जसा हतबल असतो, तसेच स्वत:ला लोकप्रतिनिधी म्हणवणारे राजकारणीसुद्धा ‘लोकानुनय’ करणारी भूमिका घेताना दिसतात. त्यांच्यासाठी ‘मध्यरात्रीनंतरसुद्धा वाद्य वाजवत विसर्जन मिरवणुकींचा’ प्रश्न महत्त्वाचा असतो.
हल्ली दिसणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सवाचं दुसरं रूप मात्र अधिक चिंताजनक आहे. इथे भक्ती-श्रद्धेपेक्षा ‘अर्थकारण’ वरचढ आहे.
गणेशोत्सवातील दहा दिवसांत काही विशिष्ट गणेशोत्सव मंडळांची ‘श्रीमंती’ व ‘कमाई’ पाहून मती गुंग होऊन जाते. या श्रीमंत मंडळांकडे जमा होणारा निधी व या मंडळांच्या लोकोपयोगी कामांची यादी पाहिली तर (सार्वजनिक वाचनालय, अभ्यासिका, रुग्णवाहिका, वैद्यकीय शिबीर वगैरे) त्यांच्याकडे जमा होणाऱ्या पैशांच्या तुलनेत त्यांची ही लोकोपयोगी (?) कामे अत्यंत तुटपुंजी वाटतात.
त्यातच गणेशोत्सवाच्या मंडपातील या कोटय़वधी रुपयांच्या ‘अर्थकारणाला’ अधिक बळकटी देण्याचे काम ‘मीडिया’ करतो, त्यामुळे या श्रीमंत मंडळांना आपोआप भरपूर प्रसिद्धी मिळतेच व त्यांची अजून भरभराट होते. इतर मंडळांशी ‘स्पर्धा’ सुरू होते. हा पैसा येतो कुठून? कालांतराने लोकमान्यांचा सार्वजनिक ‘गणेशोत्सव’ एका बाजूला अन् या नवसाला पावणाऱ्या श्रीमंत मंडळांचा ‘उत्सव’ दुसऱ्या बाजूला अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते.
न्या. रानडय़ांनीच श्रद्धेची फार सुंदर व्याख्या केली आहे. ‘आपल्या सदसद्विवेकबुद्धीला जागून उत्स्फूर्तपणे केलेली कृती म्हणजे श्रद्धा होय!’ गणेशोत्सवात नवसाला पावणाऱ्या गणपतीपुढे रांगा लावणाऱ्यांत सर्वच स्तरांतील, वयोगटांतील, सुशिक्षित-अशिक्षित लोक असतात. यातील जवळपास सर्वच जण आपली विवेकबुद्धी गहाण टाकून हेतूत: या गर्दीत सामील होतात.
‘लोकसत्ता’ने ‘सर्व कार्येषु सर्वदा’ या मालिकेद्वारे समाजात रचनात्मक कार्य करणाऱ्या संस्थांना कोणत्या कामांसाठी निधीची गरज आहे, हे सांगण्याचा उपक्रम सुरू केला आहे. अशा उपक्रमांना या श्रीमंत मंडळांनी उत्सव काळात जमा होणारा बहुतांश निधी दिला तर बरेच काही साध्य केल्यासारखे होईल, पण सद्यस्थितीत हे घडणे अशक्य आहे. कारण समाजाने सारासार विवेकबुद्धी गहाण टाकली आहे. या सर्व पाश्र्वभूमीवर शंभर वर्षांपूर्वी न्या. रानडय़ांनी लो. टिळकांना दिलेल्या इशाऱ्याची पुन:पुन्हा आठवण होते, इतकेच

पद्माकर कांबळे, मुलुंड (पूर्व)


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com