Top Post Ad

नायर रूग्णालय आणि दंत महाविद्यालयाला 'एनएबीएच' प्रमाणित दर्जा प्राप्त

मुंबई  महानगरपालिका संचालित, नायर रूग्णालय आणि दंत महाविद्यालयाला रूग्णालये आणि वैद्यकीय सेवा प्रदात्यांसाठीचे राष्ट्रीय प्रमाणिकरण मंडळ (नॅशनल अॅक्रेडेशन बोर्ड फॉर हॉस्पिटल एण्ड हेल्थकेअर प्रोव्हायडर्स) अर्थात 'एनएबीए'च कडून प्रमाणित दर्जा मिळाला आहे. नायर रूग्णालय आणि दंत महाविद्यालयाच्या ठिकाणी रूग्णांना देण्यात येणाऱ्या सेवा अतिशय गुणवत्तापूर्ण पद्धतीने व सर्व निकष पाळून पुरवल्या जातात. याची बृहन्मुंबई महानगरपालिकेला मिळालेली ही पोचपावती आहे.  बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य सेवा पुरविणाऱ्या रूग्णालय आणि महाविद्यालयांमध्ये नायर रूग्णालय आणि दंत महाविद्यालयाला प्रमाणित दर्जा मिळवण्याचा पहिला मान मिळाला आहे. एवढेच नव्हे तर, महाराष्ट्रातील शासकीय दंत महाविद्यालयांमध्ये आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ कार्यक्षेत्रात हा दर्जा मिळवणारे नायर दंत रूग्णालय पहिले रूग्णालय ठरले आहे.  

एनएबीएच प्रमाणिकरणामुळे रूग्णसेवा आणि गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा अधिक परिणामकारकपणे उपलब्ध करून देण्यासाठी  महानगरपालिका प्रशासनाची जबाबदारी आणखी वाढली आहे. त्यामुळे रूग्णांना सेवा देण्याचा कालावधी नियंत्रित करतानाच अधिक गुणवत्तापूर्ण सेवा देण्यासाठी रूग्णालयाच्या चमुने सातत्यपूर्ण प्रयत्न करावेत, असे निर्देश महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिले आहेत. तसेच, हा दर्जा मिळाल्याबद्दल दंत रूग्णालय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. (श्रीमती) नीलम अंद्राडे यांच्यासह संपूर्ण रूग्णालय प्रशासन, अधिकारी, कर्मचारी डॉक्टर्स तसेच निमवैद्यकीय कर्मचारी वर्गाचे अभिनंदनही केले आहे.  एनएबीएचकडून प्रमाणिकरण दर्जा प्रदान करताना रूग्णांना लागणारा उपचाराचा कालावधी (टर्न अराऊंड टाईम), संसर्ग नियंत्रण (इन्फेक्शन कंट्रोल),  स्वच्छ (स्टरलाईज) उपकरणांचा वापर, जैववैद्यकीय सूचकांचा (बायोलॉजिकल इंडिकेटर) वापर आदी निकष रूग्णसेवेच्या अनुषंगाने तपासण्यात आले. रूग्णांना देण्यात येणाऱ्या सेवांमध्ये गुणवत्ता आणि हमी या दोन्ही गोष्टींची पडताळणी यानिमित्ताने करण्यात आली. 

रूग्णालयाच्या ठिकाणी दिव्यांगांसाठी सुलभ प्रसाधनगृह, उतार (रॅम्प), व्हिलचेअर आदी सर्व सुविधाही उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यासह रूग्णांच्या सुविधेसाठी चिन्हांचा वापर, रांग व्यवस्थापनासाठी 'टोकन सिस्टिम'चा वापर, महत्वाच्या वैद्यकीय सेवांसाठी रूग्णांची लिखित परवानगी (कन्सेंन्ट), रूग्णांना भूल देताना चाचण्यांचा समावेश आदी बाबींची पडताळणीही या मान्यतेच्या निमित्ताने करण्यात आली. याअनुषंगाने अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा आणि उपायुक्त (सार्वजनिक आरोग्य) श्री. शरद उघडे यांच्या देखरेखीखाली सर्व कार्यवाही पूर्ण केली.  रूग्णांच्या सुरक्षेसोबतच आपत्कालीन परिस्थितीत रूग्णांना कसे हाताळायचे यासाठीची रंगप्रणाली रूग्णालयात तयार करण्यात आली आहे. कोणतीही आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी रूग्णालयातील कर्मचारी, डॉक्टर, विद्यार्थी हे सज्ज आहेत का? यासाठीचे प्रात्यक्षिक आणि तयारी  'एनएबीएच'च्या चमूने तपासून घेतली.  रूग्णांना वैद्यकीय उपचारादरम्यान रूग्णालयात देण्यात येणारी औषधे, औषधांचा साठा, ज्वलनशील पदार्थ ठेवण्याची पद्धती आणि तेथील उपाययोजना आदी बाबीही यानिमित्ताने तपासण्यात आल्या. गत दीड वर्षांपासून 'एनएबीएच' मान्यतेसाठी रूग्णालय प्रशासनामार्फत तयारी सुरू होती. रूग्णालयाने 'एनएबीएच' दर्जा मिळवण्याच्या अनुषंगाने सर्व निकष पूर्ण केल्यामुळेच नायर रूग्णालय आणि दंत महाविद्यालयाला हा मान मिळाला आहे.   

एनएबीएच प्रमाणिकरण दर्जा मिळवण्याची कार्यपद्धती पार पाडताना रूग्णालय प्रशासनाने सामाजिक उत्तर दायित्व (सीएसआर) च्या माध्यमातून एक सल्लागार नेमला. या सल्लागाराच्या मदतीने रूग्णालयाने संपूर्ण एक वर्ष तयारी केली. या संपूर्ण प्रक्रियेसाठी परिचारिका, कक्ष परिचर (वॉर्डबॉय), कामगार, कर्मचारी, अधिकारी, डॉक्टर्स, विद्यार्थी असे सर्वांनीच प्रयत्न केले, एनएबीएच प्रमाणित स्वीकृती मिळणे याचा अर्थ रूग्णालयातील वैद्यकीय सेवा ही अतिशय गुणवत्तापूर्ण व सर्व निकष पाळणारी आहे, यावर शिक्कामोर्तब झाले आहे. एवढेच नव्हे तर या दर्जामुळे नायर दंत रूग्णालय महाविद्यालयाच्या प्रतिष्ठेत भर पडली आहे. या दर्जामुळे अधिकाधिक कौशल्यपूर्ण डॉक्टर्स, निमवैद्यकीय कर्मचारी वर्ग यांना आकर्षित करण्यासह दंत वैद्यकीय सेवेची गुणवत्ता कायम टिकवण्यासाठीदेखील हातभार लागणार आहे, अशी माहिती रूग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ.  नीलम अंद्राडे यांनी दिली. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com