भारतीय हवामान खात्याने आज मंगळवार, दिनांक १९ ऑगस्ट रोजी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात (मुंबई शहर आणि उपनगरे) अतिमुसळधार पावसाचा इशारा (रेड अलर्ट) दिला आहे. त्याचप्रमाणे, मुंबईत सातत्याने पाऊस कोसळतो आहे.या पार्श्वभूमीवर, बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील अत्यावश्यक सेवा वगळता, इतर सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये तसेच महानगरपालिका कार्यालये यांना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण या नात्याने महानगरपालिकेकडून आज सुटी जाहीर करण्यात येत आहे.तसेच, मुंबई महानगरातील सर्व खासगी कार्यालये, आस्थापना यांनी आपल्या कामकाजाच्या स्वरूपानुसार, कर्मचाऱ्यांना घरी राहून कामकाज (वर्क फ्रॉम होम) करण्याच्या आणि अनावश्यक प्रवास टाळण्याच्या सूचना तातडीने द्याव्यात, असे महानगरपालिकेतर्फे आवाहन करण्यात येत आहे.
भारतीय हवामान विभागाने मुंबई क्षेत्रासाठी आज १९ ऑगस्ट रोजी दिलेला अतिमुसळधार पावसाचा इशारा (Red Alert) आणि सातत्याने कोसळत असलेल्या जोरदार पावसाच्या पार्श्वभूमीवर, राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री तथा मुंबई उपनगरे जिल्हा सहपालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील आपत्कालीन नियंत्रण कक्षात भेट दिली आणि मुंबईतील पावसाच्या स्थितीचा आढावा घेतला. यावेळी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, पोलीस आयुक्त देवेन भारती उपस्थित होते.

0 टिप्पण्या