शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीचं धरणं आंदोलन सुरू होतं, तिथं शेजारीच विठाबाई बापू पडळकर या ८२ वर्षीय वयोवृद्धेचं धरणं सुरू होतं. संजय गांधी निराधार योजनेतून निवृत्तीवेतन सुरू करून देतो, असं सांगून आमदार गोपीचंद पडळकर यांच्या निकटवर्तीयांनी त्यांची फसवणूक केली, कागदपत्रांवर अंगठे घेतले आणि त्यांची १७ एकर जमीन स्वतःच्या नावावर करून घेतली. स्थानिक पातळीवर विठाबाई दाद मागून थकल्या, पण कोणालाही पाझर फुटला नाही. म्हटलं तर त्या गोपीचंद पडळकर यांच्या भावकीतल्याच, पण आमदार असूनही पडळकरांची त्यांना कसलीही मदत झाली नाही, उलट पडळकरांच्या जवळच्या लोकांकडून धमकावण्याचे गैरप्रकार घडले. हे पुरेसं बोलकं आहे.
नाईलाजास्तव विठाबाईंनी सांगलीहून आझाद मैदान गाठलं आणि ३ जुलैपासून त्या धरणं आंदोलन करत आहेत. त्यांना कोणीही मंत्री भेटायला आलेला नाही. कोणीही विरोधी पक्षाच्या आमदाराने अजून या विषयासंदर्भात सरकारला जाब विचारलेला नाही. सत्ताधारी पक्षाचा आमदारच आरोपींना पाठीशी घालणारा असल्याने विठाबाईंना न्याय मिळण्याची शक्यता दुरापास्त आहे. लोकलाजेस्तव सरकारने काही केलं तर...!
कायद्याने वागा लोकचळवळ या प्रकरणात हस्तक्षेप करणार आहे.
विठाबाईसारख्या वयोवृद्धेचीच नव्हें, तर सांगली जिल्ह्यात महारवतनाच्या जमीनीही धाकदपटशावर हडपल्या गेल्याचं ऐकायला मिळालं.
ही देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारात महाराष्ट्राची स्थिती आहे. अक्षरशः अराजकता सुरू आहे आणि न्याय जवळजवळ संपलाय.
सत्ताधारी आघाडीतील कोणीही कार्यकर्ता यापुढे तुम्हाला मदत करायला आला तर सावध राहा. आपले कोणतेही दस्तावेज त्यांना सुपूर्द करू नका
0 टिप्पण्या