ऍड. बाळासाहेब आंबेडकर : संविधानाच्या विरोधात जाणाऱ्या कोणत्याही शक्तीला पाठिंबा नाही..! वंचित बहुजन आघाडीने रिपब्लिकन सेनेशी संबंध तोडले; आनंदराज आंबेडकर यांना कडाडून विरोध.
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली १६ जुलै रोजी राज्य कार्यकारिणीची ऑनलाईन बैठक पार पडली. या बैठकीत एक महत्त्वाचा राजकीय निर्णय घेण्यात आला असून, रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांच्याशी वंचित बहुजन आघाडीने आपला राजकीय पाठिंबा पूर्णतः मागे घेतला आहे.
शिवसेना (एकनाथ शिंदे गट) व रिपब्लिकन सेनेमध्ये नुकतीच झालेली युती ही अत्यंत दुर्दैवी आणि संविधानविरोधी असल्याचा ठाम निषेध वंचित बहुजन आघाडीने या बैठकीत नोंदवला. आरएसएस-भाजप यांचा हिंदुत्ववादी अजेंडा, फुले-शाहू-आंबेडकरी विचारधारेच्या पूर्णतः विरोधात आहे. त्यामुळे अशा शक्तींशी हातमिळवणी करणाऱ्या कोणत्याही संघटनेला आमचा पाठिंबा असू शकत नाही, असा स्पष्ट निर्णय पक्षाने घेतला आहे.
ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांनी बैठकीनंतर जाहीर केलेल्या निवेदनात सांगितले की, "आनंदराज आंबेडकर हे जरी बाबासाहेब आंबेडकरांचे नातू असले, तरी त्यांच्या वर्तमान कृतीमुळे ते संविधानाच्या विरोधात गेले आहेत. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी त्यांच्यापासून पूर्णतः फारकत घेते."
वंचित बहुजन आघाडीच्या या निर्णयावर पक्षाच्या विविध स्तरांतील नेत्यांनीही आपली एकमताने सहमती दर्शवली. या निर्णयावर स्वाक्षरी करणाऱ्या प्रमुख पदाधिकाऱ्यांमध्ये रेखाताई ठाकूर, ऍड. प्रियदर्शी तेलंग, डॉ. धैर्यवर्धन पुंडकर, अशोकभाऊ सोनोने, डॉ. अरुण सावंत, डॉ. अनिल जाधव, डॉ. अरुंधती शिरसाठ, अमित भुईगळ, सर्वजित बनसोडे, दिशा पिंकी शेख, फारुख अहमद, प्रा. किसन चव्हाण, कुशल मेश्राम, महेश भारतीय, प्रा. नागोराव पांचाळ, डॉ. निलेश विश्वकर्मा, प्रा. हमराज उईके, प्रा. सोमनाथ साळुंखे, सविता मुंढे, प्रा. विष्णू जाधव, सिद्धार्थ मोकळे, जितरत्न पटाईत यांचा समावेश आहे.
"आनंदराज आंबेडकर की संविधान?" हा प्रश्न आता फुले-शाहू-आंबेडकर चळवळीसमोर उभा आहे. वंचित बहुजन आघाडीने आपली भूमिका स्पष्ट केली आहे – आमचा निर्णय संविधानाच्या बाजूने आहे.
0 टिप्पण्या