आज दिनांक २९ जुलै २०२५ रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात "पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या" एका अत्यंत महत्त्वपूर्ण प्रकरणाची सुनावणी सुरू होती. दोन्ही गटांच्या वरिष्ठ वकिलांमध्ये युक्तिवाद चालू असताना, खंडपीठाचे न्यायमूर्ती वाय.जी.खोब्रागडे यांनी दोन्ही पक्षांचे वकिलांना थेट प्रश्न विचारला "पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना कधी झाली?" हे ऐकताच, दोन्ही गटांचे वरिष्ठ वकील काही क्षण गोंधळले. उत्तर दोन्ही गटांच्या वकिलांना देता आले नाही. आजूबाजूला उपस्थितांपैकी कुणी तरी बोलले १९४५... त्यानंतर न्यायमूर्ती खोब्रागडे यांनी पुढील प्रश्न केला "या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कोण?" यावेळी मात्र दोन्ही बाजूंनी एकमुखाने उत्तर दिले "डॉ. बाबासाहेब आंबेडकर!"
पूर्ण न्यायालयात वरिष्ठ वकील, दोन्ही गटांचे पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. याच वेळी, न्यायमूर्ती खोब्रागडे यांनी खोचक आणि अंतर्मुख करणारा सवाल उपस्थित केला - "ही त्याचा घटनानिर्मात्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची संस्था आहे का ज्यांनी ह्या देशाला संविधान दिलं? आणि ज्याच्या आधारावर आज हे न्यायालये चालतात ?" हा सवाल पडताच संपूर्ण कोर्टात एक निशब्द शांतता पसरली... क्षणभरासाठी सर्वत्र गंभीर वातावरण निर्माण झालं. नंतर न्यायमूर्तींनी अत्यंत स्पष्ट शब्दांत आपली नाराजी व्यक्त केली. "संविधाननिर्मात्यांच्या संस्थेमध्ये असा वाद असणं, हे अत्यंत निंदनीय आहे," असं स्पष्ट मत त्यांनी मांडलं.त्यांच्या शब्दांनी उपस्थित प्रत्येकाला अंतर्मुख केलं…सवाल फक्त कायदेशीर होता असं नाही, तो नैतिकतेवर होता…संस्थेच्या मूळ मूल्यांवर आणि उत्तराधिकार्यांच्या जबाबदारीवर होता! या महत्त्वाच्या प्रकरणाची पुढील सुनावणी दिनांक १८ ऑगस्ट २०२५ रोजी मुंबई उच्च न्यायालय, औरंगाबाद खंडपीठ येथे होणार आहे.--------------------------------------------------------------
पीपल्स एज्युकेशन सोसायटी या शैक्षणिक संस्थेचा बेकायदा ताबा मारणाऱ्या रामदास आठवले, उज्वल निकम सारख्या लुटारूना बळ देण्याचे काम आरएसएस आणि भाजपचे सरकार तसेच देवेंद्र फडणवीस करीत आहे. आंबेडकर भवन बळकावण्यासाठी कुठेही ट्रस्टी नसलेल्या रत्नाकर गायकवाड नंतर फडणवीस आणि भाजपचा पीपल्स एज्युकेशन सोसायटी बेकायदा ट्रस्टी रामदास आठवले आणि गँगला पाठिंबा असल्याचे आज दिसून आले आहे. निमित्त आहे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटी या शैक्षणिक संस्थेचा ८० वा वर्धापन दिनाचे. पीपल्स एज्युकेशन सोसायटीचा वर्धापन दिन सोसायटीचे आवारात साजरा व्हायला हवा होता. मात्र तो आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे साजरा करण्यात आला. त्याला भाजपचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या सोबत केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्री रामदास आठवले, संस्थेचे विश्वस्त ॲड. उज्वल निकम, ॲड. बी. के. बर्वे व इतर पदाधिकारी उपस्थित होते! अशा प्रकारच्या बातम्या सरकारच्या वतीने मिडियाला पाठविण्यात आल्या.
मुळात रामदास आठवले उज्वल निकम, बी. के. बर्वे हे कोण आहेत? ह्यांचा पीपल्स एज्युकेशन सोसायटी सोबत काय संबंध आहे? ह्यांचे योगदान काय आहे? आंबेडकरी चळवळीचा ह्यांचा काय संबंध आहे? असाच प्रकार आंबेडकर भवन पाडण्याआधी १७ माळ्याचे टॉवर उभारण्यात येत असल्याचे बोगस ट्रस्टी ह्यांनी जाहीर केले होते आणि एका स्टेडियम मध्ये त्याचा उद्घाटन सोहळा गायकवाड, सोनारे ह्यांनी तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्यांना बोलवून पार पडला होता आणि दुसऱ्या दिवशी पहाटेच्या अंधारात आंबेडकर भवनवर बुलडोझर चालविण्यात आला होता. तोच प्रकार राजेंद्र गवई ह्याचे टीमने दीक्षाभूमी वर केला होता. पार्किंगचे नांवाने मॉल उभा करण्याचे मनसुबे आंबेडकरी समूहाने मोठा पोलिस फौजफाटा असताना उधळून लावला होता. तर आंबेडकर भवन प्रकरणात बाळासाहेब आंबेडकर ह्यांचे नेतृत्वात लाखो आंबेडकरी अनुयायी भर पावसात रस्त्यावर उतरले होते.रामदास आठवले केंद्रात सामाजिक न्याय मंत्री म्हणून २०१४, २०१९ आणि आता २०२४ सामाजिक न्याय मंत्री आहेत.तर संजय सिरसाठ राज्यात सामाजिक न्याय मंत्री आहेत.गेली अनेक वर्षे सामाजिक न्याय विभागाचा निधी अजित पवार आणि मविआ महायुती दोन्ही सरकारने वळते केले. शिष्यवृत्ती, स्वाधार निधी मिळत नाही, राज्यातील वर्ग १ ते ४ च्या जागा कुठल्याही आरक्षणा शिवाय भरल्या जात आहेत, इतर शैक्षणिक संस्थांना मोठ्या प्रमाणात निधी आणि सुविधा दिल्या जात आहेत. पीपल्स एज्युकेशन सोसायटी मात्र ह्यापासून पूर्णतः अलिप्त केली आहे. उज्वल निकम ह्याने खैरलांजी प्रकरणी काय शेण खाल्ले हे जगाला माहीत असताना हा माणूस पीपल्स मध्ये कसा ह्याचा जाब देखील कुणी रामदास आठवले आणि गँगला आंबेडकर समूह विचारत नाही. केवळ बाबासाहेबांच्या विचाराचे पाईक आहोत हे सांगून हा नंगानाच उघड्या डोळ्यांनी पाहत आहे.
देशात इतर संस्था मध्ये मोठ्या प्रमाणात विविध जागतिक स्तरावर विविध कोर्सेस आणि विद्या शाखां मध्ये विद्यार्थ्यांसाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. विज्ञान, वाणिज्य, कला आणि तांत्रिक शिक्षण यांसारख्या पारंपरिक शाखांबरोबरच, डेटा सायन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता, आणि पर्यावरणशास्त्र यांसारख्या उदयोन्मुख क्षेत्रांमध्येही करिअरच्या संधी आहेत. विज्ञान शाखा: अभियांत्रिकी मध्ये विविध स्पेशलायझेशन आहेत, जसे की संगणक, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, सिव्हिल, आणि एरोस्पेस अभियांत्रिकी. वैद्यकीय शाखेत एमबीबीएस, बीडीएस, फार्मसी, बायोटेक्नॉलॉजी, आणि इतर आरोग्य सेवांशी संबंधित अभ्यासक्रम.विज्ञान शाखेत भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, आणि इतर विज्ञान विषयांमध्ये मूलभूत आणि उपयोजित शिक्षण.माहिती तंत्रज्ञान (IT) संगणक विज्ञान, डेटा सायन्स, माहिती तंत्रज्ञान, आणि सॉफ्टवेअर अभियांत्रिकी.तसेच वाणिज्य शाखेत वाणिज्य लेखांकन, अर्थशास्त्र, आणि व्यवसाय व्यवस्थापन, व्यवसाय प्रशासन,व्यवस्थापन, विपणन, आणि मानव संसाधन व्यवस्थापन.
चार्टर्ड अकाउंटन्सी (CA) मध्ये लेखा आणि आर्थिक व्यवस्थापनातील व्यावसायिक अभ्यासक्रम. कंपनी सचिव (CS): कंपनी कायदा आणि नियामक बाबी तसेच कला शाखेत इतिहास, भूगोल, मानसशास्त्र, समाजशास्त्र, भाषाशास्त्र, आणि इतर मानवतावादी अभ्यास.कला आणि मानविकी मध्ये ललित कला, दृश्यकला, प्रदर्शन कला, आणि डिझाइन. पत्रकारिता आणि मास कम्युनिकेशन: पत्रकारिता, जनसंपर्क, आणि दृकश्राव्य माध्यमांमध्ये शिक्षण. तांत्रिक शिक्षणात आयटीआय विविध तांत्रिक आणि व्यावसायिक अभ्यासक्रम,पॉलिटेक्निक डिप्लोमा.अभियांत्रिकीमधील विविध शाखांमध्ये डिप्लोमा अभ्यासक्रम. हॉटेल व्यवस्थापन: हॉटेल आणि पर्यटन उद्योगातील शिक्षण. फॅशन डिझायनिंग: कपडे आणि ऍक्सेसरीजच्या डिझाइनचे शिक्षण. शिवाय उदयोन्मुख क्षेत्रे अर्थात डेटा सायन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), मशीन लर्निंग, रोबोटिक्स, आणि AI-आधारित तंत्रज्ञान.पर्यावरणशास्त्र,डिजिटल मार्केटिंग, शिक्षणशास्त्र कायद्याचे शिक्षण आणि न्यायिक क्षेत्र,मानसशास्त्र व कृषी ह्यात अनेक कोर्स उपलब्ध करता आले असते. मात्र पीपल्स एज्युकेशन सोसायटी या शैक्षणिक संस्थेला रसातळाला लावण्याचे काम ह्या लोकांनी केले आहे.
देशात आणि जगात ही एकमेव संस्था आहे ज्याचे कॉलेज किंवा शाळा बंद पडत आहे किंवा बंद पाडले जात आहे. मग ते प्राचार्य असोत की ट्रस्टी त्यांनी संस्था लुटण्याचे काम केले आहे. बार्टी सारखी स्वायत्त संस्था उभी करण्यात आली मात्र डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर स्थापन झालेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटी या शैक्षणिक संस्थेची पिछेहाट करण्यात येत आहे. ८० वर्षे पूर्ण झालेल्या शिक्षण संस्थेचे जागतिक स्तरावर रँक पहिल्या १०० मध्ये असायला हवे होते. मात्र बौद्ध मंत्री, आमदार खासदार ह्यांना घरे भरण्या पासून वेळ नाही. त्यामुळे दिवसागणिक ही संस्था आणि तेथील शिक्षण ह्याचा दर्जा खालावला आहे. राजकारण आणि लूट ह्या पलीकडे संस्थेत काही नवीन नाही. आंबेडकरी समूहाला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेली लोकशाही आणि आरक्षण संपविले जात आहे. सोबतच डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या संस्था आणि तेथील शिक्षण देखील संपविले जाताना येथील बुद्धिजीवी, साहित्यिक, नोकरदार आणि सामान्य आंबेडकरी माणूस ह्या मुळे पेटून का उठत नसेल ?
- राजेंद्र पातोडे
- प्रदेश महासचिव
- वंचित बहुजन युवा आघाडी महाराष्ट्र प्रदेश
- ---------------------------------------------------
अंतर्गत वाद सर्वच संस्था भोगतात परंतु पीईएस सारखे तीन संचालक मंडळ कुठे ?...खरं सांगायचं तर, अनेक सवर्ण किंवा इतर बहुसंख्य संस्थांमध्येही अंतर्गत वाद, मतभेद, राजकीय हस्तक्षेप असतो. हे सत्य आहे. पण ते वाद कधीच संस्थेच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचवतील इतके उघड किंवा टोकाचे होत नाहीत. मात्र पीपल्स एज्युकेशन सोसायटी बाबासाहेबांची संस्था म्हणूनच जास्त चर्चेत राहते आणि ती चर्चा संरक्षणासाठी नसेल तर ती होते बदनामीसाठी. परंतु कोणी तरी दाखवून द्यावे - एखाद्या सवर्ण संस्थेमध्ये एकाचवेळी तीन संचालक मंडळे सक्रिय आहेत का? कोणी दाखवून द्यावे - तीन गटांनी एकाच संस्थेवर मालकी सांगत स्वतंत्र कार्यालये, लेटरहेड्स, निर्णय घेतल्याचे एखाद्या संस्थेत घडते का? कोणी दाखवून द्यावे - एका संस्थेतील वाद न्यायालयात गेल्यावर सर्व गट न्याय मान्य करतील असा निर्णय न घेता, त्याच्या विरोधातच पुन्हा न्यायालयाचे दार ठोठवतात का? पीईएस मधील वाद हे केवळ मतभेद नसून, संस्थेच्या नावाने चालणारे वेगवेगळे सत्ताकेंद्र बनले आहेत. हे अन्यत्र फार क्वचित किंवा अजिबात दिसत नाही. म्हणूनच, ही बाब केवळ "आमच्या संस्थेवर जास्त चर्चा होते" म्हणून दुर्लक्षित न करता, संस्थेच्या बचावासाठी ठाम भूमिका घेण्याची वेळ आहे.

0 टिप्पण्या