विधानसभेतील कामकाजाची माहिती व बातम्या विधानसभा चॅनेल वरून प्रसारित होतात. मात्र याशिवाय आपले स्वतःचेही एक यु ट्यूब चॅनल विधानसभेतील कामकाजाच्या बातम्या व माहिती प्रसारित करते. एखादया घटनेची, भाषणाची, कामकाजाची माहिती ट्विस्ट करून, दिशाभूल करून जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी तर हे आपले वैयक्तिक, खाजगी चॅनेल आपण सुरू केलेले नाही ना अशी शंका निर्माण करणारी बातमी आपल्या वैयक्तिक चॅनेलने दिली आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्ष माओवादी वर बंदी असे आपण विधानसभेत म्हणालात; परंतु आपल्या वैयक्तिक चॅनेलवरील बातम्यांमध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षावर बंदी अशी चुकीची व दिशाभूल करणारी बातमी प्रसारित करण्यात आली आहे. याचा भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या राज्य कमिटीच्या वतीने आम्ही तीव्र निषेध करीत आहोत व संबंधीत चॅनेलवरील न्यूज रिडरने तातडीने खुलासा करून चुकीचे वृत प्रसारित केल्याबद्दल माफी मागावी अशी मागणी करीत आहोत.
आम्ही आपल्या निदर्शनास आणीत आहोत की, भारतीय राज्यघटनेची पायमल्ली करणारे आणि जनतेच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणू पाहणारे 'विशेष जनसुरक्षा विधेयक २०२४' भाजपा-महायुतीच्या सरकारने नुकतेच विधानमंडळात बहुमताच्या जोरावर मंजूर करुन, जनतेवर लादले आहे. या विधेयकाला आमचा स्पष्ट विरोध आहे. मुळातच जनसुरक्षा कायद्याच्या आडून, कष्टकरी, श्रमिक, अदिवासी, महिला, युवक, विद्यार्थी आणि समाजातील वंचित घटकांसाठी जनसंघर्ष संघटीत करणाऱ्या डाव्या विचारांच्या पक्ष व संघटनांना हेतुः पुरस्सर टार्गेट करण्याचा सरकारचा हेतू आहे हे आपल्या ट्यूब चॅनेलवरील बेजबाबदार वृत्तामुळे स्पष्ट झाले आहे.
भारतीय कम्युनिस्ट पक्ष हा या देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात अमूल्य योगदान दिलेला पक्ष आहे. २०२५ हे या पक्षाचे शताब्दी वर्ष असून, १०० वर्षात भारतीय जनतेवरील अन्यायाला वाचा फोडण्याचे काम पक्षाने केले आहे. भारतीय जनतेच्या अनेक न्याय मागण्यांसाठी प्रदीर्घ संघर्ष करत, भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या अनेक नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी भारतीय स्वातंत्र्य चळवळीत प्रसंगी आपल्या प्राणांची आहुतीही दिली आहे. माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा व इंद्रकुमार गुजराल यांच्या मंत्रिमंडळात पक्षाचे नेते कॉ. इंद्रजित गुप्ता देशाचे गृहमंत्री आणि कॉ. चतुरानन मिश्रा कृषीमंत्री होते. पक्षाचे नेते कॉ. श्रीपाद अमृत डांगे, शाहीर अमर शेख, शाहीर अण्णाभाऊ साठे, शाहीर गव्हाणकर यांच्यासह पक्षाचे अन्य नेते संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील प्रमुख नेते होते. कॉ. व्ही. डी. देशपांडे आणि कॉ. माधवराव गायकवाड हे महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते राहिले आहेत.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या अनेक माजी आमदारांनी महाराष्ट्र विधीमंडळात गौरवशाली कामे केलेली आहेत. विधीमंडळाची प्रतिष्ठा उंचावर नेलेली आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्यावर कडव्या सनातनी उजव्या शक्तींनी हल्ला करून त्यांचा खून केला. त्यांचे हे बलिदान भारतीय कम्युनिस्ट पक्ष कधीच विसरू शकत नाही. जनसुरक्षा विधेयकाच्या आडून भाजपा सरकार डाव्या विचारांना दाबण्याचा प्रयत्न करत असले तरी, भारतीय कम्युनिस्ट पक्ष मात्र असल्या भ्याड प्रयत्नांना न घाबरता सर्वसामान्य जनतेशी असलेली आपली बांधिलकी कायम ठेवेल, असे यानिमित्ताने आम्ही निक्षून सांगतो. आपण आपल्या अधिकृत यु ट्यूब चॅनेलवर केलेली घोडचूक सुधारण्याची सूचना आपण आपल्या आयटी सेलला करावी. पुन्हा असा खोडसाळपणा होणार नाही याची दखल घ्यावी व झालेल्या प्रकाराबद्दल खुलासा करून चॅनेलच्या सर्वसंबधीतांनी माफी मागावी असे आवाहन आम्ही आपणास करीत आहोत.
आम्ही आपल्या निदर्शनास आणीत आहोत की 'भारतीय कम्युनिस्ट पक्ष माओवादी' आणि 'भारतीय कम्युनिस्ट पक्ष' हे दोन भिन्न राजकीय पक्ष आहेत. याची आपणास पूरेपूर कल्पना आहे. आपल्या चॅनेललाही ती आहे. परंतु भारतीय कम्युनिस्ट पक्षाची प्रतिमा समाजामध्ये मलीन करणे, संभ्रम निर्माण करणे व दहशत पसरवणे या हेतूने यू ट्यूब चॅनेलवर हा खोडसाळपणा जाणीवपूर्वक केल्याचे आमचे मत आहे.
0 टिप्पण्या